जुना पुराणा पिंपळ ...

जुना पुराणा पिंपळ
उभा नदीच्या तीरी ।
आल्या-गेल्या वाटसरूला
देई  मायेची सावली ॥

जुना पुराणा पिंपळ
आटवांचा त्याला पार ।
पक्षांची मिरवी घरटी
 अन् किडामुंगीचा वावर ॥

जुना पुराणा पिंपळ
त्याची हिरवी-पिवळी पाने ।
नव्या ऋतुंची पालवी
अन्  जुन्या ऋतुंचे जाणे ॥

जुना पुराणा पिंपळ
त्याच्या किती कहाण्या ।
छायेत नाचती सजती
आठवणींच्या भिंगोर्‍या ॥

जुना पुराणा पिंपळ
विस्तारी चहू दिशांना ।
झेपावे उंच आभाळी
रूजवी मातीत मुळांना ॥

जुना पुराणा पिंपळ
सळसळतो पानोपानी
सरत्या किती क्षणांचा
तोच साक्षी मनोमनी ॥

जुना पुराणा पिंपळ
शोधी आसमंती काही ।
ढळता हिरण्यगर्भ तेथे
अन् शुष्क पर्णांच्या राशी॥

जुना पुराणा पिंपळ
खंतावे आज अंतरी ।
पायवाटही दिसेना
चाहूल नाही  दूरवरी ॥