पानगळीच्या दिवसात...

पानगळीच्या दिवसात...
किमोथेरपी नंतर
सगळे केस गळून पडावेत
तशी झाडं
डोळ्या देखत 
ओकीबोकी
होतील 
आता काही दिवस 
त्यांनी आरसा
न बघितलेलाच बरा... 
 
पानगळीच्या दिवसात...
झाडाच्या पायथ्याला
पडलेला पानांचा पसारा
बघितला की 
तुझ्या आठवणी 
आठवतात
मनाचा अस्ताव्यस्त पसरलेला
तो कोपरा 
अजून ही
आवरायचा बाकी आहे...