स्वाद अमृताचा

कोजागिरीची रात्र साजिरी
धुंद आसमंत
मौजमस्तीची लाट उसळली
धवल चांदण्यात
प्रसन्न होऊन नभी हसतो
चंद्र पौर्णिमेचा
दुधास साध्या आज गवसला 
स्वाद अमृताचा
 
शशी उगवला आकाशी
पण थरारली धरती
दर्शन होता शांत सागरी
लाटा असंख्य उठती
त्या लाटांचे ओठ अनावर
सागर तट चुंबिती
किरणामृत प्राशुनी तयाचे
कणकण मोहरती
बाळाचा प्रिय चंदामामा
करितो जादू नकळे
लिंबोणीच्या आड दडुन कधी
लपाछपी खेळे
चमचमणारे गुंफुन तारे
बांधियली तोरणे
गगनातुन चंद्रमा धरेवर 
फुलवी जीवन गाणे
सुरेशचंद्र जोशी
8 स्वस्तिक,
डोंबिवली (पश्चिम)
फोन नं. – 022-249513
  9769074526