व्यक्तित्व पुसतो, आणि कोरा राहतो
ऐन्यापरी संमुख उभे ते दावतो ||धृ||
व्यक्तीगणिक हा चेहरा बदलावया
कोशात मौनाच्या मना दडवावया
शिकलो जगाला पाहिजे ते व्हावया
भाषेत इतरांच्या सदोदित बोलतो ||१||
चर्चा म्हणा, मतभेद, वा भांडण म्हणा
उरतात जखमांच्या मनी खाणाखुणा
वेळी-अवेळी काढतो तो सल फणा
पुंगीपुढे पण मूग गिळुनी डोलतो ||२||
अस्तित्व याहुन वेगळे नाही मला
मोती हरपलेला रिकामा शिंपला
भिंतीसवेही डाव नाही रंगला
ती पोपडे, अन् मी तडे सांभाळतो ||३||