ज्याला जसे हवे ते बोलून मोकळा झाला!

गझल
ज्याला जसे हवे ते बोलून मोकळा झाला!
लचका हळूच माझा तोडून मोकळा झाला!!

धरणी तहानलेली, अद्याप शोधते त्याला;
तो एक मेघ होता.....बरसून मोकळा झाला!

स्वप्नात दंग होतो, मी निवांत निजलो होतो!
इतक्यात सूर्य मजला उठवून मोकळा झाला!!

मी कोण? पाहिले ना, बेफिकीर तो इतका की;
मी यार! अन् मला तो फसवून मोकळा झाला!

जखमांस धावदोरे घातले धांदलीमध्ये....
अन् काळ, त्याच जखमा उसवून मोकळा झाला!

लवलेश वास्तवाचा त्या वार्तेमध्ये नव्हता....
अफवेस तो बिचारा मिरवून मोकळा झाला!

घोटीव कागदासम, मज कातरलेही त्याने;
आरास उत्सवाची सजवून मोकळा झाला!

टाळूवरील लोणी मेलेल्याचे वाचेना;
मी कोण? तो मलाही, घुसळून मोकळा झाला!

मारू नये कधीही मेलेल्याला जग म्हणते.....
जो भेटला मला तो डिवचून मोकळा झाला!

होतो भिडस्त जात्या, ना म्हणता येतच नव्हते....
प्रत्येक सोयरा मज भरडून मोकळा झाला!

धरली अरे उभारी, मी कशीबशी खेळाया;
अन् डाव  लीलया तो उधळून मोकळा झाला!

-------प्रा.सतीश देवपूरकर
भूशास्त्र व खानिज तेल तंत्रद्न्यान विभाग,
 नौरोसजी वाडिया महाविद्यालय, पुणे.
फोन नंबर: ९८२२७८४९६१