गझल
मीहून स्वत: स्वप्नांच्या सरणावर गेलो होतो!
जीवना! तुझ्या, मी, भोळ्या हसण्यावर गेलो होतो!!
मी स्वत: पाडला होता पायावर धोंडा माझ्या!
असणे न पाहिले केव्हा, दिसण्यावर गेलो होतो!!
तसदी न दिली कोणाला, मी मेल्यावरती सुद्धा!
मी स्मशानातही माझ्या खांद्यावर गेलो होतो!!
इतक्याच कारणासाठी टाळती मैफिली मजला....
मी थेट सुरेश भटांच्या वळणावर गेलो होतो!
अभिमान वाटतो मजला या माझ्या हौतात्म्याचा!
मी खरे बोलण्यासाठी फासावर गेलो होतो!!
-------प्रा.सतीशदेवपूरकर
भूशास्त्र व खानिज तेल तंत्रद्न्यान विभाग,
नौरोसजी वाडिया महाविद्यालय, पुणे.
फोन नंबर: ९८२२७८४९६१