कदाचित

कदाचित

लक्षांत नसेल आलं तुझ्या कदाचित,

मी माळलेला जाईचा गजरा
घेऊन गेलास तू, 'त्या' दिवशीचा,
करंडक म्हणून, पण त्याला
रातराणीचा गंध येत होता.

लक्षांत नसेल आलं तुझ्या कदाचित,

डोंगरमाथ्यावर चिंब गवतांतून
अनवाणी पायांनी आपण भटकलो,
तळव्यांवर रेंगाळलेल्या हिरवाईला
गुलाबी छटेचं अस्फुट अस्तर होतं.

लक्षांत नसेल आलं तुझ्या कदाचित,

निरोप अखेरचा घेऊन तडक निघालास,
वळणावर थबकून थोडं, मागे पाहिलंस,
कोपर्‍यावरच्या स्थितप्रज्ञ अमलतासाचं
एक फूल हताश, हलकेच गळलं होतं.

प्रभाकर [बापू ] करंदीकर