अनाकलनीय

पुरंदरला लागून असलेल्या वज्रगडाबद्दल त्याला विशेष जिव्हाळा. माथ्यावर असणाऱ्या दगडांवर जाऊन बसल्यावर कसं अगदी निवांत आणि जगाच्या पलीकडे आल्यासारखं वाटतं.
गडाच्या मागच्या बाजूला आणि जरा आडवाटेवर असणारं पडझड झालेलं ते महादेवाचं छोटंसं मंदिर.
त्या जागेवरील निर्मळ शांतता; वाऱ्यामुळे होणारी पानांची सळसळ; आजूबाजूला भटकत फिरणाऱ्या भुंग्याची भुणभूण;  मंदिरात बसून बाहेर पाहिल्यावर दृष्टीस पडणारा तो बारकासा नंदी; आतल्या भिंतीच्या खोबणीत राहणारी ती घोरपड; अनंत काळ एकाच जागी स्थिर बसून राहण्याची तिची कला.. हे सगळं निराळंच ! 
शंकराच्या पिंडीपेक्षा इथल्या एकांताला, पावित्र्याला आणि निसर्गालाच त्याच्या अर्थी जास्ती महत्त्व.
आजकाल त्याला त्या जागेची, तिथल्या एकांताची आठवण येत होती. तिथे जाऊन महादेवाच्या पिंडीवर माथा टेकवण्याची इच्छा होत होती.
उद्या सकाळी निघून ३-४ तासात परत. तडकाफडकी निर्णय झाला. अचानक सांगून कोणी सोबत येणार नाही अशी खात्री होती. खरंतर त्याला तरी कुठे कोण बरोबर हवं होतं? त्यामुळे कोणाला विचारायचा प्रश्नच नव्हता.
सकाळी स्वारी निघाली. गाडी थांबली ते थेट पुरंदर वरच्या पार्किंग मध्ये. किल्ल्याच्या डागडुजीसाठी बरेच मजूर लोक आज किल्ल्यावर दिसत होते. रस्त्यांचे डांबरीकरण सुरू होते. पुरंदर माचीवर जाणारा रस्ता दुरुस्त करण्यात येत होता. तिथल्या पायऱ्या नव्यानं बसवण्यात येत होत्या.
रविवारच्या सुट्टीनिमित्त पुरंदरवर आज इतर लोकांनी सुद्धा गर्दी केली होती. कोणाच्या फ़ॅमिली ट्रिप्स होत्या तर कोणाच्या शाळेच्या सहली.
त्यानं वहीत नाव लिहून एंट्री केली.
"अकेले आये हो ?"
"हा साहब, भगवान के दर्शन करने आय हू"
"ठीके, पाँच बजने सें पहेले वापस आना"
तिथल्या सैनिकाने विचारपूस करायचं आपलं काम पार पाडलं.
इतकं झाल्यावर त्यानं वज्रगडचा मार्ग धरला. तो भैरव खिंडीमध्ये आला. संभाजी महाराजांच्या पुतळ्याला वंदन करून तो पुढे निघाला. 
वज्रगड नेहमीप्रमाणेच लोकांच्या गर्दीपासून अलिप्त होता.
किल्ल्यावर जायची पायवाट बऱ्याच वेळेस जाऊन आता पाठ झाली होती. ह्या वाटेवर कोणाचाही वावर नव्हता.
नेमक्या ह्याच निवांतपणाची त्याला प्रतीक्षा होती. त्यानं समोर उभ्या असलेल्या किल्ल्यावर एक नजर फिरवली.
किल्ल्यावर दिमाखात फडकणारा तो 'भगवा' आज थोडा वेगळाच भासत होता. अगदी रेखीव आणि नवीनच ध्वज लावला असावा कोणीतरी आणून. हे बघून खूप बरं वाटलं त्याला.
पुढे गेल्यावर धोतर घातलेले दोन मजूर दरवाजाच्या बाजूला असलेल्या बुरुजाचे बांधकाम करत होते. इथेपण लोक आले आहेत हे समजल्यावर तो थोडा नाराज झाला.
किल्ल्याच्या दरवाज्यामध्ये दोन मावळ्याच्या वेषांत असलेले पहारेकरी नजर ठेवून उभे होते. त्यांच्याकडे एक विचित्र नजर टाकून तो बिनधास्त दरवाज्यातून आतमध्ये घुसला.
आतमध्ये बरीच गर्दी दिसत होती.
डाव्या बाजूला असेलेल्या उंच खडकावर लावलेला भगवा झेंडा आता स्पष्ट दिसत होता. त्या खडकांवर देखील मावळ्यांचा वेष परिधान केलेले काही लोक उभे होते. प्रत्येक जण आपापल्या कामात गुंतला होता. गडाच्या इतर भागातसुद्धा काही लोक अश्याच प्रकारचा वेष परिधान करून वावरताना दिसत होते.
नक्कीच कोणत्यातरी चित्रपटाच किंवा कोणत्यातरी मालिकेच चित्रीकरण सुरू असावं.
शूटिंग वगैरे बघण्यात फारसा रस नसल्यानं त्यानं ह्या सगळ्या गोष्टींकडे दुर्लक्ष केलं. तो मंदिराच्या दिशेने चालत राहिला.
काही वेळानंतर तो महादेवाच्या मंदिराजवळ येऊन पोचला. आज तलावातलं पाणी अगदी नितळ आणि स्वच्छ दिसत होतं. मागल्या वेळेस हाच तलाव शेवाळ आणि प्लास्टिकच्या कचऱ्याने भरला होता. तलावाच्या शेजारीच असलेल्या मारुतीच्या मूर्तीला एकदम नवीन, सुंदर जरीकाठ असणारं पितांबर नेसवलेलं होतं. पणती मध्ये तेल भरून ठेवलं होतं आणि ती निवांत तेवत होती.
महादेवाच्या मंदिराबाहेरील नंदी आज एकदम चकाकत होता. जणू त्याला कोणी घासून पॉलिश केलाय. मंदिराच्या आतमध्ये आणि आजूबाजूला खूप स्वच्छता केलेली होती. पिंडीवर दुग्दाभिषेक सुरू होता. आजूबाजूला तेरड्याच्या फुलांचा सडा पडला होता.
आणि ह्या सगळ्याबरोबरच त्याला हवी असलेली शांतता आणि तो एकांत इथे टिकून होता. बाहेर लोकांची रेलचेल असतानासुद्धा मंदिराच्या आतमध्ये त्याचा मागमूसही नव्हता.
काही वेळ तो पिंडीच्या शेजारी ध्यान लावून बसला. त्या सुंदर निसर्गाचा आणि त्या जागेच्या पावित्र्याचा आस्वाद घेतला. मग थोड्याच वेळात छत्रपतींचा जयजयकार त्या मंदिरात घुमला.
आता त्याच्या मनाला जरा बरं वाटत होतं. कित्येक दिवसांपासून चालू असलेली घुसमट आणि अशांतता आता मनातून गायब झाली होती.
ह्या क्षणी त्याला खूप प्रसन्न आणि हलकं वाटलं. ह्या जागेला भेट देणं सार्थकी लागलं होतं.
सूर्य पश्चिमेला झुकू लागला होता. "हर हर महादेव" चा जयघोष करून त्यानं त्या जागेचा निरोप घेतला.
आजूबाजूचे लोक आपापल्या कामात मग्न होते. जणूकाही त्यांना ह्याच्याकडे लक्ष द्यायलासुद्धा वेळ नव्हता. त्यानंही लोकांकडे फारसं लक्ष दिलं नाही. सरळ भैरवखिंडीचा मार्ग धरला.
खाली उतरल्यानंतर त्यानं एका जवानाकडे ह्याबद्दल चौकशी केली.
"जी कोई फिल्म वाले आये हे क्या उपर वज्रगड पे ? इतने लोग कैसे उपर ?"
"जी नही सर्, कोई नही हे. आज तो वज्रगड पे शायद कोई नही गया. आप हि पहेले थे"
"जी नही, उपर तो बहुतसे लोग आये हे, शायद किसी फिल्म की शूटिंग चल रही हे"
"क्या बात कर रहे हे सर् आप ? ऐसी कोई एंट्री नाही हे हमारे पास. चलिये हम खुद चल के देख के आते हे"..
तो त्या सैनिकाबरोबर भराभर पावलं टाकत परत एकदा गडावर गेला. एव्हाना मनात शंकेची पाल चुकचुकली होती.
गडावर चिटपाखरू सुद्धा नव्हतं. होती ती फक्त भयाण शांतता. दिमाखात उभा असलेला भगवा ध्वज आता दृष्टीस पडत नव्हता.
तळ्यामध्ये शेवाळ आणि प्लास्टिकचा गाळ साठला होता. मारुतीच्या मूर्तीवरील वस्त्र अगदी विरून गेलं होतं. पणत्या कोरड्या पडल्या होत्या. नंदीवर प्रचंड धूळ साठली होती.
दृश्य बघताच त्याच्या पायाखालची जमीन सरकली. हे असं कसं शक्य होतं ? त्यानं त्याच्या डोळ्यांनी बघितलं होतं सगळ्या लोकांना. 
त्या व्यक्तींपैकी कोणीही आपल्याकडे बघितलंच नव्हतं, की बघून पण न बघितल्यासारखं केलं त्या लोकांनी ?
कोण होती ती लोकं ? त्यांच्यातला संवाद का ऐकू येत नव्हता  ??
असंख्य गोष्टी मनात येऊ लागल्या.
"सहाब अप को भ्रम हुआ होगा. चलीये नीचे, खामखा वक्त बरबाद हुआ मेरा.. " तो धक्क्यातून सावरत असतानाच सैनिकानं टिमकी वाजवणं सुरू केलं.
सपासप पावलं टाकून तो गड उतरू लागला. आपल्या बाबतीत काय घडलंय हेच त्याला उमगत नव्हतं. पण ते स्वप्न नक्कीच नव्हतं. ते वास्तव होतं.
तो घरी आला. मांडी घालून शांत बसला. स्वत:ला सावरण्याचा त्यानं जोरदार प्रयत्न सुरू केला.
ह्या घटनेला घाबरून न जाता सकारात्मक पद्धतीनं घेण्याची गरज जास्ती होती.
"हो, आपण मावळ्यांना पाहिलंय. महाराजांच्या जिवंत किल्ल्याला आपण प्रत्यक्ष पाहिलंय. असा अनुभव येण्यासाठी भाग्यच लागतं.
होय, आणि मीच तो नशीबवान आहे." त्यानं स्वत:ची समजूत घातली.
स्वत:बरोबरच खूप वेळ संवाद केल्यानंतर तो ताडकन उठला. आता त्याला ह्याच घटनेचा खूप अभिमान वाटत होता. त्याच्यात आत्मविश्वासाची एक नवीन लहर संचारली होती. तो स्वत:वरच खूश होता.
काही घडलंच नाही अश्या आवेशात त्यानं टीव्ही लावला. भारत - पाकिस्तान सामन्यात तो रमून गेला.