अन क्रूरकर्माला फाशी

अतिरेकी कसाबला फाशी दिली ती येरवडा कारागृहात ही बातमी सर्व चॅनेल्स वर तसेच सर्वांच्या तोंडी गेली.मी येरवडा कारागृहात

तुरुंग अधिकारी म्हणून सेवेला होतो हे माझ्या मित्रांना ठाऊक होते .त्यांनी फाशी कशी देतात हे विचारले मी देखील त्यांना थोडक्यात समजून सांगितले
 व माझ्या डोळ्यासमोर दोन फाशीची प्रसंग उभे राहिले.हा कार्यकाळ १९७७ते १९८२ चा आहे.
 ज्या ज्या वेळी हे दोन प्रसंग आठवतो तेव्हा तेव्हा मला घाबरल्या सारखे होते.
पहिला प्रसंग असा होता की;ज्या कैद्याला फाशी द्यावयाची होती त्याने एका यात्रेमध्ये
हनड्ग्रॅनेट फेकला होता तेव्हा त्या यात्रेत अनेक निष्पाप जीव मारले गेले होते.त्याच्या फाशीचे सकाळी आम्ही कारागृहातील सर्व
अधिकारीवर्ग व कर्मचारी चार वाजता फाशी यार्डमध्ये जमा झालो होतो आम्हा तुरुंग अधिकाऱ्यांना व रक्षकांना आमच्या वरिष्ठ तुरुंग
अधिकाऱ्यांनी कामे वाटून दिली होती. फाशी यार्ड मध्ये ज्या कैद्याला फाशी द्यायची आहे त्याला दुसरा एक कैदी हौदावर नेऊन
स्नान घालीत होता. त्याचे पायात त्यावेळी दंडाबेडी होती. ती दंडाबेडी काढून टाकण्यात आली. पुन्हा त्यास त्याचे खोलीत बसवण्यात आले. 
त्याचे समोर त्याचे दैवताचे फोटो व त्या फोटोजवळ उदबत्ती , दिवा लावण्यात आला होता. काही धर्म ग्रंथांचे पारायण दुसरे कैदी करीत होते. 
हे सर्व झाल्यावर फाशीगेट जवळील खोलीत त्यास हालविण्यात आले. या काळात तो कोणाशी बोलत नव्हता. त्याची मन:स्थिती ठीक नव्हती. 
हे सर्व तो डोळे मिटून मुकट्याने करीत होत. नंतर न्यायाधीश महाराज आल्याचे वर्दी देण्यात आल्यावर आमचे वरिष्ठ तुरुंग अधिकारी , 
अधीक्षक, वैद्यकीय अधिकारी या सर्वा समोर त्या कैद्याला उभे
करण्यात आले. त्याचे दोन्ही हातात बेडी टाकण्यात आली होती. दोन रक्षकांनी दोन बाजूने त्यास धरले होते. न्यायाधीश _
महाराजांनी ज्यावेळी त्याच्या पापाचा पाढा वाचून दाखविण्यास सांगितला , तेव्हा त्याने कसे कसे गुन्ह्याचे स्वरूप , वरचे कोर्टात
अपील व राष्ट्रपती कडे केलेल्या दयेच्या अर्जाचा तारीखवार तपशील सांगण्यात आला. दयेचा अर्ज फेटाळण्यात आल्यानंतर आज
रोजी तुझी फाशीची तारीख निश्चित करण्यात आल्याचे त्यास वाचून दाखविण्यात आले. त्यानंतर त्यास विचारण्यात आले की,
तुझी मालमत्ता जी काही आहे ती कोणास द्यायची आहे? तसेच अंगावरील ओळखीच्या खुणा तपासल्या जातात. हे सर्व तो ऐकण्याच्या
मनःस्थितीत नव्हता. नंतर त्याच्या अंगठ्याचा ठसा रजिष्टरमध्ये घेण्यात आला.नंतर त्याचा चेहरा काळ्या टोपीने संपूर्ण झाकण्यात
आला, व त्यास वधस्तंभाकडे दोन रक्षक नेऊ लागले.फाशी गेट ते फाशीचे प्रत्यक्ष ठिकाण हे अंतर थोडे असल्याने त्यास चालत
नेतात पण ते अंतर देखिल तो नीट चालत नव्हता . एकदा तर तो म्हणाला मला चालवत नाही व खाली बसला. कसेतरी करून
त्यास वधस्तंभा पर्यंत आणले गेले. तेथे त्या ठिकाणी उभे केल्यावर त्याचे पाय पट्ट्याने बांधण्यात आले. नंतर आमच्या एका रक्षकाने
नेटारे(काल्पनिक नांव)यानी त्याचे गळ्यात फांसा टाकला व तो आवळला तोच आमच्या वरिष्ठ तुरूंगाधिकाऱ्यांनी खटका ओढला तसे
मोठ्या दोन फळ्या हौद्यात उघडल्या गेल्या व त्यात त्या कैद्याचा देह लटकू लागला. मरेपर्यंत फाशी या तत्त्वानुसार त्याला लटक-
_वून ठेवण्यात आले. त्या हौद्याला पायऱ्या होत्या आमचे वैद्यकीय अधिकारी दर दहा मिनिटाने तपासू लागले. अंती ३० मिनिटाने
त्यांनी त्या कैद्यास मृत घोषित केले. नंतर आम्ही सर्व तेथून निघून गेलो. हा सर्व कालावधी दीड तासाचा असतो.
दुसरा प्रसंग असा की , त्याने (कैद्याने)आपल्या कुटुंबातील व्यक्तीची निर्घृण हत्या केली होती.
त्याला देखिल वरील प्रमाणे सर्व घटनाक्रम वाचून दाखविण्यात आला होता. त्याची मालमत्ता कोणाला तुला द्यायची असे
विचारल्यावर त्याने देखील काहीच प्रतिक्रिया दिली नाही त्याने मोठ्या निर्विकारपणे रजिष्टरवर अंगठा मारला व अतिशय निडरपणे
तो सर्व सोपस्कार करू देत होता. त्याच्या तोंडावर टोपी घालून त्याचा चेहरा झाकण्यात आला. वधस्तंभाकडे त्याला नेत असताना
तो मोठ्या धीमेपणाने पावले टाकत होता. त्याला जेव्हा वधस्तंभाचे जागेवर उभे केले तसा तो शांतच उभा होता. आमच्या
सुभेदारास त्याचे पाय पट्ट्याने बांधावयास सांगितले ते पट्ट्याने पाय बांधण्यास खाली वाकले असतानाच क्षणात काय घडते हे
कळण्याआधीच तो कैदी बेभान झाला आणि खाली बसला नि जोर जोराने लाथा झाडू लागला. दरम्यानचे काळात एक लाथ आमचे
सुभेदारांच्या छातीत बसली व ते खाली कोसळले. प्रसंगावधान साधून सोबत असलेल्या रक्षकांनी व इतर कर्मचाऱ्यांनी मिळून -
त्यास आवरले. नंतर क्षणात त्याच्या गळ्यात फास टाकून फासावर लटकवले. सुभेदार नंतर ४ दिवस दवाखान्यात उपचार घेत
होते. त्यांचे नशीब थोर त्यांना काही जास्त इजा झाली नाही. तो प्रसंग आठवला की, आजही अंगावर काटा येतो. नंतर चौकशी
करता असे लक्षात आले की, तोंडावर जो बुरखा घातला होता त्याचे बंध सैल राहिले असावे व त्यामुळे त्यास त्यातून दिसले
असावे. व त्यामुळेच तो बेभान झाला असावा.
फाशीच्या दिवशीचे वातावरण मात्र दिवसभर सुतक असल्याप्रमाणे गंभीर असते.
आम्हाला व कैद्यांना त्या दिवशी जेवण जात नाही. दिवसभर त्याचीच चर्चा असते.
परंतू जेव्हा फाशीवाल्यांची कर्मकथा आम्ही वाचतो तेव्हा असे वाटते की,अशा क्रूर कर्मांना
फाशी होणे योग्यच आहे.
अनंत खोंडे. १।१।२०१३.
भ्रमण ध्वनी'९८५०७५७८४३.