तू अशा वेळी अशी, उजळू नको!

गझल
तू अशा वेळी अशी, उजळू नको!
अन् अवेळी लोचनी तरळू नको!!

दोन हातांनी कुठे का थांबते?
लाट जाऊ दे, असे उसळू नको!

कागदी पानाफुलांचा हा बहर....
गंध वेड्यासारखा उधळू नको!

कोण आहे मोकळा इतका इथे?
शायरी सगळ्यांपुढे बरळू नको!

या अशा नजरा फुलांच्या बेरकी....
चालताना चांदणे निथळू नको!

वेचले अद्याप नाही चांदणे;
तोच तू माझ्यातुनी निखळू नको!

ठेव तू ताबा तुझ्या तोंडावरी!
लोक बोलू देत, तू बरळू नको!!

तू तुझे मालिन्य आधी दूर कर.....
पूर्ण दुनियेला असे विसळू नको!

आपले, परके तुला कळते कुठे?
बोलताना एवढे नितळू नको!

चेहऱ्यांना माणसे समजू नये....
मुखवट्यांना एवढा भुरळू नको!

कोण तू आहेस? हे तू जाणतो!
या स्तुती-निंदेमुळे वितळू नको!!

पसरते अफवा कधीही कोणती....
बातमी कुठली असो, हुरळू नको!

हे विडंबन, ही टवाळी व्हायची!
धूळ ही उडणार, तू धुरळू नको!!

केवढा घनदाट हा मतला तुझा!
मात्र कोठेही पुढे विरळू नको!!

रंग जो ज्याचा, तसा तूही पहा.....
त्यात कोणाची छटा मिसळू नको!

स्पंदने माझ्या उराची वाढती!
याद माझी तू उरी कवळू नको!!

-------प्रा.सतीश देवपूरकर
भूशास्त्र व खानिज तेल तंत्रद्न्यान विभाग,
नौरोसजी वाडिया महाविद्यालय, पुणे.
फोन नंबर: ९८२२७८४९६१