कोणते आहे खरे अन् कोणता आभास आहे?

गझल
कोणते आहे खरे अन् कोणता आभास आहे?
जे दिसे ते सत्य की, ज्याचा जिवाला ध्यास आहे?

काय हे पाहून सारे लोक भारावून गेले?
ही कुणाच्या वेदनांची मांडली आरास आहे?

आजही स्मरते.... मला तू भरवले होतेस आई.....
आजही माझ्या जिभेवर तोच पहिला घास आहे!

माझिया दारातही वृष्टी फुलांची काल झाली;
आज कळते त्या फुलांना निरनिराळा वास आहे!

नोंद इतिहासा! तुलाही घ्यायला लागेल माझी!
टाळता येणार नाही मी असा अनुप्रास आहे!!

सोसतो सुख त्याप्रमाणे दु:खही उपभोगतो मी;
ही मन:शांती नका  समजू विनासायास आहे!

चेहरे सुकले फुलांचे, या दिशाही खिन्न झाल्या....
रंग नाही, गंध नाही, हा कसा मधुमास आहे?

माझिया श्रद्धेमुळे मी एवढा चालून आलो!
पांगळा असलो तरी पायांवरी विश्वास आहे!!

-------प्रा.सतीश देवपूरकर
भूशास्त्र व खानिज तेल तंत्रद्न्यान विभाग,
नौरोसजी वाडिया महाविद्यालय, पुणे.
फोन नंबर: ९८२२७८४९६१