मटारीच्या सालींचे पराठे

  • पाव किलो मटारीच्या कोवळ्या शेंगांच्या साली,
  • कणिक
  • बारीक चिरलेली कोथिंबीर
  • बारीक चिरलेल्या मिरच्या (चवीनुसार)
  • मीठ (चवीनुसार)
  • पाणी (कणिक मळण्यापुरते)
  • तेल (पराठ्यांना लावण्यासाठी)
१ तास
तीन-चार जणांना एकवेळ जेवायला पुरतील असे

मटारीच्या कोवळ्या शेंगांमधील दाणे काढून घेतल्यावर साली भरपूर प्रमाणात निघतात. त्या सालींमध्ये आतल्या बाजूला एक पारदर्शक असे वातड पातळ आवरण असते जे सोलून बाजूला काढता येते. ही सोलासोली शिकेतो थोडी जिकीरीचे वाटू शकते पण पराठ्याची चव या सगळ्या कष्टांच्या पलिकडचे सुख देणारी आहे. असे साऱ्या सालींचे चिवट आवरण काढून घ्यावे. मग सोललेल्या सालींना किंचित पाणी, चिरलेली कोथिंबीर, मिरच्या, मीठासह मिक्सरमध्ये फिरवून एकजीव करून घ्यावे. या पातळ लगद्यात आता प्रमाणानुसार कणिक मिसळून तिंबून घ्यावे आणि पराठे लाटून तेलावर भाजून घ्यावेत.

दह्याच्या चटणीसोबत हे पराठे खाताना इतके लाजव्वाब लागतात की क्या कहने!
या पाककृतीचे सारे श्रेय हे माझ्या आईचे आहे. तिने एकदोनदा या सोललेल्या सालींची बटाटे घालून भाजी केली होती जी घरात तितकीशी रुचली नव्हती त्यामुळे तिने ही नवी शक्कल लढवली जी आमच्या घरात निरतिशय वाखाणली गेली आहे. प्रत्येकाने किमान एकदातरी हे पराठे चाखून बघायलाच हवेत!
सौ. आई