गाजर वडी

  • किसलेले गाजर अडीच वाट्या (गाजराची साले काढून घ्या)
  • साखर २ वाट्या
  • रिकोटा चीझ अथवा खवा पाऊण वाटी
  • साजूक तूप पाव वाटी
१ तास
२ जण
मध्यम आचेवर एका कढईत साजूक तूप व किसलेले गाजर घालून परतून घ्या. नंतर त्यावर झाकण ठेवा म्हणजे वाफेवर गाजर शिजेल. झाकण काढून परत एकदा कालथ्याने परता. असे २-४ वेळा करा म्हणजे गाजर व्यवस्थित शिजेल. गाजर शिजण्याकरता पाण्याचा वापर करू नका.
आता हे शिजलेले गाजर एका भांड्यात काढून ठेवा. त्याच कढईत २ वाट्या साखर घाला. साखर पूर्णपणे बुडून अगदी थोडे वर राहील इतके पाणी घाला. आच मध्यम असू देत. साखर विरघळायला लागेल. एकीकडे चमच्याने हालवत राहा.  अधूनमधून यातले काही थेंब एका वाटीत काढून पाक कसा होत आहे त्याचा अंदाज घ्या. एकतारी पाक करा. एकतारी पाक झाला की २-३ मिनिटांनी त्यात शिजवून घेतलेले गाजर व रिकोटा चीझ घाला. रिकोटा चीझ घट्ट असते ते कालथ्याने पूर्णपणे मोडून घ्या. कालथ्याने हे मिश्रण ढवळत राहा.  हे मिश्रण काही वेळाने खूप उकळायला लागेल.

आता थोडी आच वाढवा. आता हे मिश्रण एकत्र होऊ लागेल व आटायला लागेल. हे मिश्रण खूप आटवायला लागते.  कालथ्याने मिश्रण सतत ढवळत राहावे. काही वेळाने हे मिश्रण कोरडे पडायला लागेल. आता गॅस बंद करा व बाजूच्या शेगडीवर कढई ठेवून हे मिश्रण परत एकदा ५ मिनिटे ढवळत राहा. काही वेळाने या मिश्रणाचा कोरडा गोळा तयार होईल.
आता हा गोळा एका तूप लावलेल्या ताटात काढून तो लगेच एकसारखा थापा. थापण्याकरता एक पातळ प्लॅस्टिकचा कागद तुपाचा हात लावून घ्या. मिश्रण कोमट झाले की वड्या पाडा. खूप गार झाल्यावर वड्या डब्यामध्ये काढून ठेवा.

या वड्या खायला खुसखुशीत लागतात. व गाजराच्या असल्याने रंगही छान येतो.

टीपा नाहीत

मी