लाल जनिका : जगातील १० वे आश्चर्य

ST ची  लाल जनिका : जगातील १० वे आश्चर्य 

( हे छायाचित्र स्पष्ट दिसत नसेल तर ह्या दुव्यावर टिचकी मारा. दुवा क्र. १

हीच ती वेळ... आणि हीच ती जागा  ( जेव्हा मी हे छायाचित्र टिपले आणि )
जेव्हा माझ्या मनात आले की ST चा लाल डबा म्हणजे खरंच जगातले १० वे आश्चर्य
असावयास हवे.
वास्तविक, छायाचित्रात टिपलेली ST पकडण्यासाठीच आम्ही किल्ल्यावरून जवळ जवळ
पळतच उतरत होतो. आणि आमचा अंदाज जरा ( जास्तच) चुकला आणि किल्ल्याच्या
प्रवेशद्वारापाशी असतानाच ती आम्हाला वाकुल्या दाखवत निघून जात होती.
साल्हेरवाडी या गावात येणारी आणि तोच शेवटचा  थांबा असल्याने तिथूनच परत
जाणारी हि सकाळची एकच गाडी होती. पूर्ण दिवसात फक्त २ वेळा येणारी गाडी
पकडण्यासाठी आम्ही किल्ला उतरताना फोटो काढायचे नाहीत असे ठरवले आणि
त्यामुळेच पूर्ण ट्रेक चे फोटो १४०० पर्यंतच  मर्यादित राहिले. ( इथे मला
गहिवरून आलेले आहे ).
तर मुद्दा हा की हि साधी सुधी जनिका आश्चर्याचा विषय अशी असू शकते?
मग मला आठवले माझ्या याच भ्रमंतीच्या जोडीदाराने प्रत्येक वेळी त्याची
कर्तव्ये नियमित आणि वेळेत पार पाडली आहेत.  हा ( जोडीदार म्हणून हा ) कधी
पूर्ण लाल सदरा घालून येतो तर कधी पांढरा सदरा आणि हिरवी टोपी.... कधी लाल टोपी घालून येऊन माझे "परिवर्तन" झालेय म्हणतो. कधी हा
स्वतः नाही आला तर "ऐरावत" सारख्या त्याच्या मोठ्या भावास पाठवून  देतो.
हा कुठे आणि कधी भेटेल याचा नेम नसतो पण आपण मात्र कायम याच्याच आगमनाकडे
डोळे लावून असतो. कधी त्याच्या क्षमते पेक्षा जास्त समान आणि लोक घेऊन जातो
तर कधी एकटाच रमत गमत जातो. कधी किल्ल्याच्या पायथ्या पर्यंत आम्हाला
पोहोचून तिथेच तळ ठोकतो, तर कधी आज मला बिलकुल वेळ नाहीये, "I'm god damn
busy today" अश्या "माजात" परत निघून जातो.
हरिश्चंद्रा ची चढाई करायला निघालो की खिरेश्वर पर्यंत सोडायला हा संध्याकाळ
४:३० पासूनच तयार असतो. तिथे पायथ्याशीच राहतो आणि सकाळी आम्ही चढाई सुरू
केली की मग आपला परत निघून जातो.  माहुली ला गेलो की मात्र याचे काय बिनसते
काय माहीत. येतच नाही हा  पठ्ठ्या.
याला न कोणाची स्पर्धा न कोणाची भीती. याचे १६००० भाऊबंद दररोज महाराष्ट्रभर
हिंडत फिरत असतात. हिंडताना ते कधी लोकांची पार्सल घेऊन येतात कधी काहींचा
संपूर्ण संसार... तर कधी  लग्नाचे पूर्ण व्हरांडा.. रोज जवळ जवळ ७० लक्ष
प्रवासी प्रवास करतात ते याच्या संगतीनेच....  १७००० पेक्षा जास्त रस्ते
माहीत आहेत याला आणि संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढलाय याने.. छोट्या आणि
चिंचोळ्या रस्त्यावरून सलग ९-१० तास प्रवास करतो.. असे एकाही गाव नाही जिथे
हा दिवसातून एकदातरी "फ्लाइंग व्हिजिट " देत नाही.  
शहराच्या ठिकाणी जरी हा वेळेला महत्त्व देत असला तरी दुर्गम ठिकाणी गेल्यावर
माणुसकीला आणि स्वतःच्या उपयुक्ततेला  जास्त महत्त्व देतो. ज्येष्ठ नागरिकांना
आणि लहान मुलांना कमी खर्चात तर नेतोच पण नोकरदारांना मासिक पास देऊन सवलत
हि देतो. सुट्टीच्या काळात तर याची गरज इतकी भासते की आगाऊ आरक्षण करूनही
नेत नाही मग तो आपल्याला.

रोजच्या बा-चा-बा-ची चा याला काहीही फरक पडत नाही आणि अगदी पु. ल. नी वर्णन
केल्याप्रमाणे "बा" च्या विभक्तीचे प्रत्यय लावून भांडणे सुरू झाली की मात्र
इंजिन बंद करून रस्त्याच्या कडेचा आश्रय घेतो. अशोक सराफांनी
म्हणाल्याप्रमाणे.. "हमारा बस हे  ना.. वो सर्वसामान्य के बस मे हे. "

काही गोष्टी न पटणाऱ्या  करतो.. पण "अडला हरी गाढवाचे पाय धरी" या उक्तीप्रमाणे सहन करून घेतो आम्ही.
जास्तीत जास्त निकृष्ट आणि गचाळ अश्या खानावळीत जाऊन थांबतो. थुंकसंप्रदायी
लोकांनी पान/तंबाखू  खाऊन उडवलेले ते "मंगलाचे सडे" पुसायची त्याची अजिबात
इच्छा नसते. उलटीचा सुकाणू "सुगंध" कायम दरवळत राहावा अशी काही त्याची
अपेक्षा असते. त्याच्यामधील बसण्यासाठी व्यवस्था केलेले  बाकडे हे निव्वळ बाकडे
याच अर्थाने तो घेतो आणि त्यात कापूस, स्पंज याचा ठावठिकाणा लागून देत
नाही. संतोष मानेसारखा रंक ( सभ्य शब्दात वर्णन) जेव्हा मात्र याचा ताबा
घेतो तेव्हा  क्षणार्धात या वाल्मीकी चा परत वाल्या कोळी होतो.
अजून एक प्रश्न तुम्हाला पडला असेल तो म्हणजे दहावेच आश्चर्य का? नववे का नाही??

 कारण मी तरी आजतागायत आठच आश्चर्य ऐकली आहेत आणि एक जागा ठेवून हे दहावे.
मधली जागा इतरांनी शोधलेल्या आश्चर्यासाठी अथवा एवढा निरर्थक लेखनप्रपंच
केल्यामुळे माझ्यासाठी असेल बहुतेक.