श्वास माझा संपताना सूर आले ओळखीचे
कोण आहे गात येथे गीत जे माझ्या मनीचे
मावळूनी चालल्या दाही दिशाही लुप्त झाल्या
कोठवर जपणे स्वतःला अंतरी ऊर्मी निमाल्या
व्यर्थ आशा दाखवावी व्यर्थ मजला गुंतवावे
हे असे का चालवीसी पोर चाळे संपवावे
जगत भासाचे कवडसे आणि आशेचे झरोके
काय कामाचे मला हे पाट खोटे मृगजळाचे
सांग कोठे लुप्त झाल्या ज्या सरींनी चिंब झालो
काव्य रसना प्रसवलेली तीच मी आकंठ प्यालो
वाटते माझ्याचसाठी गोष्ट काही तू करावी
ऐक मित्रा याचवेळी ओळ कवनाची स्फुरावी