गवार - बटाटा

  • गवारीच्या शेंगाचे तुकडे ३-४ वाट्या
  • १ शिजलेला बटाटा (फोडी करून)
  • लाल तिखट १ चमचा
  • धनेजिरे पूड १ चमचा
  • गरम मसाला/गोडा मसाला १ चमचा, मीठ
  • गूळ ५-६ चमचे
  • दाण्याचे कूट मूठभर, ओल्या नारळाचा खव ४-५ चमचे
  • फोडणीसाठी तेल
  • मोहरी, हिंग, हळद
४५ मिनिटे
२ जण

कुकरामध्ये गवारीच्या शेंगांचे तुकडे शिजवून घ्यावे. शिजवताना त्यात थोडे पाणी घालावे. कुकर गार झाला की शिजलेल्या गवारीच्या शेंगा बाहेर काढा. त्यातले पाणी एका वाटीत काढून ठेवा. गॅसवर कढई मध्यम आचेवर तापत ठेवा. ती तापली की जरूरीपुरते तेल घालून ते तापवा व मोहरी हिंग हळद घालून फोडणी करा. नंतर त्यात शिजलेल्या गवारीचे तुकडे, बटाट्याच्या फोडी, लाल तिखट, धनेजिरे पूड, गरम/गोडा मसाला, मीठ व गूळ घाला. भाजी ढवळून घ्या. नंतर त्यात दाण्याचे कूट व खवलेला ओला नारळ घाला. शिजलेल्या गवारीच्या शेंगेतले पाणी काढलेले आहे ते त्यात घाला. जरूर वाटल्यास अजूनही थोडे पाणी घालून भाजी थोडी उकळू दे. जास्त पाणी नको. ही भाजी थोडी ओलसर असावी. आवडत असल्यास थोडासा रस ठेवायला हरकत नाही. गवार ही चवीला खूप उग्र असते त्यामुळे त्याला गूळही बराच घालावा लागतो. तिखट गूळ व बाकीचा मसाला थोडा जास्तच घालावा लागतो तरच ही भाजी चविष्ट लागते. या भाजीत बटाट्यासारखे शिजलेल्या लाल भोपळ्याचे तुकडेही छान लागतात.

टीपा नाहीत.

सौ आई