३ वाजले का?

"नमश्कार, आदाब, देवीयों और सज्जनों कौन बनेगा करोडपती के इस भाग मे आपका बोहोत बोहोत स्वागत है !" - असे म्हणणारा अमिताभ बच्चन आठवतोय  का ? -- आता तुम्ही म्हणाल तो कोणाला आठवणार नाही, पण खरी गंमत अमिताभची नाहिचे, त्याच्या जाहिरातीत नाही का शंभरी गाठलेली कोणीतरी आजी, हॉस्पिटलमधले पेशंट, शाळेतले शिपाई, मंत्री-संत्री, कॉलेजकुमार/कुमारी सगळे एकमेकांना विचारत असतात - ९ बज गये क्या ? !

तसाच, अगदी तसाच प्रश्न सध्या अवतीभवती ऐकायला मिळतोय, फक्त वेळ बदलली आहे- ९ च्या ऐवजी ३ बज गये क्या ? असे झाले आहे. - का ? असे विचारणाऱ्यांना एक Hint देतो - 'पासपोर्ट' ! (हं... आता कसे ओळखलेत, सुज्ञास सांगणे न लागे  !)

तर, जेवढ्या आतुरतेने लोक अमिताभच्या कौन बनेगा ची वाट पाहायचे तसेच, किंबहुना एखादा टक्का जास्तच वाट दुपारी ३ ची पाहत असतात. बरोबर ३ वाजता पासपोर्ट सेवा केंद्राची ऑनलाईन खिडकी उघडते, आपापल्या संगणकाचा, लॅपटॉपचा, इंटरनेटचा स्पीड शक्य तेवढा हाय ठेवून लोक धडाधड क्लिक करत सुटतात, पहिल्या ६३० (सुमारे  - हा आकडा खरा असेल ह्याची खात्री नाही) लोकांच्या नशिबी अपाँटमेंट ची लॉटरी लागते, बाकीचे आपले बसतात वाऱ्या करत... !

आमच्या मंडळींचा पासपोर्ट काढण्याची सुरुवात अशीच झाल्याने मी ह्या प्रक्रियेचा फार जवळून अनुभव घेतला आहे, अस्मादिकांचा पासपोर्ट हा शिस्तीत काढलेला (म्हणजे लाच न देता असल्याने, एजंटबाजीला आपला विरोध .. अर्थात नको तिथे विरोध नसतो, पण जे काम आपण सहज करू शकतो त्यात फुकट लाल नोटा कशाला घालवायच्या ?) त्यामुळे आम्हीच ती जबाबदारी घेतली होती.

ऑनलाईन फॉर्म भरणे हे खूप सोपे आहे, परंतु अपाँटमेंट मिळवणे हा महत्कष्टाच विषय ! ती वेळ काही मिळता मिळत नाही, लोकं २.४५ पासून लॉगिन करून असतात, आणि मग सुरू होते ती क्षणा क्षणाची प्रतीक्षा.... ०२-५९-५८ आणि क्लिक !

समोर फक्त १ दिवसाचे  ७-८ स्लॉट्स दिसतात, त्यावरील एकावर क्षणात क्लिक करावे लागते आणि त्यातही तुमच्या संगणक आणि मायाजालाच्या वेग चांगला नसेल तर तुमच्या नशिबी येते ती म्हणजे एक  बोल्ड लाल रंगातली सूचना - "हि अपाँटमेंट कोण्या दुसऱ्याने बुक करून घेतली आहे, कृपया दुसरी वेळ घ्यावी" ! - इंटरनेट ला शिव्या हासडत तुम्ही पुन्हा लॉगिन करता, आणि बुक अपाँटमेंट वर क्लिक केल्यावर तुमच्या तळपायाची आग मस्तकात जाते, कारण तोपर्यंत घड्याळात ०३-०२-०१ देखील झालेले असतात, आणि आपल्यासमोर येते ती म्हणजे अत्यंत नम्र पाटी -> "आजच्या दिवसाच्या वेळा संपल्या आहेत, कृपया उद्या दुपारी ३ नंतर प्रयत्न करा" !

 अशावेळी पाट्यांचे शहर ह्या बिरुदाचा अत्यंत राग येतो परंतु जागीच चरफडत बसणे आणि वाचकांच्या पत्रव्यवहारात त्रागा करून घेणे ह्याव्यतिरिक्त आपण काही करूही शकत नाही ! समदु:खी माणसे जमवून निषेध वगैरे नोंदवणे जरा अवघड मामला आहे, त्यातही समजा सगळे लोक एकत्र येऊन सुवर्णमध्याच्या तोडग्यादाखल एखादे चर्चासत्र घ्यायचे झाले तर नेमके "ते" अधिकारी अनुपस्थित राहतात !

बरं ही अपाँटमेंट घेतलेली असली आणि एखादे डॉक्युमेंट नसेल/हजर नसाल तर ती रद्द होते, आणि पुन्हा पहिले पाढे पंचावन्न - अर्थातच पहिल्यापासून फॉर्म भरून त्याच तिकिटावर तोच खेळ !!

अनेकदा तर तुम्ही एका संगणकावरून वेळ घेताना "कॉमन IP ADDRESS" अशी ERROR येते, त्यामुळे काही नेट-कॅफे वाल्यांनी आपल्या संगणकाचा IP बदलत ठेवण्याची करामत करतानाही मी पाहिले आहे. ( केवळ माहीत असावे म्हणून -> एजंट लोक किमान १००० रुपये घेतात फक्त अपाँटमेंट मिळवण्याचे बाकीचे उद्योग तुमचे तुम्हीच करायचे)

२ महिन्यांच्या प्रदीर्घ कालखंडानंतर आम्ही पुन्हा एकदा रात्रपाळीवर रुजू झालो आणि त्यामुळे आम्हाला दुपारी २.५८ ला संगणकासमोर बूड टेकून बसायची संधी मिळाली, पहिली अपाँटमेंट मंडळींचा रहिवासी पुरावा ( गवर्नमेंट गॅझेट, तुमच्या आजी आजोबांचे वीजबील, तुमचा पासपोर्ट (मंडळींचा उल्लेख नसलेला) चालत नाही ! ) नव्हता त्यामुळे ती रद्द झाली होती. आणि आज अनेक दिवसांनी पुन्हा तो सुवर्णक्षण आला... !

अगदी वेळेत क्लिक केले आणि एका नाही तर २ दिवसांचे स्लॉट दिसू लागले, माणूस अनुभवातून शहाणा होतो असे म्हणतात - त्यामुळे मी सर्वात शेवटचा स्लॉट वर क्लिक करून चित्रविचित्र आकडे/अक्षरांचे व्हेरिफिकेशन करून एंटर केले !

आमच्या मंडळींना अपाँटमेंट मिळाली आता परवा आम्ही अर्ज भरून पुढील ट्रीप च्या विचारांत मग्न होऊन जाऊ, अर्थात - "एकमेकां साहाय्यं करू... अवघे धरू सुपंथ.." ह्या न्यायाने मी लागलीच माझे फेसबुक स्टेटस अपडेट केले !

"पासपोर्ट अपाँटमेंट मिळत नसल्यास sharp २.५५ ला लॉगिन करून प्रयत्न करावा, एकदा न झाल्यास थकून न जाता IP चेंज करून पाहावा किंवा एखाद्या कॅफे मधल्या दुसऱ्या संगणकावर प्रयत्न करावा...अपाँटमेंट नक्कीच मिळेल, आणि आपल्या कष्टातून एजंटचे पैसे वाचवल्याचे समाधान देखील, अगदीच नाही जमले तर मला सांगा - मी आता एक्स्पर्ट झालो आहे ह्या कामात. रात्रपाळी असेपर्यंत मी दुपारी लॉगिन करून वेळ मिळवून देऊ शकतो" (अर्थात ही सूचना जनहित में जारी, म्हणजेच पुणेरी मराठीत -  फुकटात !)"

--

आशुतोष दीक्षित

थोडीशी आणखी मदत,

१) पासपोर्ट प्रक्रिया सोपी आहे, एजंटबाजी शक्यतो टाळावी (ज्यांना सहज जमेल त्यांनी तरी) - वेबसाइटवर , फॉर्म भरणे, डॉक्युमेंटस ऍड्व्हायसरी      म्हणजेच कोणती कागदपत्रे लागतात त्याविषयीची सविस्तर आणि निटनेटकी माहीती दिलेली आहे.

२) पासपोर्ट सेवा केंद्रात अपाँटमेंटच्या केवळ १५-२० मिनिटे आधी जावे, लवकर जाऊन फायदा होत नाही !

३) आत गेल्यावर ४ काउंटर्स वर डॉक्युमेंट वेरिफिकेशन होते, मग तुम्हाला एक फाइल दिली जाते (Online फॉर्म भरल्याचा हा फायदा, तिथे सिस्टिम मध्ये सगळी माहीती अगोदरच आलेली असते)

४) ती फाइल घेऊन पुन्हा A B C  काउंटर्स वर जायचे, तिथे फोटो काढतात, हाताचे ठसे घेतात, ओरिजनल डॉक्युमेंट सेट चेकिंग होते, तोंडी व्हेरिफिकेशन होते, ( C काउंटर सकाळी १० शिवाय उघडत नाही बरं का, तिथे फाइल पुन्हा जमा करून घेतात) आणि मग तुम्हाला पैसे भरल्याची पावती मिळते. ती घेऊन घरी जाणे आणि पोलिस व्हेरीफिकेशन ची वाट पाहणे