कवीचे प्राक्तन

कवीचे प्राक्तन

तापले वास्तव खाली
पाउल मनाचे जाळी
कोरड्या ओठांवरती
चार कवितेच्या ओळी
 मी कवी!

'भ्रमिष्ट' म्हणती जरा ते
भोवती कुजबुज चाले
काहीच त्याचे नाही
कवितेचे धुंद प्याले
मी कवी!

शिशिराचे गळता पान
जीवघेणी ह्रुदयी कळ
कविता घेऊन येते
पुष्पांची वसंत सळसळ
मी कवी!

अर्थ जहरी फुटताना
शब्दांची चिरते जीभ
ओळींच्या अपूर्णतेची
चालते अखंड तगमगमी कवी!

वेचताना शब्दांचे
विखुरले कंच टपोरे
हात जोडूनच येती
काव्याची रांगत पोरे
मी कवी!

प्राक्तन कवीचे आहे
माथ्यावर जळते ऊन
तशातच नव-कवितेची
कानात गुंजते धून
मी कवी!

उ. म. वैद्य २०१३.