रेंगाळलेली स्वप्न

द ब्लीझार्ड चं "पियर्सिंग द फॉग" चालू झालं.
मी गाडीचा accelerater पिळला. एखाद्या चित्त्याने अत्यंत चपळाईने काही क्षणात प्रचंड वेग पकडावा, लाल अप्पाने अगदी तसाच तुफान वेग गाठला. गाडीचा काटा शंभरावर जाऊन स्थिरावला. आपण जगाच्या बरेच पुढे आलो आहोत अशी भावना मनात चमकून गेली.
मग आरशामधून मागून येणारा एक दिवा दिसला. निळ्या पल्सरवर मागून दत्त्या आला. बराच वेळ दोन्ही गाड्या समांतर चालत होत्या. स्पीडोमीटरचे काटे शंभरच्या वरतीच थरथर करत होते. दोन्ही गाड्यांच्या दिव्यामुळे आता खूप लांबपर्यंतचा रस्ता स्पष्ट दिसत होता.
पहाटेच्या वेळी हायवे वर अजून किती वेळ ह्याच वेगात गाड्या समांतर हाकायचा ? हा विचार मनात आल्यानं मी दत्त्याकडे एक नजर टाकली. माझ्या नजरेकडे बघून त्यानं आनंदानं एक स्माईल मारली आणि त्यानं चक्क accelerater पिळवटला.
शंभर - एकशेपाच वरून पल्सर सुसाट पुढे निघाली आणि काही सेकंदातच बरीच दूर गेली. एन एच ४ हा हायवे आता गाड्यांचा जिगरी दोस्तच बनला होता. तो सोबत असला की गाड्या कश्या सुसाट निघायच्या.
आता खंडाळा घाट लागला. गाड्यांचा वेग कमी झाला. घाटातल्या नेहमीच्या स्पॉटवर एक अप्पा आणि दोन पल्सर रस्त्याच्या कडेला लागलेल्या मला दिसल्या.
त्यात लाल आप्पाची भर पडली. पहाटेचे साधारण साडेचार झाले असतील. आकाश असंख्य चांदण्यांनी भरलं होतं. ड्युक्स नोजच्या बाजूला शुक्राची प्रखर चांदणी लक्ष वेधून घेत होती. वातावरणात आणि प्रत्येकाच्या मनात खूप प्रसन्नता होती. एक दोन फोटो झाल्यावर सगळे पुढे निघालो. अजून बरीच मजल गाठायची होती. किल्ला सर करून आजच्या आज घरी परतायचं होतं.

धून बदलली. "शिकेन"चं "फ्री" चालू झालं
मी सीडी प्लेयरचा आवाज वाढवला. खूप लांबसडक बोगद्यामधून माझी ऑक्टेविया सुसाट वेगानं बाहेर पडली. गाडीत सहा टगे ठासून ठासून भरले होते.
शिकेनच्या मंत्रमुग्ध करणाऱ्या सिंथेसाइझरवर सगळ्यांची अंग डोलत होती. थोड्या वेळानं बाहेर मुसळधार पाऊस सुरू झाला. थोडं अंधारून आलं. मी गाडी बाजूला लावली. आता सुमंत ड्रायविंग सीटवर बसले. त्या वातावरणात गाडी बुन्गवण्याचा मोह त्यांना आवरला नाही. खंबाटकी संपल्यावर डावीकडे असणाऱ्या टपऱ्यांवर गाडी चहा आणि भजी खायला थांबली. गरमागरम भजीसोबत, अंगावर पावसाचे तुषार झेलत, चिंब चिंब अवस्थेत वाफाळलेल्या चहाचा एक एक घोट घेताना प्रत्येक जण एकमेकांकडे निरखून बघत होता. आपण एकेकाळी काय होतो, आज काय आहोत हाच विचार प्रत्येकाच्या मनात. तोंडातून एक शब्दही न काढता खूप मोठा संवाद सुरू होता. परिस्थिती बदलली तरी मैत्री बदलली नाही. प्रत्येकाच्या मनात एकच भावना दाटून येत होती.. - "दिल चाहता हे, हम ना रहे कभी यारो के बीन !"

सुसाना च्या "डाउन टू नथिंग"नं मला पुरती भुरळ घातली होती.
रात्र झालेली. सगळं जग निजलं होतं. मला स्वतः:साठी थोडी उसंत मिळाली होती. आज बऱ्याच दिवसांनी मी टेलिस्कोप लावला होता. चंद्रानं सुद्धा आजचा आकाशातला मुक्काम संध्याकाळीच हालवला होता. त्यामुळे आकाशातल्या ताऱ्यांना आज मला निवांतपणे न्याहाळता येणार होतं.
आज रात्रीमध्ये किमान ८ खगोलीय गोष्टी तरी टेलिस्कोपवर लावायच्याच असं ठरवलं होतं मनाशी. ह्या आठ गोष्टी मी अजूनपर्यंत कधीच टेलिस्कोप मधून पहिल्या नव्हत्या. लिस्ट मध्ये पहिलाच रोसेट  नेब्युला होता. मृगाच्या अल्याड - पल्याडचं अवकाश पालथं घातलं. पण काही केल्या सापडत नव्हता. बारा इंची टेलिस्कोप मधून त्याला शोधणं खरंतर फारसं अवघड जायला नको होतं. पण जमतच नव्हतं. कदाचित मी आज खूप दिवसांनी टेलिस्कोप घेऊन बसलो होतो त्यामुळे असेल.
तितक्यात कोणीतरी हळूच गरम गरम आलं वाल्या चहाचा एक कप शेजारच्या टी-पॉय वर आणून ठेवला. मी लगेच कप तोंडाला लावला. फुरका मारून मी त्या घोटाचा आस्वाद वाढवला. अंगात एक नवी लहर संचारली. अधिक लक्ष देऊन प्रयत्न सुरू झाले. पुढच्या काही मिनिटांमध्येच मी त्याला टेलिस्कोपच्या आरशात बंद केला. त्या सुंदर, लाल गुलाबासारख्या दिसणाऱ्या ढगाला मी अनेक सेकंद बघितलं. अंतराळातल्या बहुतांश गोष्टी आत्तापर्यंत फक्त फोटोमध्ये बघत आलो, त्यातली एक गोष्ट आज स्वतः:च्या डोळ्यांनी पाहत होतो. मनाला अपार आनंद मिळत होता. कानामध्ये ट्रांस सुरू होता. ओठावर गरम चहाची चव रेंगाळत ठेवून तासंतास आकाशात बघत बसायचं. ह्याच गोष्टीसाठी जन्म आपुला असं मनात वाटत होतं.

आता Dash Berlin चं एव्हिएशन सुरू झालं.
अर्मिन चा "अ स्टेट ऑफ ट्रांस ६५०" ह्या वेळेस पुण्यात होणार होता. Dash Berlin आणि ATB ह्यांची उपस्थिती ह्या शो चं खास आकर्षण होतं. आम्ही फार आधीच तिकीट काढून जागा पक्की केली होती.
कौंटडाऊन सुरू झालं. टेन नाईन एट, सेवन, सिक्स फाईव्ह फोर थ्री टू वन ... आणि  पुढच्या क्षणाला अपोलो रोडचा ठेका आमच्या मनावर स्वार झाला. उपस्थित असणाऱ्या प्रत्येकाच्या शरीरावर एकच लाट उसळली. अंग वाटेल तसं वेड्यावाकड्या पद्धतीनं डोलू लागलं. दांड्या, निऱ्या, दत्त्या, केदार .. सगळे बेभान होऊन नाचत होते...
कार्यक्रम संपत आला तेव्हा ATB नी "आय डोंट वना स्टॉप" लावलं. ते ऐकून कार्यक्रम संपत आला नसून आत्ताच सुरू झालाय असं वाटून गेलं. त्या धुंदीतून कोणालाच बाहेर पडायची इच्छा होत नव्हती. ह्याच क्षणासाठी प्रत्येकानं अनेक महिने प्रतीक्षा केली होती आणि आज तो क्षण  प्रत्यक्षात आला होता.
हे जगच वेगळं होतं. कार्यक्रमाच्या नावाप्रमाणेच आर्मीन नं आम्हाला वेगळ्याच विश्वात नेलं होतं. वी वर इन, अ स्टेट ऑफ ट्रांस !

ATB चं 'ब्यूटिफुल वर्ल्ड्स' कानात रेंगाळत होतं.
ती एक सुरेख संध्याकाळ होती. सूर्य क्षितिजाच्या पलीकडे हळू हळू आपलं अंग लपवत होता. क्षितिजावर असलेले काळे ढग आणि त्यांच्यातून प्रवास करणारा केशरी, भगव्या रंगाचा प्रकाश. पक्षी आणि वाघुळे आपापल्या घरच्या रस्त्याला लागली होती.
"वा काय सुंदर दृश्य आहे नै ? "माझ्या तोंडून शब्द बाहेर पडले आणि शांतता भंग पावली.
"तो पण थकलाय रे दिवसभर तळपून, निजतोय शांत" तिनी माझ्या उजव्या खांद्यावर डोकं ठेवून प्रतिक्रिया दिली.
आमच्याबरोबर संजीवनी वरचा तो बुरूज त्या सुंदर क्षणाचा साक्षीदार होता. विचारांची खोली खूप वाढली होती. नजर खूप लांबवरच्या गोष्टींचा वेध घेत होती.
इतक्यात कानावर आवाज आला "ताक घ्यायचं का ताक? " मागे कोंढाबाई आणि किशोर ताकाची किटली घेऊन उभे होते.
काही वर्षांपूर्वी किशोरला पहिल्यांदा पाहिलेला तेव्हा ३री-४थी मध्ये होता. आता कॉलेज ला जायला लागलेला ! चांगला धष्टपुष्ट झाला होता. हातातली ताकाची किटली जवळजवळ संपत आलेली असावी. शेवटचे २ घोट राहिले असतील. ते २ घोट आमच्या नशिबात होते. पुढचे काही क्षण त्या ताकाचा आस्वाद घेण्यात गेले.
"लवकर जावा लेकरांनो, अंधार पडतोय " इतकं म्हणून कोंढाबाई तिथून निघाली. पुढची दहा मिनिटं त्यांना लांब पर्यंत चालत जाताना बघण्यात गेली.
"कसं ना जीवन ह्यांचं ! " असा एक स्वाभाविक विचार आम्हा दोघांच्या मनात येऊन गेला. परत शांतता पसरली. पश्चिम क्षितिजाने आता काजळी धरली होती.  रातकिड्यांनी अचानक एकच सूर लावला.
आता निघायची वेळ झाली होती त्याचाच एक संकेत होता तो. ती सुंदर संध्या मनात ठेवून आम्ही उठलो आणि परत पद्मावतीचा रस्ता पकडला.

मंत्रमुग्ध होऊन माझ्या आवडीचं संगीत ऐकताना मनात खूप दिवसांपासून रेंगाळलेली स्वप्न भराभर डोळ्यांसमोरून धावायला लागतात. आत्तापर्यंत पूर्ण न होऊ शकलेली मनातली ही स्वप्न मनातून काढून न टाकता तशीच रेंगाळत ठेवली तर एक ना एक दिवस ती नक्की पूर्ण होतात असा माझा अनुभव आहे !