सुगुनामावशी...

मुंबई. दुपारी बारा-एकची वेळ..

पापी पेट का सवाल है बाबा..

कुणी बायकोच्या हातचा छान छान डबा, तर कुणी हापिसाच्या कॅन्टिनमध्ये, कुणी
वडापाव तर कुणी चायनीजच्या गाडीवर, कुणी शेट्टी लोकांच्या सोडा मारलेल्या
महागड्या थाळ्या खात असतो, तर काही कॉर्पोरेट्स आपल्या छान छान सुंदर सुंदर
बिनबाह्यांचं पोलकं घातलेल्या मैत्रिणीसोबत किंवा सेक्रेट्रीसोबत छानशा
पंचतारांकित हाटेलात बफे लंच घेत असतो..

हाटेलं, खाऊ गल्ल्या,
भजी-वडापाव-कॅनन पावभाजी-इडली-डोसा-मेंदूवडा-चायनीजच्या गाड्या.. सगळं
ओसंडून वाहत असतं.. कष्टकरी मुंबई जेवत असते..

कधी कधी तात्याही मुंबईत उन्हातान्हाचा भटकत असतो आणि तो जर दादर भागात असेल तर त्याला मोठा आसरा असतो तो सुगुनामावशीच्या जेवणाचा..

सुगुनामावशीची रस्त्यावरची राईसप्लेट..रस्त्यावर उभं राहूनच जेवायची..

गेली १५-१६ वर्ष तात्या तिथे जेवतो आहे आणि आंध्रातली तेलुगू सुगुनामावशी त्याला प्रेमाने वाढते आहे..!

३ पोळ्या, एक उसळ, एक भाजी, वरण (मावशी त्याला 'डाळ' हा साधासुधा शब्द वापरते. ) आणि भात..

५० रुपयांमध्ये अगदी समाधान होईल असं पोटभर घरगुती जेवण.. रस्त्यावर उभं राहून तात्या जेवत असतो..

चांगल्या चवीची टामाटू किंवा बटाट्याची रस्सा भाजी, छानशी मटकीची उसळ,
शेवग्याच्या शेंगा घातलेली सुरेख चवीची फोडणी दिलेली डाळ, अगदी
घरच्यासारख्या मऊसूत पोळ्या आणि उत्तम बारीक तांदळाचा भात.. साला रस्त्यावर
उभं राहून भुकेकरता अजून काय पायजेल..?

मध्यरेल्वेच्या दादर
स्थानकाच्या फलाट क्र ६ वरून शिवाजी स्थानकाकडे तोंड करून शेवटच्या
फाटकातून बाहेर पडलं की १०-१५ पावलांवरच रेल्वे मजदूर युनियनच्या
कार्यालयाला लागून असलेल्या फुटपाथवर सुगुनामावशी जेवणाचे डबे घेऊन बसते.
जेवणानंतर स्वच्छ आणि थंडगार पिण्याचं पाणी. सुगुनामावशी रेल्वेच्या फलाट
क्रमांक ६ वरच्याच 'पिने का पानी' नामक पाणपोईतून ही व्यवस्था करते..

मी फार पूर्वीपासून या बाईच्या प्रेमात होतो. तिचं एकदा नाव विचारलं होतं,
सगळी हकिगत विचारली होती.. तेव्हा कळलं की तिचं नाव सुगुना.. मूळची
आंध्रप्रदेशातली..

'इतने साल से यहा खाना देती हू..लेकीन कभी किसिने नाम भी नही पुछा. तुम पहिला आदमी है जिसने मेरेकू पुछा..!'

मी आपुलकीनं केलेल्या चौकशीचं सुगुनामावशीला भरून आलं होतं, खूप अप्रूप वाटलं होतं..!

आता पुन्हा जाईन केव्हातरी सुगुनाच्या हातचं जेवायला..

भुकेल्या पोटाला छान छान वातानुकूलित, पंचतारांकित, सप्ततारांकित
हाटेलातल्या जेवणापेक्षा सुगुनामावशीच्या हातचा सैंपाक केव्हाही बरा..!

मस्त उन्हात फुटपाथवर उभं राहून सुगुनामावशीकडे तात्या जेवत असतो आणि एकीकडे गुणगुणतसुद्धा असतो..

ए दिल है मुष्किल जीना यहा
जरा हटके जरा बचके ये है बाँबे मेरी जान..

तात्या.