नाटाचे अभंग. भाग ३

भाग ३ रा

२) बरवा झाला वेवसाव । पावलों चिंतिलाचि ठाव । दृढ पायीं राहिला भाव । पावला जीव विश्रांती ॥१॥
   बरवा फळला शकुन । अवघा निवारिला शीण । तुमचे झालिया दरुषण । जन्ममरण नाही आतां ॥धृ॥
   बरवें झालें आलों या ठाया । होतें संचित ठायींचे पाया । देहभाव पालटली काया । पडली छाया ब्रह्मींची ॥३॥
   जोडिलें हें न सरे धन । अविनाश आनंदघन । अमूर्तमूर्ति मधुसूदन । समचरणी देखियला ॥४॥
   जुनाट जुगादिचें नाणें । बहुता काळाचे ठेवणें । लोपलें होतें पारिखेपणें । ठाव चळणें चुकविला ॥५॥
   आतां या जीवाचियासाठीं । न सोडीं पडलिया मिठी । तुका म्हणे शीणलों जगजेठी । न लवीं दिठी दुसर्‍याची ॥६॥

   नाटाच्या अभंगातील हा दुसरा अभंग. यात प्रपंचातील रूपकाचा आधार घेऊन साधनेतील अनुभूती आणि प्रचितीस आलेल्या अलौकिक फलप्राप्तीचे वर्णन हळुवारपणे परंतु आपल्या विशिष्ट शैलीने तुकोबाराय प्रतिपादन करतात आणि अप्रत्यक्षपणे साधकांना उपदेश करतात. त्यांचा व्यवसाय वाण्याचा होता. सावकारीही होती. परंतु त्यांचा व्यवसाय बुडाला. कौटुंबिक जीवनात जीवाभावाच्या व्यक्तींचे अकाली निधन झाले. त्याला प्रामुख्याने लांबलेला दुष्काळ आणि त्यानंतरची अतिवृष्टी ही कारणे झाली. सर्वत्र हाहाःकार माजला होता. तुकोबारायांचे लौकिक जीवन उध्वस्त झाले होते. तरीही तुकोबाराय येथे ’बरवा झाला वेवसाव’ म्हणत आहेत. ’बरवा’ हा शब्द ’बरा’ या शब्दाच्या अर्थापेक्षा फार वेगळा अर्थ दाखवित आहे. ’सुंदर, नामी, भरभराटीचा’ असा हा व्यवसाय झाल्याचे तुकोबाराय सांगत आहेत. कुठल्याही व्यवसायाचे फलित ताळेबंदाद्वारे त्यात दिसणार्‍या नफ्या-तोट्यातून पाहिले जाते. तुकोबारायांचे चरित्र पाहता त्यांनी उदरनिर्वाहासाठी केलेला कोणताही कामधंदा बरवाच काय, ’चाललाय्’ म्हणण्याच्याही लायकीचा झालेला नाही, हे स्पष्ट आहे. संसाराचे सर्व प्रकारे बसणारे चटके सहन होण्यापलीकडे गेले होते. गावात कोणी दारातही उभे करीत नव्हता, सर्वत्र अपमानास्पद वागणूक मिळत होती. अशा परिस्थितीत त्यांना एका परमेश्वराशिवाय अन्य आसरा दिसेना. घर खायला उठत होते. शेवटी त्यांनी एकांतवास पत्करला. त्यांनी व्यवसाय बदलला. परमेश्वराची ओढ लागली होती. त्याच्या प्राप्तीसाठी त्यांनी जो व्यवसाय (मार्ग) निवडला, त्यामागे एकनाथ महाराजांच्या प्रभावामुळे भागवत संप्रदायाला मिळालेले चैतन्य कारणीभूत होते, असे म्हटल्यास वावगे ठरू नये. सोळावे शतक संपता संपता एकनाथ महाराजांनी आपला देह गोदावरीत विसर्जित केला होता. तत्पूर्वी आळंदीला येऊन त्यांनी श्रीज्ञानेश्वर महाराजांच्या गळ्याभोवती असलेल्या अश्वत्थ वृक्षाच्या मुळ्या सोडविल्या होत्या. श्रीज्ञानेश्वरीचे परिशोधन केले होते. त्यानिमित्ताने त्यांचा सहवास आळंदीच्या तसेच परिसरातील जनांना लाभलेला होता. तुकोबारायांना परमेश्वराची आस लागली, तेव्हा नाथ जाऊन जेमतेम वीस-पंचवीस वर्षांचा अल्प काळ उलटलेला होता. त्यामुळे जनमानसात विठ्ठल भक्तीचे मूळ रुजून ते फोफावू लागले होते. तुकोबारायांना विठ्ठलभक्तीचा वारसा मिळालेला होताच. म्हणून इतर क्लिष्ट मार्गांचा विचार न करता त्यांनी विठ्ठलनामाचा ध्यास घेतला; तोच वेवसाव अवलंबिला. तहानभूक विसरून त्यांनी भामगिरीवर केलेला विठ्ठलाचा धावा सुफलित झाला. त्यांना त्यांच्या आराध्याने दर्शन दिले. त्यांना चिंतिलाचि ठाव प्राप्त झाला. या ठिकाणी ’पावलोंचि’ म्हणण्यामागचा भाव असा दिसतो की, त्यामागे स्वकर्तृत्वाचा लेषमात्रही अंश नसल्याचे व ती विठ्ठलाचीच कृपा असल्याचे त्यांचे सांगणे आहे. तुकोबारायांना झालेला लाभ किंवा प्राप्त झालेले ठिकाण त्यांच्या मनाजोगते आणि अपेक्षित होते. याचा परिणाम असा झाला की, त्यांचा भाव दृढ झाला अर्थात् पूर्ण समाधान मिळाल्याने अन्य विचाराला स्थान राहिले नाही. इथे ’दृढ’ या पदाची रचना दोन अर्थ दाखविणारी आहे. देहाच्या व्यवहारांची फिकिर न बाळगता केलेली साधना सुफलित झाल्याने अनन्यता रुजली आणि भाव दृढ झाला हा एक अर्थ. तर जो युगानुयुगे दृढ पायांवर उभा आहे, त्या विठ्ठलाच्या चरणी भाव केंद्रित झाला, हा दुसरा अर्थ. तुकोबाराय पुढे स्पष्ट करतात की, सर्वसामान्यतः जे घडत असते, ते त्यांनाही भोगावे लागले होते. अध्यात्माच्या क्षेत्रात असो वा प्रापंचिक क्षेत्रात, जे हवे ते मिळवण्यासाठी जीव आटापिटा करीत असतो. नक्की मार्ग सापडेपर्यंत जीवाची धावाधाव चालू राहते. दूरच्या प्रवासानंतर एकदा मुक्कामाला पोहोचलो की, देहाचे-मनाचे श्रम संपतात खरे, परंतु, सायास संपल्यानंतर अंग बोलू लागते, हा सामान्य अनुभव आहे. काही दिवसांपूर्वी तुकोबारायांचा जो गांजलेला, पीडलेला, श्रांत-क्लांत जीव होता, त्याला सुखदायी विश्रांती मिळाली. परंतु, त्यांचे कष्ट त्यांच्या अंगावर आले नाहीत. इथे एक गोष्ट उघड आहे की, प्रापंचिक अथवा पारमार्थिक साधन करताना केवळ इच्छित साध्याची प्राप्ती होऊन चालत नाही, तर तेथे संपूर्ण समाधानाची प्राप्ती होणे अत्यावश्यक असते. साध्य प्राप्त होताना झालेल्या क्लेषांचे स्मरण होऊन मन खट्टू होणे, हा प्रकार संपूर्ण समाधानातील अडसर ठरत असतो. मग हवे ते प्राप्त होऊनही निर्भेळ समाधान लाभत नाही.
   तुकोबारायांना झालेल्या सुखाच्या प्राप्तीचा दुसरा परिणाम पुढील चरणात स्पष्ट केलेला आहे. भविष्यात घडणार्‍या शुभ घटनांची पूर्वसूचना देणारा प्रसंग म्हणजे शकुन. प्रापंचिक पातळीवर एकापाठोपाठ एक आलेल्या ज्या सकृतदर्शनी दुःखदायक प्रसंगांना त्यांना सामोरे जावे लागले, त्या प्रसंगांना तुकोबाराय ’शकुन’ म्हणून संबोधतात. त्यामुळेच त्यांना घरदार, प्रपंच, लौकिक व्यवसाय यांपासून विरक्ती निर्माण झाली. त्यातून त्यांना परमेश्वराचा ध्यास लागला. विषयांपासून होणारी मनाची ओढाताण विषयनिवृत्तीमुळे संपली. सारा शीण दूर झाला. इतकेच नाही तर त्यांना विठ्ठलाचे दर्शनही झाले. परिणामी, जन्ममरणाच्या फेर्‍यातून सुटका झाली. यामागचा भाव असा की, जीव अज्ञानामुळे ज्या जन्म-मरणाच्या चक्रात अडकलेला असतो, त्यातून त्याला विषयासक्ती निर्माण होऊन निरंतर कष्ट आणि अशांती भोगणे प्राप्त होत असते. एकदा यथार्थ ज्ञान प्राप्त झाले की, विषयासक्ती संपते. मग, लौकिक लाभ आणि त्यातून मिळणारे सुख असो किंवा असह्य दुःख असो, सारे क्षणिक, स्वप्नवत् भासणारे असल्याचे उमगते. ’तुमचे झालिया दरुषण । जन्ममरण नाही आतां’ हे या अभंगाचे ध्रुपद आहे. यातून परमेश्वरप्राप्तीच्या परिणामाचा सिद्धांत तुकोबाराय मांडतात.
   लागोपाठ तिसर्‍या चरणाच्या सुरुवातीला ’बरवा’ शब्द तुकोबारायांनी योजिलेला आहे... ’तुम्हाला सांगतोऽऽऽ... या मुक्कामाला आलो हे बाकी ’लई बेस्’ झालं!’ असे इथे तुकोबारायांना म्हणायचे आहे. त्याचबरोबर त्यांना असेही सांगायचे आहे की, ’बरवें झाले, (मला माहित नसलेले असे) माझे काही संचित किंवा पूर्वपुण्य विठ्ठलाच्या चरणी जमा होते. त्यामुळेच विठ्ठलाने माझ्यावर कृपा केली आणि मला अभूतपूर्व लाभ होऊ शकला.’ आतापर्यंत त्यांच्या इंद्रियांच्या वृत्ती देहकेंद्रित होत्या. त्या वृत्ती पालटल्या म्हणजे उलट्या झाल्या. (त्या वृत्तींचा ’फोकस्’ बदलला.) त्या आता विठ्ठलाच्या चरणी केंद्रित झाल्या. तुकोबाराय असेही सांगत आहेत की, त्यांची कायासुद्धा पालटली. शरीर आणि काया हे दोन शब्द सकृत् दर्शनी जरी समानार्थी असले तरी काया या शब्दाने सुख अनुभवणारे शरीर असा अर्थ दाखविला जात आहे (क = सुख, मस्तक...). तुकोबारायांचे जे शरीर क्लेषांच्या परिणामाने काळवंडलेले होते, आक्रसलेले होते, त्याला परमसुखाचा लाभ झाल्याने आणि असीम आनंदात न्हाऊन निघाल्याने तेजाळले गेले. त्याच्यावर ’ब्रह्मींची छाया’ पडली. ब्रह्म हे एक तात्त्विक अस्तित्त्व आहे. त्यालाच श्रीज्ञानेश्वरमाऊली ’वस्तू’ म्हणून संबोधतात. हे ब्रह्म धारण करणारा तो ब्रह्मी. ब्रह्म ही त्या ब्रह्मीची सावली आहे. आता, सावली आहे, म्हणजे वस्तूरूप ’तो’ आहेच. म्हणून तर सावलीला अस्तित्व आहे. ब्रह्मी असलेल्या विठ्ठलाची सावली तुकोबारायांवर पडली. ’माझ्या देहगेहादी प्रपंचासह सर्व विश्व ही त्या ब्रह्मीची सावली आहे, हे मला उमगले आणि दृष्टी विशाल झाली’ असा तुकोबारायांच्या सांगण्याचा हेतु आहे. (ही त्यांना झालेली यथार्थ ज्ञानप्राप्ती आहे.)
   तुकोबारायांचा वेवसाव बरवा झाला. त्यातून त्यांनी अक्षय्य धन जोडले. अंगिकारलेल्या या अनोख्या व्यवसायामुळे त्यांना विठ्ठलाचे दर्शन झाले. विठ्ठल हेच अविनाशी, एकदा जोडल्यानंतर कधीही न संपणारे, धन तुकोबारायांना प्राप्त झाले. ते धन अनंत आहे, अक्षय्य आहे आणि ते साध्य आहे. या व्यतिरिक्त अन्य कुठलेही धन शाश्वत स्वरूपात टिकणारे नाही. लौकिक कर्माधिष्ठित असलेले भाग्य आणि लौकिक धन दोन्हीही अशाश्वत आहेत. या दोन गोष्टींपासून मिळणारा आनंद हा केवळ क्षणिक आहे. जीवाला हा क्षणिक आनंद गोड, मधुर वाटतो खरा, पण तो जीवाला मोहात पाडणारा असतो. अशा मोहाचा नाश करणारा सघन आनंदस्वरूप असणारा जो विठ्ठल त्याला तुकोबाराय ’मधुसूदन’ म्हणून संबोधित आहेत. तो मुळात अमूर्त असला तरी मूर्तरूप धारण करणारा आहे. निर्गुण राहून कार्य करता येत नाही; त्यासाठी सगुणात यावेच लागते. संतांचे सामर्थ्य भगवंताला सगुणात यावयास भाग पाडते. जीवाला भ्रमातून मुक्त करणारा हा मधुसूदन तुकोबारायांनी ’समचरणी’ पाहिला. चरण हे आचरणाचे उपलक्षण आहे. (’सरळ चालीचा आहे’ किंवा ’वाकड्या पावलाचा आहे’ असे आपण व्यवहारात म्हणत असतो.) ज्याचे आचरण प्रेम-द्वेषरहित आहे, तो समचरण. त्याचा बाह्यरंग आणि आचरण द्वैतात्मक दिसत असले तरी अंतरंगाने विचार केल्यास भगवंत आपल्या भक्ताचे तसेच वैर्‍याचेही अंतिम कल्याणच साधून देत असतो. मूर्तरूपात दिसलेल्या विठ्ठलाचे अंतरंग तुकोबारायांनी अनुभवले. त्यांचे शूद्रत्व, वेद-शास्त्र-कर्मादींचे अज्ञान, प्रसंगी त्यांच्याकडून घडलेले प्रमाद यांचा विचार न करता विठ्ठलाने त्यांना दर्शन देऊन परमोच्च आनंद दिला.
   तुकोबारायांचे आराध्य दैवत आजकालचे, अर्वाचीन आहे, असे कुणी म्हणू नये, यासाठी ते पुढे स्पष्ट करतात की, ’जुगादि’ म्हणजे कालगणना सुरू होण्यापूर्वीचे, अनादी असलेले, ’जुनाट’ म्हणजे सनातन असे हे ’नाणे’ आहे. ज्याला हे नाणे प्राप्त झाले, त्याला सर्व काही मिळत जाते. त्यासाठी व्यक्ती-वस्तू-स्थल-कालाचे कुठलेही बंधन नाही. विश्वात कुठेही, कधीही, कुणासाठीही हे नाणे तितकेच उपयोगी, एकाच किंमतीचे आहे. जीव मायेच्या भ्रामक गुंत्यात अडकल्याने, त्याच्याकरिता हे नाणे सनातन असूनही, सर्वांना सदा सर्वत्र उपलब्ध होणारे असूनही, जीव त्या नाण्याला पारखा होत असतो. असे अद्वितीय नाणे तुकोबारायांना प्राप्त झाले आहे. जीवाचा मूळ ठाव-ठिकाणा कोणता? तर जीव ज्याचा अंश आहे, तो परमेश्वर, ते नाणे. त्यापासून चळणे म्हणजे भ्रमामुळे वंचित होणे, पारखे होणे, हे आता त्या विठ्ठलाने चुकविले आहे. त्या भ्रमिष्ट अवस्थेतून त्याने आता बाहेर काढले आहे. आता तो ठाव हातातून निसटणे, त्यापासून च्युत होणे हा प्रकार नाही.
   तुकोबाराय अभंगाचा समारोप करताना विठ्ठलाच्या चरणी काकुळतीचे मागणे मांडतात. ’या’ जीवाचियासाठी म्हणजे विठ्ठलाने कृपा दाखवून उपाधिरहित केलेल्या, भ्रमाच्या विळख्यातून बाहेर काढलेल्या त्यांना विठ्ठलाने क्षणभरही दूर लोटू नये. त्यांना विठ्ठलाचे कधीही विस्मरण होऊ नये. ’जन्म-मृत्युच्या चक्रात अडकल्याने जो जीव सातत्याने दुःख झेलत राहिलेला आहे, त्यातून जो शिणलेला आहे, त्याचा तू कृपाळूपणे अंगिकार केला आहेस्. आता या जीवाला जी विश्रांती लाभलेली आहे, त्यापासून वंचित करू नकोस्’. अहंकृतीचा लवलेश ही तुकोबारायांच्या मनात नाही. ते देवाला विनवितात की, ’महत्प्रयासाने अनंत अडथळ्यांना झुगारून मी तुझ्या चरणांपाशी पोहोचलो आहे, माझा शीण व्यर्थ जाऊ देऊ नकोस्. आता ’दुसर्‍याची दिठी लावू नकोस्’. तुकोबारायांचे विठ्ठलाला कळकळीचे सांगणे आहे की, त्याने आता अन्य प्रलोभन दाखवू नये, त्यांच्या मनाचे भरकटणे आता त्याने संपवावे.
  
(क्रमशः) 
संपर्क : (डॉ. रामपूरकर : ०९८२०३७६१७५)