कृत्य कुणाचे सजा कुणा ?

दि. ७.०४.१९९१ च्या दुपारी म्हैसूरच्या ललिता महाल नावाच्या पंचतारांकित हॉटेलच्या जलतरण तलावात सोमशेखर, त्याची पत्नी आणि दोन मुले पोहायला गेलेत. त्यावेळी तिथे एक इसम पोहत होता. तो जलतरण तलावात अनधिकृतरित्या पोहत असल्यामुळे सोमशेखरने तिथल्या सेवकाला त्याला बाहेर काढायला सांगितले आणि तो, त्याची पत्नी आणि मुले ड्रेसिंग रूममधे पोषाख बदलायला गेले. पोहण्यासाठी वापरण्यात येणारे पोषाख (स्विमिंग कॉस्चूम्स) घालून चौघेही बाहेर आले. सर्वप्रथम सोमशेखरची पत्नी तलावात उतरून पोहायला लागली. त्यावेळी सोमशेखरने पाहिले की तो इसम त्याच्या पत्नीकडे बघून छ्द्मीपणे हसत होता. सोमशेखरने त्याच्याकडे बघताच त्याचा राग अनावर झाला आणि त्याने त्याला शिव्या देत तीन जोरदार बुक्क्या हाणल्या. पहिली बुक्की त्याच्या तोंडावर. दुसरी खांद्यावर आणि तिसरी कराटे स्टाईल बुक्की त्याच्या मानेवर बसली. तीन बुक्क्यांतच तो अनोळखी इसम तलावात जावून पडला आणि मरण पावला.

तो इसम तलावात पडल्याचे बघताच तेथील सेवक त्याला वाचवण्यासाठी धावत आला. सोमशेखरने त्याला अडवले आणि त्याचा हात पकडून ठेवला. काही वेळाने इतर काही लोकांनी त्या इसमास तलावाबाहेर काढले, तो एव्हाना मृत झालेला होता. म्हैसूरच्या नजाराबाद पोलीस ठाण्यातील एका सब इंस्पेक्टरला ललिता महाल हॉटेलच्या जलतरण तलावात एक इसम बुडून मरण पावल्याचा निरोप मिळाला. सोमशेखरकडूनही त्या सब-इंस्पेक्टरला निरोप मिळाला की त्याने एखाद्या लाईफ-गार्डला जलतरण तलावाकडे सोबत घेवून यावे. सोमशेखरची गाडी पोलीस ठाण्यात आली. त्या गाडीच्या ड्रायव्हरने सब-इंस्पेक्टरला जलतरण तलावात एक इसम बुडाल्याचे सांगितले. त्याने जवळच्या नर्सिंग होममधे बघितले पण तिथे डॉक्टर नव्हते म्हणून त्याने एक डॉ. विष्णूमूर्ती यांना गाडीत बसवून आणले. त्यानंतर तो डॉक्टरला घेवून तलावाजवळ आला, पाठोपाठ सब-इंस्पेक्टरही आपल्या मोटर सायकलने तिथे आला. त्यावेळी सोमशेखर, त्याची पत्नी आणि दोन मुले, तलाव-सेवक, आणखी दोन जण तिथे उपस्थित होते. सोमशेखरने डॉक्टरला त्या इसमाला तपासायला सांगितले. आणि सब-इंस्पेक्टरला हा माणूस पाण्यात बुडून मरण पावल्यामुळे आकस्मिक मृत्यूची नोंद करावयास सांगून इंक्वेस्ट पंचनामा करायला सांगितले. सब-इंस्पेक्टरने सोमशेखरला तक्रार कोण नोंदवेल असे विचारल्यावर, तुला काय घाई आहे, हॉटेल व्यवस्थापक मिसेस मलीक तक्रार नोंदवतील असे सांगितले.

सब-इंस्पेक्टरने इंक्वेस्ट पंचनामा तयार करताना सोमशेखरला घडलेल्या घटनेसंबंधी आणखी काही प्रश्न विचारण्याचा प्रयत्न केला पण सोमशेखरने त्याचेवर आरडाओरड करून त्याला चूप बसवले. त्याच वेळी आणखी एक डॉक्टर अम्मण्णा तिथे आले, त्यांनी सुद्धा त्या इसमाला तपासल्यावर मृत घोषित केले. सब-इंस्पेक्टरच्या म्हणण्यानुसार सोमशेखर इंक्वेस्ट तयार करताना तसेच इतर लोकांच्या साक्षी-बयाणे नोंदवताना भरपूर ढवळाढवळ केली. आपल्या सोयीप्रमाणे आणि इच्छेप्रमाणे सर्व कागद तयार करून घेतले. सब-इंस्पेक्टर आधी मृतकाची ओळख पटवून घेवू असे म्हणत होता परंतु सोमशेखर काही ऐकायला तयार नव्हता. तो म्हणाला की आधी मृतदेह शवागारात पाठवा, ओळख दुसऱ्या दिवशी पटवता येईल. सोमशेखरने सब-इंस्पेक्टरला हेही सांगितले की त्याची किंवा त्याच्या कुटुंबीयांची उपस्थिती कुठेही दिसायला नको. सोमशेखरनेच हॉटेलमधे जावून एक पांढरी चादर आणून मृतदेह त्यात गुंडाळला आणि शवागारात शवविच्छेदनासाठी पाठवला. सोमशेखरनेच तलावाजवळ एका खुर्चीवर असलेली मृतक इसमाची एक पॅन्ट, एक शर्ट आणि चपला आणल्या. त्यात पॅन्टमधील एका चिठ्ठीवरून मृतक इसमाचे नाव "के. सत्यदेव" असल्याचे कळले. 

मृतदेह रवाना केल्यानंतर सोमशेखरने सब-इंस्पेक्टरला हॉटेलच्या व्यवस्थापक मिसेस मलीक यांच्याकडे पाठवले, तिथे मिसेस मलीक यांनी तक्रार दिली. त्या तक्रारीच्या आधारावर सब-इंस्पेक्टरने गुन्हा नोंदवून घेतला. बरेच दिवस उलटूनही तपासात काहीच निष्पन्न होत नव्हते. सत्यदेवच्या आईनेही सत्यदेवचा खूनच झाला असल्याची तक्रार दाखल केली. शेवटी २५.०४.१९९१ रोजी सत्यदेवचा मृत्यू हा अपघात किंवा आत्महत्या नसून हत्या असल्याचे गृहीत धरून पोलिसांनी तपास त्या दिशेने सुरू केला.  पत्रकार, सामजिक कार्यकर्ते यांनी एव्हाना सोमशेखरविरुद्ध आरोपांचे रान उठवले होते. सोमशेखर नेमका कोण होता आणि त्याच्यावर काहीच कारवाई कशी होत नव्हती, याचा वाचकांना प्रश्न पडला असेल. सोमशेखर हा पोलीस उपायुक्त (डीसीपी) होता आणि त्या वेळचे कर्नाटकचे मुख्यमंत्री श्री. एस. बंगारप्पा यांचा मित्र होता. समाजात वादळ उठल्यावर "माझे कोण काय बिघडवू शकते?" अशा गुर्मीत वावरणाऱ्या सोमशेखरवर कारवाई करण्याचा धाडसी निर्णय ( पोलीस अधिकाऱ्यांना बारकाईने तपास करायला लावून) त्यावेळच्या म्हैसूरच्या पोलीस आयुक्तांनी घेतला आणि सोमशेखरला अटक करण्यात आली. त्याचा जामीन अर्ज सत्र न्यायालयाने फेटाळला. उच्च न्यायालयाने मात्र त्याला जामीन दिला. जवळपास दोन महिने सोमशेखरला तुरुंगात रहावे लागले. उद्दाम, उर्मट, मुजोर आणि चिडका स्वभाव असणारा सोमशेखर तुरुंगात खूपच मवाळ झाला. तिथे लिट्टेच्या दहशतवाद्यांना तो देशप्रेम, शांती, अहिंसा, सहनशीलता यावर धडे देत होता. तुरुंग अधीक्षकांनी सुद्धा त्याच्या वर्तणुकीची तारीफ केली होती.

सत्र न्यायालयात सोमशेखरविरुद्ध भा.दं.वि.च्या कलम ३४१, ३०२, २०१ आणि ५०६ अन्वये खटला सुरू झाला. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आपसी दुश्मनीतून मला खोट्या गुन्ह्यात अडकवले असे सोमशेखरचे म्हणने होते. सर्व साक्षी-पुरावे तपासल्यावर सबळ पुराव्याअभावी सत्र न्यायाधीशांनी सोमशेखरची निर्दोष सुटका केली. राज्य शासनाने या निर्णयाविरोधात कर्नाटक उच्च न्यायालयात अपील दाखल केली. उच्च न्यायालयाने सत्र न्यायालयाचा निर्णय फिरवला. सोमशेखरला सत्यदेवच्या मृत्यूबद्दल दोषी ठरवून सदोष मनुष्यवधासाठी (भा.दं.वि.च्या कलम ३०४(२) अन्वये) तीन वर्षे सक्तमजुरीची शिक्षा ठओठावली आणि एक लाख रुपयांचा दंड ठोठावला तसेच कलम २०१ (पुरावे नष्ट करणे) खाली एक वर्षाची सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली. सोमशेखरने दंड भरल्यास ती रक्कम मृतक सत्यदेवच्या आईला नुकसान भरपाई म्हणून द्यावी असेही निर्देश दिले.

उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरुद्ध सोमशेखरने सर्वोच्च न्यायालयात अपील दाखल केली परंतु अपील प्रलंबित असताना सोमशेखरचा मृत्यू झाला. सर्वोच्च न्यायालयाने दि. ६.०५.२००४ रोजी आदेश पारित करून उच्च न्यायालयाचा निर्णय योग्य ठरवला परंतु सोमशेखर हयात नसल्यामुळे त्याच्या कायदेशीर वारसांना अपील प्रकरणात सहभागी करून घेतले . सर्वोच्च न्यायालयाने दंडाची रक्कम एक लाखावरून पन्नास हजार केली आणि सोमशेखरच्या वारसांनी दंडाची रक्कम चार महिन्यात जमा न केल्यास मृतक सत्यदेवची आई त्या रकमेच्या वसुलीसाठी कायदेशीर कारवाई करू शकेल असेही निर्देश दिलेत.

"मॉरल ऑफ द स्टोरी".........१) काहीही झाले तरी रागावर नियंत्रण ठेवावे. २) माणूस कितीही मोठा, वजनदार असला तरी त्याने गुन्हा केलेला असल्यास त्याला शिक्षा होवू शकते, होईलच असे खात्रीने सांगता येत नसले तरी. ३) एका छोट्याशा चुकीमुळे पुढे एवढे मोठे महाभारत घडू शकते. सेवकाने सत्यदेवला आधीच बाहेर काढले असते तर पुढील अनर्थ टळला असता. ४) एखाद्याने केलेल्या कृत्याचे परिणाम त्याच्या वारसांनाही भोगावे लागू शकतात. ५) एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याच्या पत्नीकडे बघून हसण्याची शिक्षा सत्यदेवला लगेच मिळाली पण शेवटचा निकाल हाती यायला तब्बल १३ वर्षे लागली. ६) पोलीस अधिकाऱ्याने सुद्धा कायदा हातात घेवू नये. मुख्यमंत्री मित्र असले तरी गुन्हा केल्यास मुख्यमंत्री मदत करतीलच असे नाही.

अ‍ॅड. अतुल सोनक,
३४९, शंकर नगर, नागपूर-१०
९८६०१११३००
९४०४७०००५७