नाटाचे अभंग... भाग ५

जगद्गुरू तुकाराम महाराजांची अभंगगाथा
नाटाचे अभंग... ५
(एक मुक्त चिंतन)
- डॉ. पांडुरंग रामपूरकर / यशवंत जोशी

४) आतां पावेन सकळ सुखें । खादलें कदा तें न देखें ।
 अवघें सरलें पारिखें । सकळ देखें माहियेर ॥१॥
 जवळीं विठ्ठल रखुमाई । बहीण बंधु बाप आई ।
 सकळ गोताचीच साई । पारिखें काई ऐसें नेणिजे ॥धृ॥
 जगदाकारी झाली सत्ता । वारोनि गेली पराधीनता ।
 अवघें आपुलेंचि आतां । लाज आणि चिंता दुरावली ॥३॥
 वावरे इच्छावसे घरीं । आपुले सत्तेचे माहेरीं ।
 करवी तैसे आपण करी । भीड न धरीं चुकल्याची ॥४॥
 सोसिला होता सासुरवास । बहुतांचा बहुत दिवस ।
 बहु कामें पुरविला सोस । आतां उदास आपुल्यातें ॥५॥
 करिती कवतुक लाडें । मज बोलविती कोडें ।
 मायबाप उत्तरें गोडें । बोलें बोबडें पुढें तुका ॥६॥

 या नाटाच्या अभंगाचा सर्वांगिण विचार केल्यास असे जाणवू लागते की, साधक अवस्थेतून तुकोबारायांची पारमार्थिक प्रगती झाली आहे. ते आता खर्‍या अर्थाने ’स्व-स्थ’ म्हणजेच निज स्वरूपाच्या ठिकाणी प्राप्त झाले आहेत. स्वप्नातून जागे झाल्यानंतर स्वप्नातील हर्ष-शोक आपण साक्षीरूपाने आठवू लागतो व त्या स्वप्नात वाटलेली भीती, सुख, दुःख आदी अनेक प्रकारचे तरंग मग हास्यास्पद वाटू लागतात. पारमार्थिक दृष्टीकोनातून पाहता, ऋषी-मुनी-संत सोडल्यास, प्रत्येक जण मायेमध्ये पराधीन होऊन गुंतलेला आहे. त्यामुळे त्याच्या अनुभूतीला येत असलेले सर्व प्रकारचे भावतरंग खर्‍या अर्थाने स्वप्नवत् आहेत, हे त्याच्या ध्यानात येत नाही. मायेमध्ये अशा प्रकारे गुरफटलेल्या सामान्य जनांची अवस्था तुकोबारायांनी त्यांच्या पूर्वायुष्यात अनुभवलेली आहे. तुकोबारायांची अशी भावना झालेली आहे की, हे सामान्य जन त्यांच्या उपास्याचीच लेकरे आहेत अर्थात् त्यांची भावंडेच आहेत. त्यांनाही ’स्व-स्थ’ अवस्था प्राप्त व्हावी, यासाठी आपली प्रत्यक्षानुभूती प्रकट केल्यास जीवांचे कल्याण तर होईलच; त्यामुळे देवालाही संतोष होईल आणि देवाने आपल्यावर जी कृपा केली, त्याची देवाला अप्रत्यक्षपणे पावतीही दिल्यासारखे होईल. या एकंदर कळवळ्याच्या तसेच उतराईच्या भावनेतून तुकोबारायांना हा अभंग स्फुरला असावा आणि मग त्यांनी तो शब्दांकित केला. हा अभंग दीर्घकालपर्यंत यच्चयावत् जीवमात्राला दीपस्तंभाप्रमाणे मार्गदर्शक व सहाय्यक ठरू शकणारा आहे.
 या अभंगातील पहिले पद ’आतां’ हे आहे. याची व्याप्ती मोठी आहे. अभंगाच्या प्रत्येक चरणाच्या सुरुवातीस हे पद लावता येते. हे पद कालवाचक अथवा स्थलवाचक नसून ते अवस्थावाचक आहे.  तुकोबारायांना प्रपंचामध्ये सर्व प्रकारचे दाह सहन करावे लागले आणि परमार्थ साधनेतही ध्येयप्राप्ती कधी होईल, याविषयी शंका येऊ लागली (तुका म्हणे माझे दचकलें मन । वाटे वायावीण शीण केला ॥). परंतु, तुकोबारायांना याचा अनुभव आला की, सुयोग्यवेळी साधनामध्ये फलोत्पत्ती अनुभूतीस येते, तेव्हा झालेला शीण किंवा मनातील नाना प्रकारच्या शंका, अधीरता आदी सार्‍या अवस्था संपून जातात. अशा समाधानाच्या अवस्थेत त्यांनी अभंगाची सुरुवात केली आहे. तुकोबाराय त्यांच्या अनुभूतीबद्दल दृढनिश्चयाने सांगत आहेत की, आता त्यांना सर्व सुखे प्राप्त होतील इतकेच नव्हे, तर सर्व सुखांचा उपभोग घेण्याकरिता ते अधिकारी बनतील (पावेन सर्व सुखें). त्यांना अप्रत्यक्षपणे असे म्हणावयाचे आहे की, जे जे प्रसंग येतील, ते कदाचित् इतरेजनांना सुखाचे वाटणारही नाहीत्, पऱंतु, त्या त्त्या प्रसंगात हितच दडलेले असणार, याची त्यांना निःसंशय खात्री आहे. ’खादलें’ या पदातून अतृप्ती, अधाशीपणा दाखविला जात आहे. प्राप्त झालेल्या या अवस्थेपूर्वी भ्रामक सुखाच्या उपभोगासाठी जे आसुसलेपण होते, अतृप्ती होती, ती आता नावालाही शिल्लक राहिलेली नाही. अन्य अंगाने या चरणखंडाचा विचार करता असे दिसते की, तुकोबारायांना येथे असेही सांगावयाचे आहे की, आता जी अवस्था त्यांना प्राप्त झाली आहे, त्या अवस्थेत जे सुख अनुभवण्यास मिळत आहे, ते या अगोदर कधी (स्वप्नातही) त्यांना दिसले नव्हते (कदा न देखें).
 तुकोबारायांना जी अवस्था आता प्राप्त झाली आहे, त्या अवस्थेचे आणखी वर्णन करताना त्यांना सांगावयाचे आहे की, प्रपंचात अंवतीभंवती ज्या अनेक व्यक्ती असतात, ज्यांना आपण स्वजन म्हणावे, त्या व्यक्ती कितीही जवळच्या असोत्, प्रसंगी परक्या होत असतात. हे परकेपण आता सरले आहे, संपले आहे. ’सरणे’ या क्रियापदाने योग्य होणे, शोभणे, मान्य होणे असाही अर्थ दाखविला जातो आणि ’पारिखा’ या विशेषण पदाने ’अलभ्य, अप्राप्य’ असा बोध केला जातो. जे ठिकाण तुकोबारायांना आता प्राप्त झाले आहे, ते अप्राप्य वाटणारे होते, पण आता त्या ठिकाणी वास करण्याची योग्यता त्यांना प्राप्त झाली आहे आणि त्यांना ते ठिकाण मनोरम वाटत आहे. याचे कारण हे की, तेथे सर्वत्र जिव्हाळ्याचा, प्रेमाचा, मायेचा सुकाळ झालेला दिसतो आहे.
 निजाच्या माहेराला आल्यानंतर विठ्ठल्-रखुमाई, जे तुकोबारायांचे उपास्य आहे, ते आता किंचितही दूर नाही. ते आता त्यांना हस्तगत झालेले आहे. बहिण, बंधू, पिता, माता ही रक्ताची नाती खरी, पण प्रसंगी ती परकी होत असतात, अंग काढून घेत असतात. मग माणूस एकटा पडतो. आता तशी परिस्थिती अजिबात राहिलेली नाही. ती तकलादू नाती दूर राहिली आहेत. विठ्ठल-रखुमाई सार्‍या नात्यागोत्यांचे ’साई’ म्हणजे सार आहे. (साय हे दुधाचे सार असते. त्यात सारी स्निग्धता पुरेपूर उतरलेली असते.) आता कसल्याही प्रकारचे परकेपण किंवा प्रेमाची अप्राप्यता आता ते जाणत नाहीत.
 ’पारिखें काई ऐसें नेणिजे’ याचा परिणाम तुकोबाराय सांगतात, ’जगदाकारी झाली सत्ता’. भगवंत हा जगदाकार आहे. सारे जगत त्याचेच रूप आहे. त्या जगदाकाराच्या विलक्षण प्रेमसाम्राज्यात तुकोबारायांना सत्ता प्राप्त झाली. प्रत्येक जीवाला सत्ता गाजविण्याची हाव असते. परंतु, जीवाच्या सत्तेला मर्यादा असल्याने जीवास ज्या सत्तेची हाव आहे, ती सत्ता त्याला पूर्णत्वाने प्राप्त होऊ शकत नाही. पराधीनता किंवा परावलंबित्व हा जीवाचा स्वभावगुण आहे. कारण जीव हा अपूर्ण, अल्पशक्तिमान्, अल्पज्ञ आदी दोषांनी युक्त असल्याने तो सर्वसत्ताधीश होऊच शकत नाही. तथापि, सर्वतंत्र, स्वतंत्र, त्रैलोक्यावर सर्व प्रकारची सत्ता गाजविणार्‍याशी एकरूप झाल्यामुळे आता पराधीनता ’वारली’ गेली असल्याचे तुकोबाराय सांगतात. ’वारणे’ म्हणजे कायमचे संपणे, मृत्यु पावणे. जो मेला त्याला ब्रह्मदेवही उठवू शकत नाही. पराधीनता अशा प्रकारे संपल्याने तुकोबारायांना स्वतंत्रता, सर्वतंत्रता लाभली. सारे काही त्यांचेच झाले आहे. पराधीनता नसल्याने, कुणाला काही मागताना वाटणारी लाज नाही किंवा मागून मिळत नाही म्हणून चिंतेचेही कारण नाही. सर्वसाधारणपणे असे म्हणता येते की, लाज ही भूतकाळाशी संबंधित आहे तर चिंता ही भविष्यकाळाशी आणि ही लाज तसेच चिंता जीवाला क्लेषकारक होत असते. तुकोबारायांची भगवंताशी एकरूपता साधली गेल्यामुळे त्यांचा भूतकाळ तसेच भविष्यकाळही संपलेला आहे. आता त्यांना चिरंतनता प्राप्त झाली आहे. येथे एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की, तुकोबाराय म्हणत आहेत, ’लाज आणि चिंता दुरावली’. येथे ते ’वारली’ म्हणत नाहीत. याचे कारण असे दिसते की, या दोन्हीही गोष्टी व्यवहारात जीवाला आवश्यक आहेत. जनात वावरताना निर्लज्ज होऊन चालणार नाही किंवा अगदीच निश्चिंत राहूनही चालत नाही.  
 तुकोबारायांना जे ख्ररे निवासस्थान प्राप्त झाले आहे, तेथे त्यांचा वावर कसा आहे, ते पुढील चरणात ते सांगतात. ’वावरे’ यात बंध, मर्यादा, भीड, संकोच आदींचा अभाव असून् तेथे मनसोक्तपणाचा भाव आहे. माहेरी आलेल्या मुलीला जे मोकळेपण मिळते, ती तुकोबारायांची अवस्था आहे. त्या घरात तुकोबारायांचे हिंडणे, फिरणे, काम करणे सारे ’इच्छावसे’ म्हणजे निःसंकोचपणे, मनाला येईल तसे, होत आहे. वैशिष्ट्य हे आहे की, आता तुकोबारायांचे मन हे विठ्ठलमय झालेले आहे. त्यांची इच्छा ही विठ्ठलाचीच इच्छा झाली आहे. ’करणे’ आणि ’करविणे’ यात द्वैताची म्हणजे दोघांची गरज असते. त्यामुळे ते कोणतेही कर्तृत्व आपल्याकडे घेत नाहीत. विठ्ठलाची इच्छा वावगी होऊच शकणार नाही. तोच सार्‍या क्रिया त्यांच्याकडून करुन घेत आहे, या विश्वासाने तुकोबारायांचा वावर होत आहे. त्यामुळे आपले काही चुकेल याची त्यांना भीती राहिलेली नाही. देवाला जे काही करून घेण्याची इच्छा होईल, ते ते, त्या कृत्याच्या परिणामाचा कुठलाही विचार न करता, तुकोबाराय करणार आहेत. त्या कृत्यांपासून निर्माण होणारे दोष, ते अलिप्त राहिल्याने, त्यांना स्पर्श करणार नाहीत. (हाच त्यांचा ’कर्मयोग’ आहे, असे म्हणता येते.) थोडक्यात, तुकोबारायांच्या मनावर कोणतेही दडपण राहिलेले नाही. ’करवी तैसे आपण करी...’ या चरणाचा वेगळ्या अंगाने विचार करता आणि तुकोबाराय जी सर्वसत्तात्मकतेची अवस्था वर्णन करीत आहेत, ती लक्षात घेता, असाही अर्थ ध्वनित होत आहे की, देवसुद्धा आता तुकोबाराय सांगतील तसे करत आहे. ही अवस्था लक्षात येण्यासाठी बालक आणि घरातील थोर माणसे यांचे नाते डोळ्यासमोर आणावयास हवे. ही थोर मंडळी बालक सांगेल, त्याप्रमाणे आनंदाने करीत असतात. पिता घोडा होतो, तर आजोबा उठा-बशाही काढतात. आईचे घर उन्हात बांधले जाते. बालक म्हणेल त्यावेळी, बालक म्हणेल ती गोष्ट आजीला सांगावी लागते. तेथे कुणालाही चालढकल करण्याची इच्छा होत नाही (देवा हातीं रूप धरविला आकार । नेदूं निराकार होऊं त्यासी ।।)
 अपूर्व आनंद उपभोगावयास मिळत असताना तुकोबारायांना गत अवस्थेची डोळे ओले करणारी आठवण होते आहे. किती जणांचा जाच त्यांना सहन करावा लागला होता. बरे, तो जाच एक-दोन दिवसांचा नव्हता. फार दिवस तो जाच अगतिकपणे सहन करणे त्यांना भाग होते. स्वतःच्या इच्छा मारून दुसर्‍यांचे सोस पुरविताना हाल सोसावे लागले होते. जिणे नकोसे होत होते. प्रत्येक क्षणी मन उदास होत होते. तुकोबारायांपुढे साधक आहेत. त्यांना तुकोबारायांचे झालेले हाल माहित आहेत. त्या साधकांचे मनोगत जाणून तुकोबाराय पुनरावृत्तीचा दोष पत्करून सांगताहेत्, ’मी फार सासुरवास सोसला होता.’ जेव्हा जीव मायेच्या अधिकाराखाली असतो, तेव्हा त्याला अनिच्छेने, प्रारब्ध म्हणून किंवा नियती म्हणून काही गोष्टी भोगाव्या लागतात. तुकोबारायांना हे स्पष्ट करावयाचे आहे की, ’माझ्या बाबतीत घडलेल्या क्लेषकारक अनेक घटनांचा चित्रपट तुमच्या डोळ्यांसमोर आहे. ते विविध प्रकारचे भोग मी बराच काळ भोगले होते. परंतु, त्याच्या बुडाशी असलेले गुह्य तत्व असे की, त्या भोगांचे कारण माझ्या चित्तामध्ये मूळ धरून बसलेला काम (इच्छा) होता. आता मात्र मी सार्‍या गोष्टींकडे तिर्‍हाईतपणे पाहतो.’ आता या आनंदाच्या क्षणी तुकोबारायांचा जीव सुखावला आहे. त्या जीवाचे स्वतःचे वेगळे अस्तित्वच संपलेले आहे. देहभाव लोपला आहे. आताही तुकोबाराय उदास आहेत, पण ही उदासी म्हणजे प्राप्त आनंद उपभोगत गत अवस्थेकडे केवळ साक्षीपणाने पाहणे आहे.
 गत आठवणींना तीलांजली देऊन तुकोबाराय पुन्हा वर्तमानात येतात. त्यांचा मायबाप विठ्ठल आता प्रेमाचा वर्षाव करीत आहे. लाड, कोड, कौतुक याला उधाण आलेले आहे. लाड, कोड, कौतुक हे तिन्ही शब्द जरी सारख्याच अर्थाचे वाटत असले तरी, बालक-थोर सापेक्षता तेथे आहे. अजाण बालकाचे लाड केले जातात. तेथे थोरांची स्वेच्छा असते. बालक जरा जाणते झाले की, त्याच्या मागण्या सुरू होतात. प्रसंगी ताण सहन करून थोर मंडळी बालकाच्या त्या इच्छा पुरविण्याचा प्रयत्न करतात. याला आपण कोड पुरविणे म्हणतो. बालक अजून मोठे झाले की, त्याच्यातील गुणांची अभिव्यक्ती समोर येऊ लागते. बालकाचे ते कर्तृत्व पाहून त्याचे कौतुक केले जाते. तुकोबाराय आणि सार्‍या गोतांची साय असलेल्या विठ्ठलाचे संबंध आई आणि तिचे बालक या प्रकारात प्रस्थापित झालेले आहेत. आई-वडिलांना बालकाने त्याच्या जिज्ञासेपोटी विचारलेल्या प्रश्नांना मृदु, गोड भाषेत उत्तरे दिली जातात. तसेच,  त्या बालवयात न समजणारे बोल (कोडे) मायबाप बोलावयास लावीत असतात. याच तर्‍हेने ’मायबाप विठ्ठल बोलावयास सांगतात आणि मी जमेल तसे बोबडे बोल बोलत आहे’ असे तुकोबाराय म्हणतात्. थोडक्यात, स्वतःकडे कोणतेही जाणतेपण न घेता, तुकोबाराय साधकांना सांगतात की, ’तुम्ही लक्षात घ्या की, मी जे काही बोलत आहे, ते माझे बोल नसून विठ्ठलाचेच ते बोल आहेत्. पारिखें काई ऐसे नेणिजे. हा माझा मायबाप अप्राप्य आहे, असे मुळीच समजू नका.’

(क्रमशः) 

संपर्क : (डॉ. रामपूरकर : ०९८२०३७६१७५)