नाटाचे अभंग... भाग ८

७. आता मज धरवावी शुद्धि । येथूनि परतवावी बुद्धि ।
 घ्यावें सोडवूनि कृपानिधी । सांपडलो संधीं काळचक्रीं ॥१॥
 करिसील तरी नव्हे काई । राईचा डोंगर पर्वत राई ।
 आपुले करुणेची साई । करीं वो आई मजवरी ॥धृ॥
 मागील काळ अज्ञानपणें । सरला स्वभावें त्या गुणें ।
 नेणें आयुष्य होतें उणें । पुढिल पेणें अंतरलों ॥३॥
 आतां मज वाटतसे भय । दिवसेंदिवस चालत जाय ।
 येथें म्यां येउनी केलें काय । नाहीं तुझे पाय आठविले ॥४॥
 करूनि अपराध क्षमा । होतील केले पुरुषोत्तमा ।
 आपुले नामीं द्यावा प्रेमा । सोडवीं भ्रमापासूनियां ॥५॥
 हृदय वसो तुमच्या गुणीं । ठाव हा पायापें चरणीं ।
 करूं हा रस सेवन वाणी । फिटे तों धणी तुका म्हणे ॥६॥  
 
 ‘इह संसारे खलु दुस्तारे’ असे आदि शंकराचार्य म्हणतात. पार करण्यास अवघड असलेल्या संसाराचे चटके हा आचार्यांचा परानुभव होता. तुकोबारायांना ते चटके प्रत्यक्षतः अनुभवावे लागले. एकामागून एक आलेल्या प्रसंगातून जाताना त्यांची होरपळ झाली. त्यातून आलेल्या पराकोटीच्या उद्विग्नतेने त्यांना प्रपंचाबद्दलची घृणा उत्पन्न झाली. दुस्तर नसलेल्या संसाराची इच्छा त्यांच्या मनात निर्माण झाली. असा संसार म्हणजे देव व संत-भक्तांचा खेळ. त्या संसाराची प्राप्ती हवी असेल तर भगवंताच्या कृपेशिवाय तरणोपाय नाही, हे त्यांच्या मनात पक्के झाले. त्यांनी विचारपूर्वक त्यांचे उपास्य निश्चित केले आहे. क्लिष्ट कर्म-धर्म, सोवळे-ओवळे, पात्रता-अपात्रता, जाचक विधि-निषेध आदी सार्‍यांच्या पलीकडे असलेला, त्यांच्या पूर्वजांनी सेवा करून उपकृत करून ठेवलेला विठ्ठल त्यांना भावला. विठ्ठल हा सर्वशक्तिमान् तसेच कर्तुमकर्तुम् अन्यथा कर्तुम् सामर्थ्य असलेला कृपासागर असल्याचा निस्संशय भाव त्यांच्या मनात दृढ झाला. त्यालाच ते शरण गेले. स्वतःच्या गत आयुष्याचा पाढा त्याच्यासमोर वाचून लौकिक संसारातून सोडवणूक करण्याची मागणी ते विठ्ठलासमोर करतात. त्यांची मागणी प्रातिनिधिक आहे. सार्‍या जनांना बोध व्हावा हा सात्त्विक हेतु त्यांच्या मनात आहे. त्यांचे सांगणे म्हणूनच भावते, मनात रुजते.
 संसाराच्या बंधनात अडकून प्रपंचाचा काच मागे लागला. त्यातील विफलता समजली. त्यातून बाहेर पडण्याची आस निर्माण झाली. ‘आता’ या पदामागे ‘झाले तेव्हढे पुरे झाले’ असा भाव आहे. बेसावधपणे संसार-प्रपंचात वावरत राहिलो होतो; मनाला आता निरंतर सावधपणा (शुद्धी) धारण करण्याची शक्ती (धृति) तुकोबाराय प्रथम मागतात. ‘झाले गेले गंगेला मिळाले’. इथून पुढे बुद्धी, जी भ्रमिष्टपणे गुंतून राहिली होती, ती योग्य मार्गावर राहावी, असे पुढचे मागणे आहे. गायत्रीमंत्राच्या तिसर्‍या चरणात असेच मागणे आहे, ‘धियो यो नः प्रचोदयात्’. बुद्धीचे शोधन होणे तसेच तिला सत्कर्माची प्रेरणा मिळणे महत्वाचे आहे, असे येथे तुकोबारायांचे सांगणे आहे. केवळ मार्गभ्रष्ट बुद्धीमुळे करनकरी वृत्ती अंगात बाणली गेली होती. त्यातून कर्मबंधनात बांधलो जात होतो. परिणामी (बद)नशिबाचा फेरा आणि जन्म-मृत्युरूपी कालचक्राचे संकट (संधी) स्वतःवर ओढवून घेतले आहे. ‘कृपेचा सागर असलेल्या विठ्ठला, या संकटातून तू सोडवून माझा स्वीकार करावास्’, असे पुढे तुकोबाराय मागतात,
 विठ्ठलाच्या सामर्थ्याबद्दल आपल्या मनातील दृढ विश्वास व्यक्त करताना तुकोबाराय म्हणतात की, त्याने मनात आणले तर तो काय करू शकणार नाही अर्थात् तो सर्व काही करण्यास समर्थ आहे. तो मोहरीच्या दाण्याएव्हढ्या खड्याला डोंगरएव्हढा आकार देतो नि पर्वताला मोहरीच्या दाण्याएव्हढा लहान करतो. अशा सर्वसामर्थ्यशील असलेल्या विठ्ठलाला आई संबोधून त्याच्या अंतःकरणातील करुणा तुकोबाराय जागी करतात. त्या करुणेची सावली (साई) त्याने आपल्यावर धरून होणारी होरपळ थांबवावी, अशी मागणी धृपदाद्वारे करतात.
 विठ्ठलाने आपल्यावर करुणेची सावली का करावी, याचे स्पष्टीकरण पुढे तुकोबाराय देतात. जीव म्हणून स्वभावजात जे गुण होते, त्या गुणांमुळे जन्मजन्मांतरीचा मागील काळ केवळ अज्ञानाने व्यतित केला. संसाराचा गाडा ओढताना आयुष्य क्षणाक्षणाने उणे होत होते, याची जाणीवही झाली नाही. चकवा लागावा तसा एकाच जागी भ्रमित होऊन फिरत राहिलो. परिणामी पुढचा मुक्काम (पेणें) गाठता आलेला नाही, याची खंत मनाला लागून राहिली आहे. अज्ञानामुळे जन्मामागून जन्म घेत जी पायपीट चाललेली आहे, त्याचे आता भय वाटत आहे. सार्‍या आयुष्यात केले काय, तर ज्याचे स्मरण केले असता चकव्यातून सुटका झाली असती, त्याचे स्मरणही केले नाही. स्वतःची चाललेली पायपीट आणि विठ्ठलाचे स्थिर पाय यांची तुकोबारायांनी केलेली तुलना येथे मन वेधून घेते.
 जीवन जगताना ईश्वराची आठवण न ठेवणे हा अपराध असल्याचे तुकोबारायांचे सांगणे आहे. त्या हेतुने अपराधीपणाची भावना पुढे तुकोबाराय व्यक्त करतात. त्यांना वाटते की, त्यांचा हा अपराध अक्षम्य ठरणारा आहे. तथापि, त्यांचे आतले मन सांगत आहे की, अपराध, मग तो कितीही मोठा असो, जो सर्वसामर्थ्याने युक्त आहे, तोच अशा अपराध्याला क्षमा करण्यास समर्थ असतो. विठ्ठलाला तुकोबाराय इथे ‘पुरुषोत्तम’ नावाने पुकारतात. हा विठ्ठलच जगत्कर्ता-जगत्धर्ता-जगत्हर्ता असलेला आदिपुरुष आहे. कर्तुमकर्तुम् अन्यथाकर्तुम् सामर्थ्य असलेल्या विठ्ठलरूपी पुरुषोत्तमाने कृपा दाखविली तर तो आपण केलेले सारे अपराध पोटात घेईल, ते क्षम्य होतील. केल्या अपराधांची केवळ क्षमायाचना न करता तुकोबाराय अशीही इच्छा प्रकट करतात की, असा अपराध पुन्हा आपल्याकडून घडू नये, यासाठी विठ्ठलाने त्यांच्या मनातील सारा संभ्रम दूर करून, त्याच्या नामाच्या ठिकाणी निरंतर प्रेम आपल्या मनात रुजवावे.
 अभंगाच्या शेवटच्या चरणात तुकोबाराय मागणी करतात की, त्यांच्या चित्तात विठ्ठलाचे गुण वास करोत्, वाणीने ते गुण कीर्तन करून त्या मधुर रसाचे निरंतर सेवन करता यावे आणि त्यांना कृपावंत विठ्ठलाने आपल्या पायापाशी आश्रय देऊन सेवा (चरणी) स्वीकारावी. असे झाले तरच तुकोबारायांची आकां॑क्षा (धणी) पूर्ण होणार आहे.
(क्रमशः) 

संपर्क : (डॉ. रामपूरकर : ०९८२०३७६१७५)