शिवले जरी कितीही, धस लागतोच का?

गझल
वृत्त: विद्युल्लता
लगावली: गागाल/गालगागा/गागाल/गालगा
****************************************

शिवले जरी कितीही, धस लागतोच का?
हा जन्म लाभलेला, जात्याच फाटका!

कशिदा करून कोठे गरिबी लपेल का?
येतोच ओळखाया माणूस फाटका!

या चेहऱ्यात माझ्या साधर्म्य कोणते?
डोळ्यावरी जगाच्या येतोच नेमका!

इतकी न वांझ माझी कुठली विषण्णता!
वाया न जायचा हा कुठलाच हुंदका!!

डोके किती स्वत:चे फोडून घेतले!
गेला पिढ्यापिढ्यांना करुनीच पोरका!!

त्यांनी करो कितीही माझी विटंबना....
प्रत्येक शब्द माझ्या गझलेत बोलका!

करतोस चूक मजला समजून भोळसट!
कळतो तुझा मलाही तो शब्द बेरका!!

उडतात कैक ठिकऱ्या लाटांमुळे जरी;
तरतोच मी तरीही, मी एक ओंडका!

त्यांनी खड्याप्रमाणे वेचून फेकले.......
मी एकटाच होतो त्यांच्यात नेटका!

नाही कुणी फिरकले, होतोच एकटा!
मी उंच शिखर होतो, होतोच वेचका!!

होती तशीच दुनिया आहे अजूनही!
केला प्रयत्न मीही थोडा न थोडका!!

-------प्रा.सतीश देवपूरकर
भूशास्त्र व खानिज तेल तंत्रद्न्यान विभाग,
नौरोसजी वाडिया महाविद्यालय, पुणे.
फोन नंबर: ९८२२७८४९६१