पिस्ता आईस्क्रीम !

     फिस मधून घरी आलं की चप्पल बूट न काढता डायरेक्ट फ्रीज उघडायचा, तोंडात टाकायला काही खाऊ मिळतोय का ते आधी पाहायचं. खरंतर माहीत असतं की फ्रीज मध्ये काही सापडणार नाहीये, कारण खाऊ हा टिकवून आणि पुरवून खाण्यासाठी नसून, एका झटक्यात संपवायची गोष्ट असते, ह्या विचारांचा मी आहे.
त्या दिवशी फ्रीजर मध्ये एक भांड ठेवलं होतं ! साहजिकच मी बघितलं तर त्यात पिस्ता आइसक्रीम ! इतक्या उन्हाळ्यात जोरजोरात सायकल मारून दमून घरी यायचं. तो दम घालवायला अजून भारी काय असू शकेल !
लगेच चमचा घेऊन खायला सुरू करायची इच्छा झाली. तत्पूर्वी मनात एक विचार आला. आइसक्रीम कोणी दिलं असावं ? आणि ते भांड्यात का ? तितक्यात फ्रीजच दाराच्या कप्प्यात एक पाकीट दिसलं. "पिस्ता आईस क्रीम पावडर ".
बघून एकदम आश्चर्य वाटलं. क्या बात हे, आमच्या मातोश्रींनी चक्क आज आइसक्रीम केलं ? जोरात आहे बुवा !
ह्याआधी तिनी घरी आइसक्रीम बनवायचा प्रयत्न केला होता, पण तो खूप वाईट पद्धतीनं फसला होता. वर भरपूर बोलणी पण खाल्ली होती. त्यानंतर आइसक्रीम बनवायच्या फंदात आई कधी पडली नाही.
आज आइसक्रीम केल्याचं किंवा करणार असल्याचं आईने मला बहुतेक मुद्दाम सांगितलं नव्हतं. बहुतेक तिला मला सरप्राइज द्यायचं असावं !
मी डबा तसाच ठेवून फ्रीज बंद केला. जेवण होईपर्यंत ह्यावर आई आणि माझ्यात काहीच चर्चा झाली नाही. जेवण झाल्यावर मी तोंड धुऊन माडीवर निघालो.
तितक्यात आई लाडात म्हणाली "आज मी गंमत बनवलीये ! ओळख बरं काय ? ".
तिच्या त्या निरागसतेकडे कायमचं बघत बसावं असं मला वाटलं.
मी भानावर आलो आणि मुद्दाम माझ्या आवडीच्या २-३ पदार्थाची नावे घेतली. त्यावर आईने मान हालवून नकार दिला.
"सांग बाई काय केलंयस, मला नाही सुचत" मी हरल्याचं तिला दाखवून दिलं.
तिनी पटकन फ्रीज उघडून आतले आइसक्रीम बाहेर काढले.
"वा, आज पिस्ता आइसक्रीम का !" मी आश्चर्यचकित होऊन उद्गारलो. खरंतर त्याच्याकडे नं बघताच ते पिस्ता आइसक्रीम आहे ते मी ओळखलं, ही गोष्ट आईच्या लक्षातच आली नाही.
ती अगदी मन लावून बशीमध्ये आइसक्रीम काढत होती. बशी माझ्या हातात येताच मी पटापट ते ग्रहण करण्यास सुरू केली.
काय सुंदर चव होती त्याची, खरंच खूप अप्रतिम झालं होतं आइसक्रीम !
"वा, म्हातारे, काय मस्त झालंय ! जबरदस्त !" मी एकदम खूश होऊन म्हणालो.
"मग ??? मला पण येतं आइसक्रीम करायला ! तुला काय वाटलं " तिनी एक चमचा खाता खाता एकदम ताठपणे उत्तर दिलं.
"दत्त्या, दांड्या आणि इतर पोरांना बोलाव की " ती म्हणाली.
"त्यांना उद्या बोलावू, आता आपण दोघच खायचं " मी म्हणालो. मित्रांसाठी थोडं बाजूला काढून ठेवलं आणि बाकी सगळं मी आमच्या बश्यांमध्ये घातलं.
दोघही एकमेकांकडे बघून, अगदी मिटक्या मारत आइसक्रीमवर ताव मारत होतो.
तो क्षण खूप विलक्षण होता, मला फक्त आई दिसत होती, तिच्या चेहऱ्यावरचा आनंद दिसत होता. त्या आइसक्रीम पुढे ती सुजाताची मस्तानी, ते बास्किन रोबिंस चं महागडं आइसक्रीम अगदी फिकं पडलं होतं.
आईच्या चेहऱ्यावरच्या आनंदापेक्षा अजून सुंदर काहीच नव्हतं ! खरं सुख आइसक्रीम मध्ये नसून तिच्या चेहऱ्यावर दिसणाऱ्या समाधानात होतं ! आइसक्रीम तर फक्त जिभेला चव देत होतं. पण तिच्या चेहऱ्यावरचे प्रेम, निरागसपणा, समाधान आणि तळमळ ह्या गोष्टींनी माझ्या आयुष्यातच खूप गोड चव आणली होती.
तिच्या नजरेत बघून असं वाटलं, 'देवा, तिच्या चेहऱ्यावरचा आनंद असाच कायम ठेव. आणि तो ठेवण्यासाठी मला सामर्थ्य दे !'
~*~