नाटाचे अभंग... भाग १०

९.  काय मी उद्धार पावेन । काय कृपा करील नारायण ।
 ऐसें तुम्ही सांगा संतजन । करा समाधान चित्त माझें ॥१॥
 काय हें खंडईल कर्म । पारुषतील धर्माधर्म ।
 कासयानें तें कळेल वर्म । म्हणऊनि श्रम वाटतसे ॥धॄ॥
 काय हे स्थिर राहेल बुद्धि । कांहीं अरिष्ट न येल की मधीं ।
 धरिलें जाईल तें सिद्धि । शेवट तो कधीं मज न कळे ॥३॥
 काय ऐसे पुण्य होईल गांठीं । घालीन पायीं देवाचे मिठी ।
 मज तो कुरवाळील जगजेठी । दाटईन कंठीं सद्‍गदित ॥४॥
 काय हे निवतील डोळे । सुख तें देखोनि सोहळे ।
 संचित कैसें तें न कळे । होतील डोहळे वासनेसीं ॥५॥
 ऐसी चिंता करीं सदा सर्वकाळ । रात्रंदिवस हेचि तळमळ ।
 तुका म्हणे नाहीं आपुलें बळ । जेणे फळ पावेन निश्चयेंसी ॥६॥

 प्रस्तुतचा नाटाचा अभंग हा सांप्रदायिक जनांमध्ये सर्वश्रुत असून् तो तीव्र मुमुक्षुत्व प्रकट करणारा आहे. यात संतांच्या अलौकिक सामर्थ्याचा विचार मांडला आहे. जीवाला स्वोद्धार साधण्यासाठी उत्क्रांतीत मानवजन्मयोनीचा लाभ ही पहिली पायरी असून मनुष्यत्व ही दुसरी पायरी तर मुमुक्षुत्व ही तिसरी पायरी आहे. महापुरुषसंश्रय ही चवथी पायरी असून महापुरुष या संज्ञेत संत आणि अतिव्याप्तीने भगवंताचाही समावेश होतो. संतांपासून भगवंत वेगळा राहू शकत नाही. किंबहुना, संतांच्या मुखातून देवच बोलत असतो. या अभंगात तुकोबारायांचा संपूर्ण संवाद देवाऐवजी संतजनांशी केलेला आहे. यातून त्यांनी स्वतःच्या उद्धाराची लागलेली तीब्र तळमळ विविधांगांनी प्रकट केलेली आहे. त्याचबरोबर आपले जे काही पारमार्थिक प्रयत्न वा साधना चाललेली आहे, त्याबद्दल कुठलाही आडपडदा वा अभिमान न बाळगता त्यांच्या मनातील शंका ते व्यक्त करतात. यामधून ज्याप्रमाणे संतांविषयी तसेच त्यांच्या सामर्थ्याविषयी तुकोबारायांच्या मनात असलेला दृढ विश्वास व्यक्त होत आहे, त्याचप्रमाणे त्यांचा पूर्व अभ्यास, सखोल चिंतनही पाहावयास मिळत आहे. खर्‍या अर्थाने संत हेच देव आहेत, याबाबतची विविध प्रमाणे संतवाङ्मयातून दिलेली आहेत (देव तें संत देव तें संत, संत माझ्या सचेतन मूर्ती वगैरे). म्हणूनच असे म्हणता येते की, संतांकडे परिहार देताना त्यांचे मनोगत देवांपर्यंत पोहोचणार आहे याची तुकोबारायांना खात्री आहे. तुकोबाराय स्वतःच्या भवितव्याबाबत संशय प्रकट करीत असले तरी त्यांच्या या वाग्यज्ञामध्ये कुठेही यत्किंचित अहंकार नाही, अभिमान नाही. त्यांना पूर्ण कल्पना आहे की, त्यांचे बोलणे भगवंत ऐकत आहे आणि त्याला अहंकाराचा तीव्र तिटकारा आहे. देवाला दैन्यत्व फार प्रिय आहे ज्याला शास्त्रामध्ये कार्पण्यभाव (मनाची दुर्बलता, दैन्य) असे म्हटले जाते (ईश्वरस्य अपि अभिमानद्वेषित्वात् दैन्यप्रियत्वात् च ।... नारद भक्तिसूत्र). 
 अभंगाची सुरुवात करताना तुकोबाराय त्यांच्या बोलण्याचा मूळ हेतु कुठलाही संकोच न बाळगता उघड करतात. तुकोबारायांना उद्धार साधून घ्यावयाचा आहे. जन्ममरणाच्या बखेड्यातून सहजासहजी जीवाची सुटका न होता पुन्हा पुन्हा त्याच चक्रात अडकून अनंत फेरे घेत राहतो. तुकोबारायांना जो काही प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष सत्संग घडला, त्यामधून त्यांना उमगलेले आहे की, मानवयोनीची प्राप्ती हीच आत्मोद्धारासाठी एकमेव संधी आहे. देवांनाही याच योनीत येऊन आत्मोद्धार करून घ्यावा लागतो. (स्वर्गीचे अमर इच्छिताती देवा । मृत्युलोकीं व्हावा जन्म आम्हां ॥ नारायण नामें होऊं जीवनमुक्त...). म्हणून तुकोबाराय आपल्या स्वतःच्या उद्धाराबद्दलची अत्यंत उतावळी व्यक्त करतात. आपल्या मनातली आकांक्षा संतांपुढे प्रकट करण्यामागील भाव असा आहे की, संत हे दयेचे सागर असल्याने ते देवाकडे भीड घालून तुकोबारायांच्या उद्धारासाठी विनवणी करतील. संतांनी केलेली विनवणी देव मान्य केल्याशिवाय राहात नाही (प्रमाण त्यांच्या बोला । देव भक्तांचा अंकिला ॥ किंवा, अवचटें त्याच्या मुखाबाहेरी । ज्यासी म्हणे तुज देवो तारी । त्यासी मी वाउनिया शिरीं । ब्रह्मसाक्षात्कारी पाववीं ॥ - एक.भाग.११.३४४). संत हे कृपेचे सागर आहेत. कृपा करतेवेळी त्यांच्या ठायी आपपर भाव नसतो. संतांच्या वचनाला भगवंत बाध येऊ देत नाही, त्यांचे बोल तो खोटे होऊ देत नाही. या अनेकविध कारणांमुळे तुकोबाराय प्रश्न करतात - ‘काय मी उद्धार पावेन ।’ आणि जीवाच्या उद्धारासाठी देवाची कृपा आवश्यक असल्याने पुढे ते विचारतात - ‘काय कृपा करील नारायण ।’ या जोडप्रश्नांमागचा तुकोबारायांचा भाव असा आहे की, संत कधीही कुणाशीही असत्य बोलत नाहीत. आपल्या विनवणीचा अनादर न करता योग्य तो उपदेश करून, मार्ग दाखवून संतच आपले समाधान करू शकतील. इथे एक प्रश्न पडतो की, तुकोबारायांनी आपले मनोगत नक्की कुणापुढे व्यक्त केले आहे ? या विषयी असे म्हणता येईल की, त्यांच्या वंशातील परंपरेप्रमाणे ते पंढरपूरच्या वारीसाठी गेले असावेत. तेथे अनेक संतजन एकत्र येत असतात. चंद्रभागेच्या वाळवंटात चाललेले एखादे भावपूर्ण कीर्तन तुकोबारायांनी श्रवण केले आणि त्यांच्या मनातील उलघाल व्यक्त झाली.
 जो काही संतसंग तुकोबारायांना घडलेला आहे, त्यातून त्यांना याची निश्चित अशी जाणीव झालेली आहे की, कर्मातून कोणत्याच जीवाची सुटका नाही आणि जोपर्यंत कर्माचे खंडण होत नाही, तोपर्यंत, अगदी भगवंताच्या मनात आले तरी, उद्धार साधणे शक्य होणारे नाही. जोपर्यंत देहात प्राण आहे तोपर्यंत जीवाची कर्मातून सुटका नाही. मनुष्ययोनीत आल्यानंतर मागे लागलेली कर्मे विविध प्रकारची असतात. काया-वाचा-मने ही कर्मे नित्य घडतच असतात. ही कर्मे करीत असताना पदोपदी लोकरीत आणि धर्म-अधर्माचा विचार मनात येत राहतो. शास्त्रांचा दाखला देत जाणत्या लोकांनी एक सांगावे तर बदलत्या काळातील नवे मतप्रवाह (जे सनातन विचारधारणेला छेद देत राहतात) अशा उलट-सुलट वर्णनांमुळे सामान्य माणसासाठी कर्माचरण ही तारेवरची कसरत ठरत असते. भरल्या पोटी धर्माधर्माची उठाठेव करणे शक्य होणारे असते आणि जे काही करावे ते जनसंमत होऊन जाते. परंतु हीनदीन झालेल्यांना, रोजच्या ओढगस्तीला तोंड देत जे जगत असतात, त्यांच्या मनाची होणारी कुतरओढ (श्रम) असह्य होणारी असते. तुकोबाराय या परिस्थितीतून जात असल्यामुळे त्यांना कर्माचे खंडण आणि धर्माधर्माच्या जाचक बंधनांच्या प्रभावातून सुटका साधण्यासाठी अटकळ जाणून घ्यायची आहे. ही अटकळ माहित नसल्याने जे करावे ते केवळ श्रमालाच कारण ठरत असते. सुखे आचरावयाच्या कर्म-धर्माचे ते वर्म या संतजनांनी उलगडून दाखवावे, असे तुकोबारायांना अभंगाच्या या ध्रुपदात विनवायचे आहे. संतजनांनी या विषयी केलेले समाधान हे सार्‍याच जनांना मार्गदर्शक ठरणारे असल्याने तुकोबारायांनी ही पृच्छा ध्रुपदातून व्यक्त केली आहे.
 पुढील चरणात प्रथम तुकोबाराय बुद्धीच्या स्थिरतेचा विचार मांडतात. हाती घेतलेल्या कार्यात यश मिळण्यासाठी प्रथमतः बुद्धीची एकाग्रता आवश्यक असते. ही बुद्धी निश्चयात्मिका असली तरी मनाचे चांचल्य तिला स्थिर होऊ देत नाही आणि धरसोड वृत्ती ही कार्यास साफल्य मिळू देत नाही. दुसरा भाग असतो तो, अडथळ्यांचा. तुकोबाराय येथे ‘अरिष्ट’ हा शब्द योजतात. यातून स्वतःची असावधानता (आध्यात्मिक), दैवयोग (आधिदैविक) आणि नैसर्गिक वगैरे कारणे (आधिभौतिक) अशा तिन्ही मार्गांनी येणार्‍या अडचणींचा समावेश होतो. तिसरा भाग असतो तो हाती असलेल्या कालाचा म्हणजेच आयुष्याचा. या तिन्ही गोष्टींची अनुकूलता लाभली तर कार्यसिद्धी होऊ शकते. तुकोबाराय या तिन्हींचा एकत्रित विचार येथे मांडतात आणि आपले भवितव्य संतांनी सांगावे, अशी इच्छा प्रकट करतात.
 भगवंताच्या भेटीसाठी प्रारब्धात पुरेसा पुण्याचा साठा, असावयास हवा, हे तुकोबाराय जाणतात. परंतु आपल्या गाठी किती पुण्य आहे, हे सांगता येत नाही. पुण्याचा साठा आहे... भगवंताचे दर्शनही झाले... तरीही त्याच्या अंगसंगाला आपण लायक असावयास हवे... त्याच्या पायी मिठी घालावयासाठी भगवंताने आपला स्वीकार करावयास हवा... त्यासाठी आवश्यक असलेली निष्कामता, अनन्यता, चित्तशुद्धी झालेली असावयास हवी. भगवंताने केवळ आपला स्वीकार करावा, इतकीच अपेक्षा ठेवणे तुकोबारायांना अभिप्रेत नाही. भगवंताने आपल्याविषयी वात्सल्यभाव दाखवावयास हवा, ही अभिलाषा तुकोबारायांना येथे ‘(काय) मज तो कुरवाळील जगजेठी’ या पदातून प्रकट करावयाची आहे. भगवंताने जवळ घेऊन आपल्याला कुरवाळल्याने होणार्‍या पराकोटीच्या सुखाचा अनुभव शब्दातीत असल्याचे सांगण्यासाठी तुकोबाराय म्हणता, ‘दाटईन कंठीं सद्‍गदित’. सुखाचा सोहळा असो वा दुःखाचा उमाळा असो, जेव्हा मनात भावनांचा कल्लोळ माजतो, अशा वेळी कंठ दाटून येत असतो. डोळ्यांना धारा लागतात. स्फुंदणे सुरु होते. अशी स्थिती जेव्हा आनंदातिरेकाने होत असते, तेव्हा अंतःकरण सद्‍गदित होत असते. (अन्यथा केवळ गद्‍गद्‍ अवस्था होते.)
   तुकोबारायांच्या नेत्रांना असे सुखसोहळे पाहण्याची तहान लागलेली आहे. डोळ्यांचे निवणे म्हणजे अन्य काही पाहण्याची इच्छा नुरणे, दृष्टीला परम संतोष लाभणे. सोहळा त्या प्रसंगाला म्हणतात, जेथे यजमान आणि सहभागी उभयतांना सारखाच सात्विक अत्यानंद अनुभवता येत असतो. तुकोबारायांना देवाकडून होणार्‍या वात्सल्ययुक्त स्वीकाराचा एकुलता एक सोहळा नको आहे. असे सोहळे निरंतर अनुभवणे त्यांना अपेक्षित आहे. यासाठी पुण्याचा अक्षय्य साठा असावयास हवा. तो आपल्याकडे आहे का, याबाबत तुकोबारायांच्या मनात साशंकता आहे. त्यांचे हे विचार संतांपुढे मांडून तुकोबाराय साशंकता प्रकट करतात की, ‘(काय माझ्या) वासनेसी डोहळे होतील?’ डोहळे हे गर्भवतीचे लक्षण आहे आणि वासने शिवाय गर्भ नाही. मुक्तीसाठी वासनाक्षय व्हावयास हवा, असे शास्त्र सांगते. तुकोबाराय त्यांच्या मनात जी भगवंत भेटीची तीव्र इच्छा आहे, सद्‍वासना आहे, तिला ते स्त्रीरूप देतात आणि तिला गर्भ राहावा, असे म्हणतात. तिळातिळाने वाढत गर्भ योग्यवेळी जन्म पावतो. तद्वत् वासनेच्या पोटी भगवत्‍भेटीचा क्षण रुजावा, तो पोसला जावा आणि आपल्याला भगवंताची भेट प्राप्त व्हावी, असे तुकोबारायांना वाटते. त्यासाठी ते वाट पाहायला तयार आहेत.
 अभंगाचा समारोप करताना तुकोबाराय आपल्या अंतःकरणातील आशा-निराशेचे तीव्र आवर्त-प्रत्यावर्त व्यक्त करताना संताना निवेदन करतात की, ‘भगवंताची नि माझी भेट होईल का नाही, याचीच चिंता मी निरंतर करीत असतो. रात्रंदिवस मला भगवंताच्या भेटीची तळमळ लागून राहिलेली आहे. हे जरी खरे असले तरी हवे ते फळ मिळविण्यासाठी माझे स्वतःचे बळ तोकडे आहे.किंबहुना तेव्हढे बळ माझ्याकडे नाही.’ या परिस्थितीत ‘संतांनीच माझ्यावर कृपा करून त्यांच्या बळाने माझी आस पुरवावी’, अशी तुकोबारायांची कळळीची विनंती आहे.
(क्रमशः) 

संपर्क : (डॉ. रामपूरकर : ०९८२०३७६१७५)