नाटाचे अभंग... भाग ११

१०. तूंचि अनाथाचा दाता । दुःख मोह नासावया चिंता ।
 शरण आलों तुज आतां । तारी कृपावंता मायबापा ॥१॥
 संतसंगति देईं चरणसेवा । जेणें हा तुझा विसर न पडावा ।
 हाची भाव माझिया जीवा । पुरवीं देवा मनोरथ ॥धृ॥
 मज भाव प्रेम देईं प्रीति । गुण नाम वर्णावया स्तुती ।
 विघ्ना सोडवूनि हातीं । विनंती माझी परसावी हे ॥३॥
 आणिक कांहीं नाहीं मागणें । सुखसंपत्तिराज्यचाड धनें ।
 सांकडें न पडे तुज जेणें । दुजें भक्तीवीण मायबापा ॥४॥
 जोडोनि कर पायीं ठेवितों माथा । तुका विनवी पंढरीनाथा ।
 रंगीं वोढवावी रंगकथा । पुरवीं मनोरथा मायबापा ॥५॥
 
 या नाटाच्या अभंगावर धावता दृष्टीक्षेप टाकला असता हे लक्षात येते की, तुकोबारायांच्या भगवत्भजनामध्ये व्यत्यय (विघ्न) आल्याने ते अस्वस्थ झाले आहेत. दुःखबांदवडी संसाराचा पुरेपूर अनुभव घेतलेल्या तुकोबारायांवर प्रापंचिक अडचणींमुळे असा प्रसंग आला असावा. नामरंगात मन दंग होऊ लागले आणि पत्नीचे करवादणे सुरू झाले. परिणामी ध्यान भंग पावल्याने मनाला उद्वेग आलेला आहे. दैन्यावस्थेत असताना सामान्य सांसारिक माणसाला दुःख-मोह-चिंता यातून सुटणे कर्मकठीण असते, हा सर्वसामान्य अनुभव आहे. अशा परिस्थितीत एका भगवंताशिवाय अन्य कुणी त्राता किंवा पाठीराखा असू शकत नाही. तुकोबारायांची परमनिष्ठा पांडुरंगावर दृढ झालेली आहे. पुन्हा अशी परिस्थिती उद्‍भवू नये, अशा विचाराने ते पांडुरंगाला साकडे घालीत आहेत. या अभंगातून मागणे मागणारा, मागणी पुरवणारा, मागणीमागचा हेतु, मागणीतील उदात्तता व कौशल्य, मागणी पुरवणार्‍याची वृत्ती व सामर्थ्य, मागणी मागणार्‍याचे आत्यंतिक हित आदी बाबी स्पष्ट होत आहेत.
 अभंगाच्या प्रारंभी तुकोबाराय पंढरीच्या ‘नाथाला’ अनाथाचा ’दाता’ असे संबोधित आहेत. दाता दोन प्रकारचा असतो. पहिल्या प्रकारातला दाता हा असा असतो की, काही देणे हे त्याच्या मर्जीवर अवलंबून असते आणि मागणार्‍याने मागितले आणि तेव्हढे दिले की, दात्याचा नि मागणार्‍याचा काही भावनिक संबंध राहातोच असे नाही. दुसर्‍या प्रकारातला दाता हा अकारण दया दाखविणारा, उदार, सहृदय असतो. मागणार्‍याने जे मागितले ते संकोचाने तर मागितले नाही ना, ते त्याला पुरेसे आहे की, अजून त्याला कशाची आवश्यकता आहे, हे तो स्वतःहून जाणतो व त्याप्रमाणे दान देतो. असे म्हणता येते की, भगवंत हा पहिल्या प्रकारातला दाता आहे तर संत हे दुसर्‍या प्रकारातील. तुकोबारायांचे मागणे चतुराईचे आहे. ते निवेदन करतात की, दुःख, मोह, चिंता यांचा नाश व्हावा, यासाठी त्यांची शरणागती आहे. त्यांचे मागणे हे स्वाभाविकपणे दात्याला विचारात पाडणारे आहे. मागणार्‍याचे दुःख, मोह, चिंता दूर करण्यासाठी, त्याला मानसिक स्थैर्य लाभावे, यासाठी नक्की काय द्यावयास हवे, याचा निर्णय तुकोबाराय या दात्यावर सोपवीत आहेत. प्रापंचिक कारणांनी होणारी शरणागताच्या मनाची दोलायमान स्थिती जाणण्यास आणि तदनुरूप जे काही द्यावयास हवे, ते हा दाता समर्थ आहे, याविषयी तुकोबारायांना विश्वास दाखवावयाचा आहे. खरे म्हणजे हा प्रारब्धाने होणारा लाभ आहे, हे तुकोबाराय जाणतात आणि म्हणूनच त्याविषयी ते बोलत नाहीत. हा दाता सारे जाणतो, असा त्यांचा विश्वास आहे. या दात्याची स्तुती करताना ते त्याला ‘कृपावंत’ म्हणतात. त्यातून ते दात्याचे सामर्थ्य व्यक्त करतात. शरण आलेल्याचे सर्व प्रकारच्या कृतीने (कृ) रक्षण करणारा, कृपण नसणारा, असा जो आहे, तो कृपावंत होय. तुकोबाराय नंतर ‘मायबाप’ असे संबोधन वापरतात. यातून प्रथम स्वतःचे दैन्यत्व प्रकट करून आपले रक्षण करण्यासाठी या दात्याने दया दाखवावी, तसेच, त्याने आपली आई आणि पित्याची भावना दर्शवावी, असा तुकोबारायांचा भाव आहे. ‘माता’ ही ममत्व(म्), आहार(आ) यातून तर्पण व तारण करणारी (ता) असते तर ‘पिता’ हा रक्षण (प), बल (इ) यातून तर्पण व तारण करणारा (ता) असतो.
 आपली मागणी ऐकून समोरचा दाता विचारात पडलेला पाहून तुकोबाराय त्यांच्या मागणीचे स्पष्टीकरण देतात. त्यांना हवी आहे केवळ संतसंगती आणि त्यांची चरणसेवा. त्यांची ही मागणी ऐकून पंढरीनाथ दातार नक्कीच प्रसन्न होणारा आहे. कारण संतांबद्दल हा दाता हळवा आहे (तुका म्हणे संतसेवा । हेचि देवा उत्तम ॥). तुकोबाराय पुढे असेही सांगत आहेत की, या मागणीमागे त्यांच्या मनातला एकमेव भाव जो आहे, तो म्हणजे, आता जसा भगवंताचा विसर पडला आहे (हा विसर) तसे पुन्हा कदापि घडू नये. मनात भगवंताचा आठव निरंतर राहावा, यासाठीचे अत्यंत महत्वाचे आणि सोपे असलेले साधन म्हणजे संतसंगती व त्यांचे अनुचरण करणे. परंतु मेख अशी आहे की, कितीही तीव्र इच्छा असली तरी भगवंताच्या कृपेशिवाय संतसंगती आणि त्यांचे अनुचरण करण्यासाठी हवी असलेली स्थिर बुद्धी लाभत नाही. म्हणून परिपक्व मुमुक्षुत्वात या लाभासाठी भगवंताची याचना करावी लागत असते.
 भगवंताचा विसर पडू नये, यासाठी अंतःकरणात प्रथम तसा भाव निर्मिला जावयास हवा. या भावाचे परिपोषण होऊन तो क्रमशः प्रेम आणि प्रीतीत परिवर्तित व्हावयास हवा. भाव हा प्रतिसादात्मक अभिलाषायुक्त असतो. प्रेमात निरपेक्षता नसते, प्रतिसाद हवा असतो. तर,  प्रीतीमध्ये कोणत्याच प्रतिसादाची अपेक्षा राहात नाही. भाव-प्रेम-प्रीती यांचे साधन आहे ते भगवंताचे नाम, गुण, कीर्ती यांचे गान. हे करीत असताना काही विघ्न आलेच, तर त्यातून हातोहात (हातीं), विनाविलंब सोडवण्याची तुकोबारायांची विनंती पंढरीनाथाने ऐकावी (परिसावी), असे तुकोबाराय विनवतात.
 तुकोबारायांच्या विलक्षण मागणी ऐकून दात्याला पडलेल्या प्रश्नातून पूर्ण सोडवणूक करण्यासाठी तुकोबाराय त्यांचे मानस स्पष्ट करताना निवेदन करतात की, त्यांना सुख, संपत्ती, राज्य, सत्ता, धन आदी काहीच नको आहे. ‘चाड’ या शब्दाचा मागोवा घेताना या शब्दाचा पर्वा, तमा, आवड असा मर्यादित अर्थ जरी दाखविला जातो, तरी तुकोबाराय इथे हा शब्द सुख-संपत्ती-राज्य या लौकिक लाभ दाखविणार्‍या शब्दांना जोडत आहेत व नंतर धने (अनेक प्रकारचे धन जसे पैसा, पशु, स्त्री, पुत्रादी संतती वगैरे) असा जोड आहेत. एकंदरीत पाहता इथे ‘चाड’ या शब्दाचा अर्थ कीर्ती, मान, जनमान्यता असा करणे गैर ठरू नये. तुकोबारायांना सुख-संपत्ती आदी, जे नाश पावणारे आहे ते, मागण्याची अजिबात इच्छा नाही, कारण याचकाच्या या लौकिक मागण्या पुरविणार्‍याला संकटात सापडल्यासारखे वाटते (सांकडे पडे). तुकोबाराय स्पष्ट करतात की, ‘तुला असे संकटात न घालता मी तुझ्या भक्तीशिवाय अन्य काहीही मागत नाही.’ या मागणीमागे तुकोबारायांचा असा भाव आहे की, हा सर्वसमर्थ दाता ज्याच्यावर प्रसन्न होतो, त्याला त्याच्या इच्छेनुसार भुक्ती देतो तसेच तो मुक्तीही देतो परंतु भक्ती मात्र मागून मिळविता येत नाही. संतसंगाने व त्यांच्या अनुचरणातून प्रसादरूपाने भक्तीचा लाभ होतो. म्हणून तुकोबाराय भक्तीचे बीजरूप असणारा संतसंग भगवंताजवळ मागत आहेत.
 अभंगाचा समारोप करताना आपला विनम्र भाव कायम ठेवून साष्टांग दंडवत घालतात आणि द्विरुक्ती करून त्यांचे मनोरथ पुरविण्यासाठी पंढरीनाथाच्या चरणी विनंती करतात व शेवटी कळकळीने विनवतात की, भगवंताचे जे नामगायन, कथाकीर्तन (रंगकथा) करावयाचे आहे, ते निरस होऊ नये तर ते माधुर्याने ओतप्रोत भरून जावे जेणेकरून आम्हा सार्‍यांचे मन एकतानतेने त्याच रंगात रमून राहील.

(क्रमशः) 

संपर्क : (डॉ. रामपूरकर : ०९८२०३७६१७५)