नाटाचे अभंग... भाग १२

११. सेंदरीं हेंदरीं दैवतें । कोण तीं पूजी भूतेंखेतें ।
 आपुल्या पोटा जीं रडतें । मागती शितें अवदान ॥१॥
 आपुले इच्छे आणिकां पीडी । काय तें देईल बराडी ।
 कळों ही आली तयाची जोडी । अल्प रोकडी बुद्धि अधिरा ॥धृ॥
 दासीचा पाहुणेर उखितें । धनी देईल आपुल्या हातें ।
 करुणाभाषण उचितें । हें तों रितें सतत शक्तिहीन ॥३॥
 काय तें थिल्लरीचें पाणी । ओठ न भिजे न फिटे धणी ।
 शीण तरी आदीं अवसानीं । क्षोभें पुरश्चरणीं दिलें फळ ॥४॥
 विलेपनें बुजविती तोंड । भार खोळ वाहाती उदंड ।
 करविती आपआपणयां दंड । ऐसियास भांड म्हणे देव तो ॥५॥
 तैसा नव्हे नारायण । जगव्यापक जनार्दन ।
 तुका म्हणे त्याचें करा चिंतन । वंदूं चरण येती सकळ ॥६॥
  
  प्रापंचिक जीवनात माणसावर कधी कधी असे प्रसंग येत असतात, जे त्याला जिणे नकोसे करून सोडतात. त्यातून सुटका करून घेण्यासाठी त्याला कुणाचा तरी आधार हवा असतो. अज्ञ जनांना हा आधार देणारा कुणी तरी भेटतो आणि हे कर, ते कर असे सांगतो. त्रासलेला जीव एक तर स्वतः विचार करून आपल्या विवेकाने त्या सुचविलेल्या उपायांबाबत निर्णय घेण्याच्या पात्रतेचा नसतो किंवा ‘इतके उपाय केले, हे करून पाहू’ अशा विचाराने त्या मार्गाने जातो. गंडे-दोरे, उतारे, जीवांचा बळी देणे अशासारखे मार्ग तो केवळ अंधविश्वास ठेवून चोखाळतो. दैवतांची उपासना करून दैवताची कृपा प्राप्त करून घेणे यास तुकोबारायांचा विरोध असणे शक्यच नाही. किंबहुना, तोच सन्मार्ग आहे, हे सार्‍याच संतांचे सांगणे आहे. तुकोबारायांना पथभ्रष्ट अज्ञ जनांचे प्रबोधन करावयाचे आहे. ते अज्ञ जनांना दोष देत नाहीत, कारण त्यांची बुद्धीच तोकडी असते. त्यासाठी क्षुद्र दैवते व त्यांच्या नादी लावणारे स्वार्थी दलाल यांचे फोलपण ते या अभंगाद्वारे उलगडून सांगतात. यात तुकोबारायांचा असाही दृष्टीकोन दिसतो की, अज्ञ जनांना सन्मार्गावर आणणे, ही सुद्धा एक प्रकारे ईशसेवाच ठरते. अन्यत्र त्यांनी म्हटलेही आहे, ‘आड वाटें जातां लावी नीट सोई । धर्मनीति तेही ऐसी आहे ॥’ स्वतःला पूजा-उपासनेचे स्वरूप न समजलेले आणि दुसर्‍यांना आडमार्गी नेणारे जे आहेत, त्यांच्या विषयी ज्ञानेश्वरमहाराजही टीका करतात. ते अशा भोंदू जनांविषयी बोलताना त्यांना उसाची गोडी न जाणता केवळ वाढ्याचा पाचोळा खाणार्‍या शेळीची उपमा देऊन संभावना करतात. तुकोबाराय मात्र प्रसंगी कठोर शब्दांनी कान‍उघाडणी करतात. ‘अंगीं घेऊनियां वारें दया देती । तय भक्तां हातीं चोट आहे ॥ देव्हारा बैसोनि हालविती सुपें । ऐसी पापी पापें लिंपती ती ॥’...‘तयांचे स्वाधीन दैवतें असती । तरी कां मरती त्यांचीं पोरें ॥’ असे रोखठोक प्रश्न ते विचारतात आणि प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे खर्‍या देवाची महती वर्णन करतात. या अभंगातही आपल्याला हा प्रत्यय येतो.
 अभंगाच्या सुरुवातीला तुकोबाराय तुटून पडतात ते भोंदू तांत्रिकमांत्रिकांवर. ते ज्या दैवतांच्या मागे लागतात, त्या दैवतांच्या रूप-गुणांवर तुकोबाराय भाष्य करतात. ‘सेंदरीं हेंदरी’ दैवतें’ असा उल्लेख शेंदूर लेपलेली, ओंगळवाणी दिसणारी (म्हसोबा, मरीआई वगैरे) दैवते दर्शवितो. ही कुणी पूजतात तर कुणी भूत-पिशाच्चादींना वश करून घेत असतात. इथे हे लक्षात घ्यावयाचे आहे की, गणपती, मारुती यांच्या मूर्तीही शेंदूर लेपलेल्या असतात. परंतु ही दैवते वेद-इतिहास-पुराणांनी आदराने स्वीकारलेली आहेत. तुकोबाराय स्वत: या दैवतांचा अतिशय आदर करतात. या दैवतांचा पूजनविधी शास्त्रोक्त असल्याने तेथे ओंगळपणा आढळत नाही. त्यामुळे तुकोबारायांचा रोख ज्या दैवतांकडे आहे, त्यात ते अशा सनातन दैवतांचा समावेश करीत नाहीत आणि म्हणूनच ‘हेंदरी’ हे पद ते ‘सेंदरी’ या पदाला जोडतात. समाजात काही संधीसाधू तांत्रिकमांत्रिक लोकांनी स्वतःच्या उदरभरणार्थ अशी क्षुद्र दैवते निर्माण करून ठेवलेली असतात व त्या दैवतांच्या जागृतपणाविषयी या ना त्या प्रकारे ते लोकात अंधविश्वास पसरवितात. काही तांत्रिकमांत्रिक भूत-पिशाच्चादींवर आपली सत्ता असल्याचे दाखवित असतात. अशा या ओंगळ दैवतांविषयी तुकोबाराय म्हणतात की, ही दैवते किंवा भूत-पिशाच्चादी अतृप्त आत्मे सदा भुकेले राहून तृप्तीसाठी भाताचे पिंड वगैरे जे त्यांचे खाद्य असते ते मागत राहतात. तुकोबाराय येथे ‘अवदान’ हे पद योजतात. दैवतांच्या पूजनात नैवेद्य अर्पण करावयाचा एक विधी असतो. हा नैवेद्य सुस्वाद असणारा असतो. तो शास्त्राने प्रतिपादलेला, भक्तांना मानवणारा, भक्तांना पोसणारा असतो. ‘अवदान’ या पदातील ‘अव’ हे उपपद निकृष्टता दाखविणारे असून ते ‘दान’ या पदाशी जोडलेले आहे. दिलेली लाच, भ्रष्ट मार्गाने, सक्तीने घेतलेले दान ते अवदान, असा या ठिकाणी अर्थ दाखविला जात आहे. (यज्ञात हवन करताना पूर्णाहुतीवेळी अर्पण करावयाचे होमद्रव्य यासही अवदान म्हटले जाते. पण तो अर्थ साहजिकच येथे अभिप्रेत धरता येत नाही.) या क्षुद्र दैवतांच्या पूजकांची गती कोणती ? श्रीमद्‍भगवद्गीतेतील नवव्या अध्यायाच्या पंचविसाव्या श्लोकात हे स्पष्ट केले आहे की, क्षुद्र दैवतांच्या नादी लागणार्‍यांना भूतयोनीचीच प्राप्ती होत असते. मनुष्ययोनीत जन्म घेऊन अशा प्रकारे अपमार्गाने जात स्वतःचे पतन करून घेणे, हे केवळ निंद्य नव्हे, तर ज्या जगदीशाने ही सर्वोच्च योनी देऊन जीवाचा गौरव केला आहे, त्या जगदीशाचा हा एक प्रकारे अवमान ठरतो.
 तुकोबाराय पुढे या क्षुद्र दैवतांच्या किंवा त्यांच्या भगतांच्या वृत्तीविषयी सांगतात. ती सदैव स्वतःच अतृप्त व बुभुक्षित (बराडी) असतात. ही क्षुद्र दैवते काही काळ काही ठिकाणी अस्तित्व धरून राहिली असल्याचे दिसते, परंतु त्यांचे एकंदरित सामर्थ्य पाहू गेल्यास तीच परावलंबी असल्याने ती साधकांना काय देणार आणि त्यांचे काय भले करणार ? त्यांच्या ठिकाणी दिसणारे सामर्थ्य बेगडीच असते. स्वतःच्या अतृप्त इच्छा भागवून घेण्यासाठी ही दैवते किंवा त्यांचे उपासक अन्य जीवांना पीडा देत राहतात. यांच्या नादी लागल्याने (तयाची जोडी) पदरी जे पडणार आहे, ते अगदी स्पष्ट आहे (रोकडे) आणि ते कळेलही, पण विवश असलेल्या, अधिर झालेल्या अज्ञ जनांची बुद्धी तेवढा विचार करण्यासाठी तोकडी पडते. तुकोबारायांना अभंगाच्या धृपदाद्वारे असे सांगावयाचे आहे की, उपासनेचे सार अथवा तात्पर्य हे साधकाला समाधान प्राप्त करून देणारे असावयास हवे, परंतु येथे सारे उलटेच दिसून येते आणि ते कुणी लक्षात घेत नाही.
 आपल्या सांगण्याचा मतितार्थ स्पष्ट व्हावा, यासाठी तुकोबाराय दोन उदाहरणे देतात. केवळ अन्न-वस्त्राच्या प्राप्तीसाठी जिने दास्यत्व पत्करलेले आहे, जी संपूर्णतः आपल्या धन्यावरच अवलंबून आहे, त्या दासीने एखाद्याचा केलेला पाहुणचार हा प्रत्यक्षतः तिच्या धन्यानेच केलेला पाहुणचार असतो. कारण पाहुणचारासाठी त्या दासीने पुढे केलेले कोणतेही साधन तिचे नसतेच. तरीही ती ‘माझी झोपडी’, ‘ माझी मीठ-भाकर गोड मानून घ्या’ वगैरे लाघवी, लीनतेने बोलत असते. परंतु हे तर उघडच आहे की, ती स्वतः परावलंबी (रिती) , रिकाम्या हाताची (शक्तीहीन) असते. या क्षुद्र दैवतांचे किंवा त्यांच्या भगतांचे तसेच आहे. दुसरे उदाहरण तुकोबाराय देतात ते डबक्यातल्या पाण्याचे. तहानलेले एखादे जनावर आशेने पाणी पिण्यासाठी त्या डबक्यापाशी जाते खरे, पण त्या उथळ डबक्यातल्या पाण्याने त्या जनावराचे ओठही भिजत नाहीत, मग तहान भागणे दूरच. या चरणाच्या उत्तर भागात तुकोबाराय आत्मक्लेष सहन करीत क्लिष्ट विधीद्वारे केलेल्या अर्थहीन मंत्राच्या जपतपाचा (पुरश्चरणाचा) परिणाम सांगतात की, या कर्माच्या अगोदर जीव शिणलेला असतोच; त्यातून सुटका व्हावी म्हणून केलेले पुरश्चरणानंतर होणारी फलप्राप्तीही चित्ताला अस्वस्थता देणारी असते. त्यातून खरे समाधान मिळत नसते. चित्त समाधान पावणे, हेच कोणत्याही साधनेचे खरे फल असते, हे तत्त्व तुकोबारायांना येथे अधोरेखित करावयाचे आहे.
 अतृप्त, ओंगळ क्षुद्र दैवतांच्या नादी लावणारे जे भगत असतात, त्यांची तुकोबाराय शेवटी ‘भांड’ म्हणून संभावना करतात. भांड ही एक क्षुद्र जात असून उदरभरणार्थ नकला करीत, अभद्र, अचकट-विचकट, प्रसंगी निर्लज्जपणे अश्लील बोलत, लोकांचे रंजन करणारे हे बहुरूपी लोक गावोगाव फिरत असतात. अंगावर राख, रंग फासून आपले खरे रूप त्यांनी बुजविलेले असते. अंगावर वेगवेगळ्या ढंगांचे घोळदार कपडे त्यांनी घातलेले असतात. त्यांनी जणू खोळ पांघरलेली असते. त्या खोळीचा भार ते सहन करीत असतात. पोत्राजासारखे उपासक आपल्या अंगावर आसूडाचे फटके मारून घेत, अंगावर तीक्ष्ण सुया खुपसून घेत देवीच्या नावाखाली भीक मागत राहातात. किंवा, देवीचे भुत्ये अंगभर तेलकट, ओंगळवाणे पायघोळ झगे घालून हाती पलिता घेऊन दारोदार भटकत असतात. असल्या ‘भांडां’ना लोक अंधविश्वासाने दैवत समजून शरण जातात ! याच नाण्याची दुसरी बाजू अशी की, जी दैवते साधकांना असल्या मार्गाने जावयास लावतात, त्यांना देव म्हणायचे कसे ? 
 तुकोबाराय शेवटच्या चरणात पथभ्रष्ट अल्पबुद्धी जनांना दिलासा देतात. त्यांच्याविषयीचा आपल्या मनातील कळवळा ते व्यक्त करतात. त्यांना खात्रीपूर्वक सांगतात की, ‘नारायण हा असा कोता, नाटकी, अतृप्त नाही. तो एकदेशीय नसून संपूर्ण जगत् त्याने व्यापलेले आहे. तो सर्वसामर्थ्यवान् असून सकलांची चिंता वाहणारा, सकळांचे हित जपणारा आहे (जनार्दन).’ साधकांना स्वकल्याण साधण्यासाठीचा खात्रीलायक मार्ग दाखविताना आणि त्या मार्गाने गेल्यावर होणार्‍या आश्चर्यजनक परिणामाविषयी तुकोबाराय स्वानुभवाने सांगतात, ‘या नारायणाची उपासना करण्यासाठी कुठल्याही साहित्याची अथवा विविक्षित साधनाची आवश्यकता नाही. त्याचे चिंतन तुम्ही करा. तो तुम्हाला पावन करून घेईल. एवढेच नव्हे, तुम्हाला झालेली अलौकिक प्राप्ती पाहून इतरेजन तुम्हाला वंदन करतील (चरण वंदू येतील).’
(क्रमशः) 

संपर्क : (डॉ. रामपूरकर : ०९८२०३७६१७५)