नाटाचे अभंग... भाग १३

१२. विषयओढीं भुलले जीव । आतां यांची कोण करील कींव ।
 नुपजे नारायणीं भाव । पावोनि ठाव नरदेह ॥१॥
 कोण सुख धरिलें संसारीं । पडोनि काळाचे आहारीं ।
 माप या लागलें शरीरीं । झालियावरी सळे ओढती ॥धृ॥
 बापुडीं होतील शेवटीं । आयुष्यासवें झालिया तुटी ।
 भोगिलें मागें पुढें ही कोटी । होईल भेटी जन्मासी ॥३॥
 जुंतिलें घाणां बांधोनि डोळे । मागे जोडी आर तेणेंही पोळे ।
 चालिलों किती तें न कळे । दुःखें आरंबळे भूक तहान ॥४॥
 एवढें जयाचें निमित्त । प्रारब्ध क्रियमाण संचित ।
 तें हें देह मानूनि अनित्य । न करिती कां नित्य नामस्मरण ॥५॥
 तुका म्हणे न वेंचतां मोल । तो हा यासी महाग विठ्ठल ।
 वेंचितां फुकाचें बोल । केवढें खोल अभागियां ॥६॥
 
     या नाटाच्या अभंगात तुकोबाराय, त्यांनी स्वतः जो अनुभव घेतला त्याचा दाखला अप्रत्यक्षतः देऊन, सहृदयतेने संसाराबद्दल माणसाच्या मनात असलेले गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न करतात. संसारात पडल्यानंतर विषयसंपर्क होणे यात वावगे काहीच नाही. संसाराचा तो अविभाज्य भाग असतो. तुकोबारायांनी स्वतःच्या पूर्वायुष्यात अतिशय जोमाने प्रयत्नपूर्वक प्रपंच भरभराटीचा करण्याचा प्रयत्न केला होता. परंतु प्रारब्धवशात् अथवा ईश्वरेच्छा म्हणा किंवा नियती म्हणा, तुकोबारायांना त्यांच्या त्या प्रयासात अपयश भोगावे लागले. भूक-भूक करीत पत्नी निवर्तली, मूल गेले, समाजात पत गेली, कमालीचा अपमान सहन करावा लागला. या सार्‍या परिस्थितीचे त्यांनी एकांतात जाऊन चिंतन केले, मनन केले, तेव्हा त्यांच्या लक्षात आले की, हे जे काही घडले ते प्रपंचाचे स्वाभाविक असेच रूप आहे. भगवंत स्वतः ‘अनित्यम् असुखम् लोकम्’ (गीता ९.३३) असेच सांगत आहेत आणि ‘तरीही केवळ माझ्या ठिकाणी मन लावले असता कुणालाही स्वतःचे परमकल्याण साधून घेता येते’ असे आश्वासनही देतात. असा प्रश्न स्वाभाविकपणेच पुढे येतो की, सुखाचे आगर असलेल्या त्या कर्त्या-करवित्याने दुःखरूप संसाराची निर्मिती केली ती कशाकरिता? खरे तर जीवासाठी हा एकप्रकारे जीवघेणा खेळ आहे. दीर्घ विचारांती तुकोबारायांच्या हे लक्षात आले की, देवकार्याची अशी निंदा करून चालणार नाही. ज्याला आपण जीवघेणा खेळ म्हणतो, त्यामागे अकारण करुणामय असणार्‍या भगवंताचा निश्चितपणे सद्‍हेतु असला पाहिजे. जीव अनंत प्रकारच्या योनीतील सुख-दुःखांचे भोग भोगून जेव्हा नरदेहात आला, तेव्हा तरी त्याला भगवंताच्या करुणेचा प्रत्यय यावयास हवा, कारण या नरदेहातील जीवाला विवेक आणि कर्मस्वातंत्र्य दिले गेलेले आहे. जीवाच्या लक्षात यावयास हवे की, हा नरदेह आत्यंतिक सुख प्राप्त करून घेण्यासाठीच दिलेला आहे. देहात प्राण आहे, तो पर्यंतच हे कार्य साधता येणारे आहे. हा विवेकपूर्ण विचार तुकोबारायांच्या मनात स्फुरला तेव्हा त्यांना अतिशय आनंद झाला. त्यानुसार त्यांनी त्यांची पुढील जीवनचर्या आचरण्याचा निश्चय केला. त्यांना शाश्वत सुखाची अनुभूती आली. अशा वेळी आत्यंतिक महत्त्वाचे हे गुह्य सर्वच संसारी जनांना निवेदन करून त्यांना परमार्थाभिमुख करण्याची प्रेरणा त्यांना झाली आणि त्यांनी आपले मनोगत सविस्तर सकारण, काही उपरोधिक प्रभावी प्रश्न उभे करून अभंगाद्वारे प्रकट करण्याचे ठरविले. समाजातील सारेच जीवमात्र एकाच देवाची लेकरे आहेत, हे लक्षात घेऊन त्यांची होणारी दिशाभूल चुकविण्यासाठी त्यांनी त्यांची पथभ्रष्टता उघडपणे निवेदन केली. एवढेच नव्हे, तर त्यावर सावधगिरीचा, हमखास खात्रीचा असा जो एकमात्र उपाय, तो देखील प्रकट करून सांगितला, ज्यामुळे जीवाला परमसुखाची प्राप्ती होणे शक्य आहे.
    जीव हा शब्द अज्ञानवाचक आहे. तिथे विवेकशक्ती निर्बल झालेली आहे. जि+इव यातील जि म्हणजे जगणे आणि इव म्हणजे केवळ. स्वाभाविकतः जीवाला जगण्याची आवड आत्यंतिक आहे. याचीच दुसरी बाजू म्हणजे मृत्यु नको असणे. जीवाला संसारी म्हणतात, त्यामागे हा भाव आहे. सुख हवेसे वाटणे हा जीवाचा स्थायी भाव आहे. सुखाच्या तहानेने हा जीव विषयाकडे ओढला जात असतो. ओढ ही दोन प्रकारची असते. चुंबकाच्या ठिकाणी अंगभूत असणारी ओढ लोखंडी खिळ्याला सोडत नाही, हा एक प्रकार. दुसरा प्रकार म्हणजे, लोखंडी खिळा चुंबकाच्या प्रभावात आल्यानंतर झटकन् तो चुंबकाला जाऊन चिकटतो. लोखंडाला आपल्याकडे खेचणे ही चुंबकाची ओढ आहे, तर, चुंबकाच्या प्रभावाला शरण जाणे, ही खिळ्याची ओढ आहे. ओढीचे हे दोन्ही प्रकार स्वाभाविक असतात. देहासाठी विषय हे चुंबकाप्रमाणे आहेत आणि विषयांसाठी देह हा लोहाप्रमाणे आहे. देहाला स्वतःचे कर्तृत्व शून्य आहे. देहात प्राण जेव्हा प्रवेश करतो, तेव्हा जीव साकारतो आणि त्याला कर्तृत्व लाभते. चुंबक आणि खिळा या दोघांनाही तिसर्‍याने (मानवी बलाने) एकत्र आणता येते किंवा अलग करता येते. हेच तत्व आध्यात्मासाठी लागू होते. विषयाला त्याची स्वतःची गती नाही. सुखाच्या शोधात भरकटणारा जीव विषयाच्या संपर्कात येण्यासाठी त्याच्याकडे आकर्षित होतो आणि विषयाशी स्वतःला चिकटवून घेतो. इथे जीवाची विवेकहीनता लक्षात घ्यावयाची आहे. यालाच जीवाचे भुलणे म्हटले आहे. विषयाशी स्वतःला चिकटवून घेतले किंवा जीव विषयाशी एकरूप झाला की, जीवाचे भान हरपते. त्याला खर्‍या कर्तृत्वाचा विसर पडतो. स्वहिताविषयी जे जागृत नाहीत, तेच या विषयाच्या ओढीला बळी पडत असतात. अशा जीवाला विषयाच्या कचाट्यातून सोडविण्यासाठी विवेकशील अशा कुणाची तरी आवश्यकता असते. तुकोबाराय प्रश्न विचारतात की, नरदेहाची प्राप्ती झाली असतानाही नारायणाविषयी मनात भाव न ठेवता, विषयाशी एकरूप होऊन त्या नशेत गुंग झालेल्या लंपट (विवेकहीन) जीवाला सोडविण्यासाठी आता कोण दया दाखवेल? कोणताही देहसंबंधी, तो कितीही जवळचा असला तरी, भुललेल्या जीवाची सुटका करण्यास असमर्थ ठरतो; केवळ संतच त्याची सोडवणूक करू शकतात, असे तुकोबारायांना येथे सुचवायचे आहे.
    विषयाच्या नादी लागलेल्या अज्ञ माणसाला गर्तेतून बाहेर काढण्याचा प्रयास करताना पुढे तुकोबाराय वास्तवता मांडतात. ‘कोण सुख धरिलें संसारीं’ असा प्रश्न विचारून ते जीवाला थोडा विचार करण्यास प्रवृत्त करतात की, निरनिराळ्या विषयाचे सुख चाखण्याचा त्याने जो खटाटोप केला, त्यातले कुठले सुख त्याला शाश्वत रूपाने धरून ठेवता आले? संसारात रमून, जे त्याच्या हाती आले, त्यासाठी त्याने केवळ देहाचा विचार करून मिळविण्याचा प्रयत्न केला होता. परंतु, मुळात हा देहच शाश्वत नाही. तो क्षणभंगुर आणि नाशवंत आहे. तो काळाचे खाद्य असल्याने काळाची त्यावर अधिसत्ता असते. जन्मापासून काळाला तो बांधला गेला आहे. त्याचे ‘माप’ या देहाला लागलेले आहे. काळाने जितके नेमून दिलेत, तेवढेच श्वास जीवाला घेता येणार असल्याने त्याची आयुष्यमर्यादा काळाने आपल्या हाती ठेवलेली आहे आणि ती मर्यादा जीवाला अज्ञात असते. ती एकदा संपली की, जीवाच्या इच्छेचा विचार न करता, यमदूत जबरदस्तीने (सळे) प्राणाला देहावेगळा करणार असतात आणि मग जीवाचे अस्तित्वच संपुष्टात येत असते. त्यामुळे देहाच्या सुखासाठी आटापिटा करणे, हे शहाणपणाचे लक्षण ठरत नाही. या अभंगाचे हे धृपद आहे आणि तोच तुकोबारायांच्या सांगण्याचा गाभा आहे.
    तुकोबाराय पुढे समजावितात की, आयुष्याच्या अखेरीस माणसाची स्थिती केविलवाणी (बापुडी) झालेली असते. गात्रे थकलेली असतात. मनाची धाव कितीही बलवान असली, तरी देह त्याला साथ देण्यास असमर्थ असतो. आयुष्याचा शेवट लक्षात आलेला असतो. त्यावेळी त्याच्या मनातली काही इच्छित कार्ये पूर्ण करणे अशक्य असते. तो लाचार, दीनवाणा होतो. परंतु या सर्व गोष्टींचा परिणाम काळाच्या कार्यात विघ्न आणू शकत नाही. ‘बापुडी’ चा एक अर्थ वंशपरंपरा (बापुडवाणी) असाही घेता येतो. शरीरत्याग करताना मनातल्या अपुर्‍या इच्छा जीवाला पुन्हा जन्म घेण्यास विवश करणार्‍या असतात (होईल भेटी जन्मासी). मागील जन्मांची तसेच पुढील विविध योनीतील (कोटी) जन्मांची ही परंपरा किंवा साखळी जीवाला बद्ध करुन ठेवत असते. ही साखळी अतूट असण्याचे, पुन्हा पुन्हा जन्म घ्यावा लागण्याचे एकमेव कारण, जीवाची अपूर्ण वासना हेच असते.
    जीवाच्या जन्म-मरणाचे अंतरहित फेरे हे कशाप्रकारचे असतात, याचे समर्पक उदाहरण तुकोबाराय देतात. तेलाच्या घाणीला जुंपलेल्या बैलाची स्थिती सर्वांना परिचयाची आहे. आवळलेल्या चरकाच्या चाकांमुळे घाणी ओढताना वशिंडाची जागा हुळ्हुळी झालेली... गोल गोल फिरताना चक्कर येऊ नये म्हणून डोळ्यांना बांधलेल्या झापडांमुळे आपण किती चाललो हे समजत नाही. भुकेने-तहानेने जीव कासावीस झालेला... चालून चालून दमछाक झाली अन् पाय मंदावले तर मागून पराणीची टोचणी... केविलवाणे हंबरणे याव्यतिरिक्त त्या बैलाला काहीही करता येत नाही. त्याची दया येणारा मालक तरी असतो. परंतु जन्म-मृत्यूच्या चक्रात अडकलेल्या जीवाची स्थिती, त्याला कोणीच वाली नसल्याने, पराकोटीची दयनीय होत असेल, यात संशयाला जागा नाही. किती जन्म झाले, किती घ्यायचे आहेत, काहीच त्या जीवाला माहित नाही. तर्‍हेतर्‍हेच्या वासना आणि त्यापोटी अनेक विषयांचा संग अखंड केल्याने डोळे ज्ञानाच्या प्रकाशाला पारखे झालेले, सुख हवे तर पदोपदी दुःखाचेच चटके सहन करणे वाट्यास आलेले. परतंत्र, अगतिक होऊन प्रत्येक योनीत जीवन कंठणे, ही भयानक स्थिती तुकोबाराय या उदाहरणातून जीवाच्या समोर उलगडून दाखवितात.
    संसाराचे विदारक चित्र सुस्पष्ट करून तुकोबाराय त्यामागचे कारण शास्त्राला धरून त्रस्त जीवापुढे मांडतात. सुख-दुःखांकित प्राप्त होणारे भोग हे आपल्या पूर्वकर्मानुरूप प्राप्त होत असतात. जीवाच्या पूर्वकर्माचे परिणाम जे भोगण्याकरिता समोर आलेले असतात, ते प्रारब्ध, पुढे जे परिणाम भोगायचे आहेत ते क्रियमाण आणि भोगण्यासाठी साठत जाणारे परिणाम ते संचित. या तिन्हींच्या निमित्ताने कर्मभोग, ते सुखाचे असोत् वा दुःखाचे, जीवाला प्राप्त होणारे असतातच. त्यासाठी वेगळा आटापिटा कशासाठी करावयाचा? दुसरी गोष्ट म्हणजे जीव ज्याच्यासाठी आटापिटा करीत असतो, ते सर्व प्रकारचे भोग केवळ देहाशी संबंधित आहेत. त्या भोगांची मर्यादा ओलांडून देह पुढे जाऊच शकत नाही. जीवाला जे दुःख टाळावेसे वाटते आणि सुख मिळवावेसे वाटते, तेसुद्धा देहापुरतेच मर्यादित आहे. याठिकाणी तुकोबाराय जीवाला त्याची विवेकबुद्धी जागवून सांगतात की, आपण ज्याचे चोचले पुरविण्याची धडपड करीत असतो, त्या देहाची अनित्यता, त्याचे क्षणभंगुरत्व, त्याची अशाश्वतता या गोष्टींचा विचार करावयास हवा. या दयनीय अवस्थेतून सुखरूप बाहेर पडायचे असेल तर जो नित्य आहे, तो भगवंतच सहाय्याला धावणारा आहे. अशा या परमेश्वराचे नामस्मरण नित्य का करीत नाहीस्? तुझ्या प्रारब्ध-क्रियमाण-संचिताचे बंध तोच एक तोडू शकतो.
    खेदाची गोष्ट अशी की, स्वहिताविषयी उदासीन असलेला अज्ञ माणूस कितीही हिताचे सांगितले, तरी तिकडे दुर्लक्ष करीत राहतो. नरदेह भाग्यवशात् प्राप्त झालेला असूनही त्याचे महत्व जीव जाणत नाही. त्याचा सदुपयोग कसा करता येईल, याचा विवेकाने विचार करीत नाही. विषयप्रवाहात केवळ प्रवाहपतित होऊन आयुष्य वाया घालवणे, तुकोबारायांना उद्वेग आणणारे आहे. अविरत काबाडकष्ट करून मिळविलेले धन अशाश्वत सुखासाठी खर्च करण्याची सामान्य जनांची तयारी असते. पण जो खरा सुखदायी आहे, तारक आहे, त्याचे नाव घेण्यासाठी एक दमडीही द्यावी लागत नाही. किंवा, ते नाव मुखाने बोलायलाही काही किंमत द्यावी लागत नाही. सारा फुकटचा मामला असूनही डोळ्यांवर झापड बांधलेल्या अभागी संसारी जीवास तेच नाम घेणे संकटाचे वाटते. भगवंताचा महिमा जाणावा आणि सार्‍यांनीच मिळालेल्या नरदेहाची धन्यता साधून घ्यावी, असे तुकोबारायांचे कळकळीचे सांगणे आहे.
(क्रमशः) 

संपर्क : (डॉ. रामपूरकर : ०९८२०३७६१७५)