थोडे वेगळे

प्रा. माधुरी शानभाग ह्यांच्या हल्लीच वाचण्यात आलेल्या 'इंदूची गोष्ट' ह्या लेखातील मला आवडलेला काही भाग. वाचकांनाही तो आवडेल अशी आशा.
-----------------------------------------------------

.... शरीरकष्ट कमी झाले, वेळेची आणि ऊर्जेची बचत झाली अन् बांधून टाकणाऱ्या मातृत्वाच्या चक्रातून तिची सुटका झाली. एक वा दोनच मुले जन्माला घालून, त्यांना नीट लक्षपूर्वक वाढवून इंदू आपला उरलेला सर्व वेळ अन् ऊर्जा आपल्या विकासासाठी वापरू शकली.

ती शिक्षिका बनली, डॉक्टर झाली, इंजिनियर झाली. मोकळ्या हाताने रस्त्याने चालताना दचकणारी इंदू हळूच सायकलवर बिचकत बसली. मग सफाईने गाडी चालवू लागली. तिने विमान उडवले, रेल्वे इंजिन हाकले, ती अवकाशात गेली, तिने समर्थपणे राज्यशकट चालवला, मोठमोठे उद्योग उभे करून चालवले, संस्था उभ्या केल्या, प्रयोगशाळेत संशोधन करून नवे शोधले, आयुष्याला भिडणे म्हणजे काय ते तिला समजू लागले.

इंदू आयुष्याला खऱ्या अर्थाने सामोरी गेली, चवीने जगू लागली... आलेल्या समस्यांना समर्थपणे तोंड देऊ लागली. तिने आकाश कवेत घेतले.

आपण साऱ्या इंदूच्या वंशज आहोत, आपण या देवदूताला कधीही विसरायचे नाही. त्याचे नाव आहे विज्ञान...!

तेव्हा भगिनींनो, जसे फुले, आगरकर, आंबेडकर, धोंडो केशव कर्वे यांची नावे घेता तशीच आयझॅक न्यूटन, मायकेल फॅरॅडे, लॉर्ड पेपिन, थॉमस अल्वा एडिसन, मार्गारेट सॅंगर  अन फ्रॅंक कोल्टन यांच्यासारख्या विज्ञान व तंत्रज्ञानाला वाहून घेतलेल्या शेकडो स्त्री-पुरुषांशीही कृतज्ञ राहा. रोज सकाळी उठल्यावर "कराग्रे वसते.." म्हणताना विज्ञान नावाच्या देवदूताचीही आठवण करा, त्यालाही वंदन करा, त्याने तुमच्यासाठी खरे स्वातंत्र्य आणले आहे, तुम्हाला अनेक कष्टमय कामातून मुक्त केले आहे. तुमच्या गुलामगिरीच्या शृंखला तोडून टाकण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. तोंडातून एक अक्षरही न उच्चारता या देवदूताने आजच्या दिवसाचे प्रयोजन जाणले आहे. समस्त स्त्री जातीकडून त्याला त्रिवार वंदन.    
---------------------------------------