इंजिनिअरिंगच्या बैलाला --- !

         बारावीच्या निकालानंतर इंजिनियरिंगच्या प्रवेशाचे महापर्व सुरू होईल.महापर्व म्हणण्याचे कारण त्यातील कायदेकानू सारखे बदलून त्यानंतर कोर्ट्बाजी वगैरेमध्ये जवळ जवळ एक सत्र पूर्ण निघून गेल्यावर प्रवेश पर्व पुरे झाले असे साधारणपणे समजण्यात येते.अर्थात मेडिकलचीही गोष्ट फारशी वेगळी असते अशातला भाग नाही पण इंजिनियरिंगमधील अनेक शाखा उपशाखांमुळे त्यातील गोंधळ अनेक पटीने वाढीव असतो.या गोंधळाशी सामना देणे शक्य व्हावे यासाठी विद्यार्थ्यांचे व त्यांच्या पालकांचे प्रशिक्षण शिबीरच घ्यावे लागते.आमच्या वेळी मात्र विद्यार्थी व पालक अगदीच कमी जागृत होते असे म्हणावे लागेल. किंवा त्यांच्यात जागृती निर्माण करावी अशी फारशी कुणाची इच्छा नव्हती.माझ्यानंतर इंजिनिअर झालेले  माझे एक मित्र तर सांगतात की त्यांना इंजिनिअरिंगला प्रवेश मिळाला हे त्यांच्या अशिक्षित वडिलांना कळल्यावर ते खेड्यातल्या वाण्याकड जाऊन सांगायला लागले,"आमचा लेक इंजिनिअरिंगला जायचेय म्हणतोय आणि त्याला प्रवेश पण मिळालाय  म्हणे,मंग आता कसं?’ सुदैवाने वाणी शहाणा होता तो म्हनाला,"अहो बाबा ,मंग तर बेसच झालां की,जाऊद्या त्याला खुषाल त्या कालेजला"
        माझ्या प्रवेशाच्यावेळी अभियांत्रिकी महाविद्यालयात मला प्रवेश घ्यायचा होता म्हणजे तेथे काय करावे लागणार होते किंवा त्याच्यापूर्वी काय करावे लागते याची ना मला काही कल्पना होती ना दादांना म्हणजे ,माझ्या वडिलांना. त्यामुळे अर्ज भरताना कोणत्या कॉलेजात व कोणत्या शाखेस  प्रवेश घ्यायचा याचिषयी आमच्या डोक्यात कसलीच कल्पना नव्हती.त्यावेळी पुण्यास एक अभियांत्रिकी महाविद्यालय होते ते म्हणजे एम.विश्वेश्वरय्या यांनी पावन केलेले,त्याचबरोबर त्याच वर्षी शासनाने तीन नवी अभियांत्रिकी महाविद्यालये कराड ,औरंगाबाद व अमरावती याठिकाणी काढली व त्यांचे प्रवेशही होणार होते म्हणजे कोणत्या कॉलेजात प्रवेश घ्यायचा याचाही पसंतीचा क्रम देणे आवश्यक होते तसेच त्याचवेळी सिव्हिल.मेकॅनिकल,इलेक्ट्रिकल,मेटॅलर्जी व टेलिकम्युनिकेशन या पाचपैकी कोणत्या शाखेस अग्रक्रम द्यायचा हे पण ठरवायचे होते. त्यावेळी माझ्या हितेच्छु व्यक्तींनी मला दिलेल्या सल्ल्यावरून लहानपणी वाचलेली "पाचामुखी परमेश्वर" ही कथा आठवते. कथा अशी आहे.
  एक म्हातारा आणि त्याचा नातू दुष्काळ पडल्यामुळे घरातला बैल विकायला निघाले.बैलास बरोबर घेऊन चालले असताना एक शहाणा त्यांना भेटला आणि विचारू लागला," काय हो कुठे चालला ?" "काही नाही हा बैल विकायला निघालोय "
"अस्स अस्स ,पण काय रे म्हाताऱ्या,त्या बिचाऱ्या पोराला का चालवतोस असल्या उन्हात ?"
" मग काय म्हणण हाय दादा, तुमचं?"
"अरे त्या बैलाच्या पाठीवर बसव की त्याला, तेवढेच पाय कमी दुखतील"
"असं म्हणताय का दादा, बर तसं करतो,चल रे खंड्या, बस बैलाच्या पाठीवर.चार शहाणे लोक सांगतील तसे करावे"आता म्हातारा चालत व  आणि बैलाच्या पाठीवर खंड्या असे पुढे निघाले. थोडे पुढे गेल्यावर आणखी एक शहाणे त्याना भेटले.
"रामराम दादा,कुठं चाललाय ?"
"काही नाही जरा बैल विकायला चाललोय,"
"आणि काय रे खंड्या,आपल्या म्हाताऱ्या आज्याला चालायला लावलेस आणि तू ऐटीत बैलावर बसतोस,काय आहे का काही चाड,उतर तू खाली आणि आज्याला बसू दे" त्या शहाण्याने आपली अक्कल पाजळली"
"बर दादा तसं करतो " म्हणून नातू बैलावरून खाली उतरला आणि म्हातारा बैलाच्या पाठीवर बसला आणि तसे ते पुढे चालले.तेवढ्यात आणखी एक शहाणे समोरून आले अर्थातच त्यांनी म्हाताऱ्याला आणि नातवाला पाहून कोठे जाताय असे विचारलेच आणि त्याला म्हाताऱ्यानेही तेच उत्तर दिले.अर्थात याही शहाण्याला सल्ला दिल्याशिवाय राहवले नाही,तो म्हणाला,
"अरे मग त्या नातवाला पण घे की बैलाच्या पाठीवर,त्याला कश्याला बिचाऱ्याला चालायला लावतोस?आणि त्याच असं किती मोठं ओझं होणार आहे बैलाला ?"
"खरं हाय दादा " म्हणून म्हाताऱ्यानं खंड्यालाही बैलाच्या पाठीवर घेतलं आणि ती वरात पुढे निघाली.तेवढ्यात आणखी एक शहाणे पुढून आले,हे बहुधा मनेका गांधींचे बारसे जेवलेले असावेत.झटक्यात तोंडातील तंबाकूची पिंक थुंकत म्हणाले,
"अरारारारा,काय चालवलेय काय तुम्ही दोघांनी?" 
"काही नाही दादा,या बैलाला विकायला चाललोय" म्हातारा बावचाळून म्हणाला,
"आणि अगदी विकेपर्यंत त्याला ताबडून घेताय का?अरे,थोडी तरी लाज लज्जा ,ते बिचार जनावर बघा तुमच्या ओझ्यानं मरायला लागलयं, जरा विकताना तरी माणुसकी दाखवा रे.इतके दिवस ते बिचारं तुझ्यासाठी राबराब राबलं आता निदान विकायच्या वेळी तरी माणुसकी दाखवा रे"
"म्हणजे काय करू दादा ?"म्हाताऱ्याने अजिजीने विचारले.
"अगोदर दोघंही जण खाली उतरा, म्हणजे मी सांगतो काय करायचे ते."
म्हातारा आणि नातू दोघेही खाली उतरले.मग शहाण्याने जवळच्याच झाडाची एक लांब फांदी तोडली आणि म्हाताऱ्याला म्हणाला,
"आता असं करा,म्हाताऱ्या, तुझ्या पटक्याच्या पुढच्या टोकात  या बैलाचे पुढचे दोन पाय आणि मागच्या भागात मागचे दोन पाय असे घट्ट बांधा त्यांच्या मध्ये ही काठी अशी घाला दोघेजण मिळून बैलाला या काठीच्या दोन टोकांना पकडून खांद्यावर घ्या आणि न्या त्याला बाजारात.निदान शेवटी तरी त्याला जरा सुखानं जाऊदे "
"खरं हाय दादा,आता तसंच करतो," म्हणून म्हातारा व नातू बैलाला खांद्यावर घेऊन चालू लागले.वाटेत एक पूल लागला त्यावरून जाताना खालचे पाणी पाहून बैलाचे डोळे फिरले आणि धडपड करून तो पाय हलवू लागला त्याबरोबर त्याचे पाय त्या पटक्यातून सुटून तो खाली नदीत पडला आणि वाहून गेला.आणि म्हातारा हळहळू लागला,"अरे अरे काय झाले हे . कशाला ऐकायला गेलो या सगळ्यांचं ?"
   थोडक्यात निर्णयशक्तीचा अभाव जसा त्याना नडला तशीच अवस्था माझ्या इंजिनियरींगच्या प्रवेशाच्या वेळी माझी होती. सुदैवाने शेवटी एका खऱ्या शहाण्याची गाठ पडल्याने माझा इंजिनिअरिंग प्रवेशाचा बैल मुळामुठेच्या पाण्यात ( हा संगम पूल  आमच्या पुण्याच्या कॉलेजपासून फक्त दोन किलोमीटर अंतरावर आहे.)पडला नाही हे माझे भाग्य !
     अर्ज दाखल करण्यापूर्वी आम्ही आमचे एके काळचे  घरमालक श्री. ---  यांच्या घरी त्यांची भेट घेण्यास गेलो तेव्हां त्यांचा बी.एस.सी.टेक झालेला किंवा होणारा मुलगा तेथे होता.लहानपणी त्याचे व माझे चांगले जमत असे.त्याने मला चांगले मार्क मिळाल्याबद्दल माझे कौतुक करून मी कोणत्या ब्रॅंचला प्रवेश घेणार असे विचारल्यावर मी माझे त्यातील अज्ञान प्रकट केले तेव्हां मोठ्या तज्ञाचा आव आणून त्याने मला उपदेश केला "अरे तू असं कर, टेलेकम्युनिकेशन्सलाच अग्रक्रम दे. अगदी नवी शाखा आहे आणि तुला त्यात भरपूर स्कोप आहे (म्हणजे काय हे मला माहीत नव्हतेच पण त्यालाही कितपत माहीत होते शंकाच आहे.)." त्यावर मीही नंदीबैलाप्रमाणे मान डोलावली. 
        नंतर त्याचे वडील आमच्याशी बोलताना दादांना म्हणाले,"मास्तर, तुम्ही  श्यामला सिविल इंजिनियर करा. असं बघा, जरा व्यवस्थित काम केले की पुढे मागे एक्झिक्यूटिव्ह इंजिनियर तरी निश्चितच होणार " यावर दादांनीही तत्परतेने मान हालवली.आम्हा दोघानाही आपण कशासाठी मान हलवत होतो याविषयी तितकेच ज्ञान होते जितके अब्राहाम लिंकनच्या गोष्टीतील गाढवाला हवामानाचे ! कदाचित ते गाढवच हवामानाचा जास्त अचूक अंदाज वर्तवत असेल. 
   आणखी एकाद्या शहाण्याची गाठ पडण्यापूर्वी आम्ही माझी बहीण त्यावेळी ससून हॉस्पिटलमध्ये परिचारिका होती तिची गाठ घ्यायला गेलो. मला इंजिनियरिंगचा अर्ज भरायचा म्हटल्यावर तिला एकदम आठवण झाली की सध्या तिचा एक पेशंटच त्या महाविद्यालयाचा विद्यार्थी होता,त्यालाच विचारावे असे तिचे मत पडले.तिच्याबरोबर आम्ही तिच्या वॉर्डमध्ये गेलो आणि त्याची गाठ घेतली.
    त्याने थोडे बोलणे झाल्यावर मला विचारले"तुम्ही कोणत्या ब्रॅंचला प्रेफरन्स दिला आहे?"मी त्याला म्हणालो,"मी अजून काहीच ठरवले नाही पण आम्ही ज्यांना भेटलो त्यापैकी एकाने टेलिकम्युनिकेशन तर दुसऱ्याने सिव्हिल इंजिनियरिंगला जा असे सांगितले आहे."
     त्यावर तो म्हणाला "छे, छे, अगदीच चुकीचा सल्ला दिलाय त्यानी तुम्हाला, सिव्हिल व टेलेकम्युनिकेशन सद्ध्या अगदी शेवटच्या अग्रताक्रमावर आहे तेव्हा पहिला अग्रक्रम मेकॅनिकलला द्या.त्याचे कारण मेकॅनिकलच्या शाखेच्या इंजिनिअरची मागणी कधीच फार घटत नाही.सध्या टेलिकॉम अगदी नवीन आहे त्यामुळे त्याला मागणी रहाणार की नाही हे अजून ठरायचे आहे.मला जरी इलेक्ट्रिकलला प्रवेश मिळाला आहे तरी पुढील वर्षी शक्य झाले तर बदलून मेकॅनिकलच घेण्याचा माझा विचार आहे. "  
         त्यावेळी पहिला अग्रक्रम मेटॅलर्जीला होता कारण ती शाखा फक्त पुणे महाविद्यालयातच होती व त्यासाठी फक्त १२ जागाच होत्या.त्यामुळे त्यात माझा नंबर लागणे शक्य नव्हते त्यानंतर सर्वात अधिक वाव असणारी यंत्र अभियांत्रिकि आहे .असे त्याने सांगितल्यावर आमचा सगळा संभ्रम संपून आम्ही त्याप्रमाणे पुणे अभियांत्रिकी महाविद्यालय व यंत्र अभियांत्रिकी असे अग्रक्रम देऊन अभियांत्रिकी प्रवेशासाठी आवश्यक कागदपत्र तयार करून मी ज्या कॉलेजात प्रिप्रोफेशनल (म्हणजे आताची बारावी) परीक्षा दिली त्या फर्ग्युसन महाविद्यालयाच्या कचेरीत  गेलो व अभियांत्रिकी प्रवेशासाठी विहित अर्जाचा नमुना घेऊन तो भरून या कागदपत्रांच्या सत्यप्रतीसह तो महाविद्यालयाच्या कार्यालयात देऊन आम्ही पुन्हा  गावाकडे परतलो. आणि हो त्यानंतर कुठलेही सव्यापसव्य न करता मला प्रवेश मिळाल्याचे एकदम  पत्रच आले