मी अध्यक्ष असतो तर अससं झालंच नसतं......‌शरद पवार

मी अध्यक्ष असतो तर असं झालंच नसतं.....शरद पवार

काय माणूस आहे हा श्रीनिवासन? बीसीसीआयचा अध्यक्ष झाला म्हणून त्याला अक्कल यायला नको होती. ज्या पदावर माझ्यासारखा मातब्बर माणूस बसून गेलेला आहे त्या पदाची शान पार धुळीस मिळवली यानं. लोक एवढे बडबडून राहिलेत, राजीनामा असा तोंडावर फेकून द्यायला हवा त्यानं. पदाला चिकटून रहायची काय गरज आहे? मी कसं हळूहळू सोडत चाललोय सगळं.........

आपण सार्वजनिक जीवनात वावरताना कसं सर्वार्थानं स्वच्छ असलं पाहिजे, अं, काय म्हणता कोणी राहूच शकत नाही......नाही नाही असं नाही राहता येतं. बरं राहता नाही आलं तर दिसू देवू नये. सगळं कसं झाकून ठेवावं. आता जावयाला चेन्नई सुपर किंग्जमधे ठेवायची काय गरज होती? वाट्टेल तेवढे बेरोजगार सापडतात. कोणालाही अध्यक्ष करून स्वत: नामानिराळं राहता आलं असतं. नाही का? माझा एवढा व्याप आहे. असंख्य संस्था, संघटना माझ्या नावानं चालतात, अनेक संस्था माझं नाव लावतात. सत्तरच्या दशकातला मी एक साधा कॉंग्रेस कार्यकर्ता, बघता बघता महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झालो, विरोधी पक्ष नेता झालो, केंद्रीय मंत्री झालो, बीसीसीआय, आयसीसी चा अध्यक्ष झालो. थोडक्यात काय गेली पाच दशकं सार्वजनिक जीवनात वावरतो आहे पण एका रुपयाचाही कधी भ्रष्टाचार मी केला नाही आणि कोणाला करू दिला नाही. हं, माझ्यावर आरोप खूप झाले पण मी कधी कोणाला उत्तरं देत बसलो नाही. मी आपलं काम करत राहिलो.

माझ्याविरुद्धचे ट्रकभर पुरावे घेवून गो.रा. खैरनार नावाचे एक मुंबई महानगरपालिकेचे उपायुक्त कुठे गेले माहित नाही. त्यांचा ट्रकही कुठे दिसत नाही. हं ते अधून मधून दूरचित्रवाहिन्यांवर झळकतात पण ते काहीही बरळले तरी जनता त्यांच्यावर आता विश्वास ठेवत नाही. माझ्यावर मात्र जनतेचा प्रचंड विश्वास आहे. कारण......कारण मी "जाणता राजा" आहे. माझ्यासारखा "जाणता राजा" या महाराष्ट्रातच काय, उभ्या देशातच काय, अख्ख्या जगातही झाला नाही. चंद्रावर सुद्धा जावून आलेले सांगतात, माझ्यासारखा कोणी दिसला नाही म्हणून.

मी उभ्या आयुष्यात एका पैशाचाही भ्रष्टाचार केला नाही. अं...पुन:पुन्हा का सांगतोय? पब्लिक मेमरी इज शॉर्ट नं. मला हे वारंवार सांगावंच लागतं. उगीच लोक विसरले तर..........मला पुन्हा २०१४ ची निवडणूक लढवायचीय. एकदा पुन्हा पंतप्रधानपदासाठी फिल्डींग लावूनच बघतो. मॅडमनी मला शब्द दिला आहे. युपीएला बहुमत मिळालं नाही तर मॅडमनी आश्वासन दिलं आहे की तिसरी आघाडी मी तयार करावी आणि पंतप्रधान व्हावं, मॅडमचा पक्ष बाहेरून पाठिंबा देईल. अं....मॅडम कोण? मॅडमचा पक्ष कोणता? काय प्रश्न विचारताय? येडं की खुळं राव? मॅडम मुखर्जींना राष्ट्रपती करू शकतात तर मला पंतप्रधान का नाही करू शकत? अरे मॅडम कोण हे काय सारखं सारखं विचारताय? मॅडम म्हणजे सोनियाजी...........

सोनियाजींच्या रागावर मी कॉंग्रेस पक्ष सोडला पण धर्मनिरपेक्ष विचारांसाठी मी पुन्हा कॉंग्रेसलाच केंद्रात आणि राज्यात पाठिंबा देवून मोकळा झालो. याला म्हणतात राजकीय कौशल्य. श्रीनिवासनला हे समजणार नाही. जाऊ द्या. सोनियाजी म्हणाल्या तुम्ही तब्येत चांगली ठेवा, तुम्हारे चान्सेस ब्राईट है, असं हिंदीत म्हणाल्या. मला फार कौतुक वाटतं बाईंचं. आता मी ही ठरवलंय, त्यांच्या सिटा पाडायच्या नाहीत. त्यांचेही जास्तीत जास्त खासदार निवडून आणायचे आणि माझेही. कारण महाराष्ट्रात तरी मला मान आहे. मला योग्य वाटेल तोच माणूस निवडून येतो. ते जाऊ द्या, तर सोनियाजी काय म्हणाल्या ते सांगत होतो, म्हणाल्या पंतप्रधान तुम्हीच व्हा २०१४ मधे फक्त मंत्रिमंडळ त्या म्हणतील तसं बनवावं लागेल, मी म्हणालो ठीक आहे आम्हा मराठ्यांना सवयच आहे दिल्लीपुढे मान झुकवायची, त्यात काय मोठंसं? मला तर आजकाल असं वाटायला लागलंय की मी कॉंग्रेसबाहेर पडून चूकच केली म्हणजे अशी खात्री नाही पटली अजून पण वाटू लागलंय. बघा ना स्वच्छ चारित्र्याचा म्हणावा असा एकही मोठा नेता उरलेला नाही कॉंग्रेसमधे. प्रत्येकावर आरोप, आरोप आणि आरोप. या अशा प्रसंगी माझी बेदाग छवी कामी नसती आली? मनमोहनांनंतर माझाच विचार केला असता मॅडमनी. जाऊ द्या. मला आज खूप बोलावंसं वाटतंय. क्रिकेटवरून राजकारणाकडे कसं वळलो कळलं सुद्धा नाही. अगदी पुण्याहून मुंबईत कधी घुसलो ते कळतच नाही तसं.

मुद्दा हा होता की एवढ्या मोठ्या बीसीसीआय सारख्या संघटनेच्या अध्यक्षानं कसं निष्कलंक असावं, माझ्यासारखं आणि तसं लोकांना वाटायलाही पाहिजे. माझ्याचबाबत म्हणाल तर मी उभ्या आयुष्यात एकाही पैशाचा भ्रष्टाचार केला नाही आणि कोणाला करू दिला नाही. माझे सर्व आमदार, खासदार, मंत्री, राज्यमंत्री, जिल्हा परिषद अध्यक्ष, इतर स्थानिक स्वराज्य संस्थांचे पदाधिकारी आणि माझ्या अखिल भारतीय (?) पक्षाचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते हे माझ्याच पावलावर पाऊल टाकून आपली स्वच्छ प्रतिमा जपत आहेत. काय म्हणालात, अखिल भारतीय नंतर प्रश्नार्थक चिन्ह का टाकलं? अहो मलाच प्रश्न पडलाय की आपण अखिल भारतीय पक्ष स्थापन केला लोकसभेच्या खासदारांची संख्या कधीही दोन आकडी झाली नाही आणि आमदारही ६०-७० च्या वर जात नाहीत. मला राष्ट्रीय पातळीवर मान्यता का मिळत नाही कोण जाणे? जाऊ द्या. पण एक सांगतो. पंतप्रधान होण्यासाठी राष्ट्रीय पातळीवर मान्यता असण्याची काही गरज नसते. देवेगौडा, गुजराल, चंद्रशेखर, मनमोहनसिंग, व्ही.पी.सिंग कोणाला तरी मान्यता होती का राष्ट्रीय पातळीवर? मी जमवतोच बघा जांगडबुत्ता यावेळी. म्हणून तर श्रीनिवासन प्रकरणात मी माझं प्रांजळ मत देवून टाकलं. जेणेकरून लोकांना आणि मिडीयालाही मी स्वच्छ असल्याची दखल उशीरा का होईना घ्यावीच लागेल. मी श्रीनिवासनला म्हणालो, "दाग आच्छे नही है!!!!". मी पक्ष, संघटना, संस्था, सरकार अशा पद्धतीनं चालवतो की कुणाला भ्रष्टाचार करायला संधीच मिळणार नाही. अजित, आबा, छ्गन, गणेश, पद्मसिंह, सुनील, अनिल, जयंत, कुणाकुणाचं नाव घेवू सगळे कसे धुतल्या तांदळासारखे स्वच्छ...........सार्वजनिक जीवनात असं स्वच्छ रहावं माणसानं. पुन्हा सांगतो मी उभ्या आयुष्यात एकाही पैशाचा भ्रष्टाचार केला नाही आणि कोणाला करू दिला नाही. खरंच सांगतो, पांडुरंगाची शप्पथ, मी अध्यक्ष असतो तर असं होवूच दिलं नसतं....काय म्हणता? असं म्हणजे....समजलं नाही का? मी अध्यक्ष असतो तर असं होवूच दिलं नसतं........श्रीशांत, अंकित, अजित, मयप्पन, विंदू आणि बाकीचे २२, २५, २७ किती आकडा नक्की माहित नाही, एकालाही पोलिसांना पकडू दिलं नसतं. समजलात. श्रीनिवासनला हे जमलं नाही. माझी कला मलाच ठावं........................

अ‍ॅड. अतुल सोनक
३४९, शंकर नगर, नागपूर-१०
९८६०१११३००