उखाणापूर्ती (१)

नमस्कार मंडळी,


छंदवृत्तांप्रमाणेच उखाणे हे आपल्या भाषेचे एक सुंदर लेणे आहे. या समस्यापूर्तीत ही दोन 'लेणी' एकत्र आणायचा प्रयत्न केला आहे.


काळ कितीही पुढे गेलेला असला तरी, आजकाल एरवी अगं-अरे करत असले तरी, नवरा-नवरीने उखाण्यांमधून नाव घेताना बघण्याची मजा काही औरच असते.


फक्त लग्नच नाही तर इतरही अनेक कार्यक्रमात उखाणे घ्यावे लागतात. आणि लग्नात सुद्धा उखाणे हे लग्नमंडपात फक्त नवरा-नवरी नाही तर सर्वच जवळच्या नातेवाईकांना घ्यावे लागतात.


आज आपण फक्त नवऱ्याने नवरीसाठी घ्यायचा उखाणा समस्यापूर्तीसाठी घेऊ.

उखाण्यांचे सुद्धा अनेक प्रकार आहेत. पण या समस्यापूर्तीत नावाचा आणि घासाचा असे दोन प्रकार तयार करायचा प्रयत्न करूयात.


आता नवऱ्याने नवरीसाठी उखाणा घ्यायचा म्हणजे नाव माहित हवे! आता आमच्या मनात पहिले आमच्या "ही"चेच नाव आले, इतर पण नावे आठवली पण मग असा विचार केला की एखादे खूप वेगळेच नाव घेऊयात ...समस्यापूर्तीसाठी!

ही उखाणापूर्ती करता करता इतर प्रकारचे उखाणे सुचले तर ते लिहून ठेवा. कारण अजून अनेक 'उखाणापूर्त्या' येणार आहेत बरं का!


या उखाणापूर्तीच्या अटी-
१. नवऱ्याने नवरीसाठी घ्यायचा नावाचा आणि/अथवा घासाचा उखाणा बनवा.
२. वृत्तछंद - तुम्हाला हवे ते. (काय वापरले आहे ते सांगा.)
३. नवरीचे नाव "मराली" (हंसीण) आहे असे समजा. मराली चे गण ल-गा-गा (य-मा-ता) असे पडतात.


बघूया मराली चे अहो काय काय रचतात ते!