नाटाचे अभंग... भाग १५

१४. न बोलसी तेंही कळलें देवा । लाजसी आपुलिया नांवा ।
 मी घालीत नाहीं गोवा । भीड केशवा कासयाची ॥१॥
 उतरीं आपुला हा भार । मजशीं बोलोनि उत्तर ।
 माझा तुज नव्हे अंगिकार । मग विचार करीन मी ॥धृ॥
 दात्या आणि मागत्यासी । धर्मनीति तरी बोलिली ऐसी ।
 यथानुशक्ति ठाकेल तैसी । बाधी दोघांसी विन्मुखता ॥३॥
 म्हणोनि करितों मी आस । तुझिया वचनासी वास ।
 धीर हा करूनि सायास । न टळें नेमास आपुलिया ॥४॥
 तुझें म्यां घेतल्यावांचून । येथूनि न वजें वचन ।
 हाचि माझा नेम सत्य जाण । आहे नाहीं म्हण तुका म्हणे ॥५॥

 या अभंगात तुकोबारायांनी देवाशी केलेले संभाषण वाचावयास मिळते. संसार पाठीमागे लागल्यानंतर आलेल्या प्रापंचिक संकटांनी त्रस्त झालेले तुकोबाराय ‘केवळ देवच आपला पाठीराखा’ या निष्कर्षाप्रत आले. विठ्ठलभक्तीचा वंशपरंपरेने मिळालेला वारसा आणि ज्ञानेश्वरी, एकनाथी भागवत आदी संत वाङ्मयाच्या प्रभावाने विठ्ठल या देवतेबद्दल मनात निर्माण झालेली श्रद्धा यातून तुकोबारायांच्या चित्तात विठ्ठलाशी अनन्यता दृढ झाली. त्यांनी निष्ठेने एकांतात साधना सुरू केली. ‘शेंडी तुटो वा पारंबी तुटो’ या भावनेने साधना करीत त्यांनी विठ्ठलाला साद घातली. विठ्ठलाकडून अपेक्षित प्रतिसाद मिळावा, म्हणून ते अधिर झाले होते. अशा अवस्थेत त्यांच्या मनात विठ्ठलाच्या मौनाविषय़ी जे विचार उठले, ते या अभंगातून पाहावयास मिळत आहेत. असे म्हणता येते की, तुकोबारायांच्या या अभंगात सख्य भक्तीचा परिपोष झालेला आहे. नवविधा भक्तीत सख्यभक्ती ही आठवी भक्ती म्हणून गणली जाते आणि ती प्रामुख्याने भगवंताच्या आठव्या अवतारात म्हणजे कृष्णावतारात व्यक्त झाली आहे. या भक्तीचे वैशिष्ट्य असे की, यात स्वामी आणि सेवक, चालक आणि चाकर असा भेदभाव नगण्यपणे पाळला जातो. भक्त देवाला अधिकाराने कामे सांगू शकतो आणि देवही ती कामे मनापासून करतो. तो गवळ्यांनी सांगितल्याप्रमाणे गाई वळतो, राधेचे पाय चेपून देतो, नामदेवांचा हट्ट पुरवतो, जनाबाईला आंघोळ घालतो.... तुकोबारायांच्या या अभंगात त्याच भावनेने त्यांनी देवास बोलते करण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून येते. देवाने आपला अंगिकार करावा, एवढीच तीव्र इच्छा अंतःकरणात धरून तुकोबारायांनी देवाशी केलेल्या या संभाषणात ते देवाला न्याय, नीती, शास्त्र आदींचे असलेले बंधन दाखवितात. त्याचवेळी आपली नम्रता, अनन्यता, साधना, निश्चय आदी स्पष्टपणे ते देवासमोर सादर करतात आणि देवाने काहीतरी उत्तर द्यावे, यासाठी विनयाने परंतु परखडपणे आपला निर्धार प्रकट करतात. तुकोबारायांनी देवाशी केलेले हे संभाषण जरी व्यक्तिगत स्वरूपाचे असले तरी या अभंगाद्वारे साधकांना, ‘देवाशी कसे सादर व्हावे’ याचा बोध होत आहे.
 अतिशय कळकळीने आणि सविनय आपले निवेदन तुकोबारायांनी विठ्ठलापुढे केलेले आहे. परंतु देवाची प्रतिसाद देण्याची इच्छा नाही, असे त्यांना वाटते. देवाने काहीतरी बोलावे, यासाठी तुकोबाराय उतावीळ झालेले आहेत. देव मात्र शांतपणे, न बोलता तुकोबारायांची तगमग पाहत उभा आहे. कदाचित् देव तुकोबारायांची परीक्षा घेत असावा आणि त्यांच्या विचारात विचलता आहे का, याचे निरीक्षण करीत असावा. तुकोबारायांच्या मनातील उत्कंठा उत्तरोत्तर वाढत जात आहे. त्यांच्या मनात अनेक तरंग उठत आहेत. त्यांच्या भावना व्यक्त करीत ते देवाला म्हणतात, ‘देवा, तुम्ही का बोलत नाही, याचे कारणसुद्धा (- तेंही) मला कळले आहे.’ संतांनी गाइलेली विठ्ठलाची महती, त्याचा स्वभाव आणि त्याच्या कर्तृत्वाचे वर्णन करणारी बिरुदावली तुकोबारायांनी जाणली आहे, हेही या चरणखंडातून दर्शविले जात आहे. विठ्ठलाची अशी प्रसिद्धी (- नांव) आहे की, तो संकट हरण करणारा हरी आहे. ते खरे असले तरी ज्याचे संकट तो हरण करतो, त्याची पात्रता तो प्रथम जोखतो. तुकोबारायांना असे वाटते की, त्यांना अजून ती पात्रता लाभलेली नसावी आणि त्यामुळेच देवाला त्यांची विनंती मान्य करावयास संकोच वाटतो आहे (- लाजसी). म्हणून ते आपली भूमिका स्पष्ट करतात आणि देवाला सांगतात की, ‘तुम्हाला संकटात (- गोवा) टाकत नाही. लायक नसलेल्या माझ्यासारख्याचा केवळ हट्ट पुरवावा लागेल, म्हणून लोकलज्जा (- भीड) सांभाळण्यासाठी अवघड वाटून घेऊ नका. तुम्हाला जे योग्य वाटते ते करण्यास तुम्ही सर्वसमर्थ आहात्. भीडभाड तुमच्या मनातून काढून टाकावी.’
 तुकोबारायांची मागणी आहे की, देवाने त्यांचा अंगिकार करावा. त्यांना स्वतःला त्यांचे मागणे अयोग्य वाटत नाही. परंतु, त्यांची मागणी पुरवणे देवाला भारवत वाटते आहे, असे समजून तुकोबाराय पुढे देवास निवेदन करतात की, ‘मला मागायचे आहे ते मी तुमच्यापुढे ठेवले आहे. ते तुम्ही स्वीकारवेच असे मी म्हणत नाही. माझा अंगिकार करावयाचा नसेल, तर तसे बिनदिक्कतपणे सांगून तुम्ही मला उत्तर द्यावे.’ तुकोबाराय देवाला पुढे असे स्पष्ट करतात की, ‘तुमच्याकडून (जर) नकारार्थी उत्तर मला मिळाले तर मग मी विचार करीन.’ तुकोबारायांचा संतवचनांवर निस्सीम विश्वास आहे. त्यांनी गाइलेली देवाची महती खोटी असू शकत नाही, अशी त्यांची खात्री झालेली आहे. ‘मी विचार करीन’ असे जे तुकोबाराय येथे म्हणतात, त्यामागे ‘देवाने माझा अंगिकार करण्यासाठी मी कुठे उणा पडत आहे, त्याचे आत्मपरीक्षण मी करीन’ असा भाव आहे आणि हा अभंगाचा गाभा (धृपद) आहे.
 तुकोबाराय विठ्ठलाला ‘मी आत्मपरीक्षण करीन’ असे म्हणतात खरे, पण विठ्ठलाला न्याय-नीतीचा दाखलाही देतात. हा दाखला देताना तुकोबारायांचा भाव असा दिसतो की, भगवंत त्यांचा अंगिकार करून घेण्यासाठी कदाचित् त्यांना पात्र समजत नसेलही, तथापि, एक याचक म्हणून तरी देवाने आपली संभावना करावी, असे तुकोबारायांना वाटते. त्या दृष्टिकोनातून ते देवापुढे विनयाने निवेदन करतात की, ‘देवा, असे पाहा ना की धर्मनीतीप्रमाणे दाता आणि याचक या दोघांनाही मर्यादा आखून दिली आहे. तू दाता आहेस् आणि मी एक याचक. दात्याने यथाशक्ती दान द्यावयास हवे आणि मागणार्‍यानेही दात्याची मर्यादा जाणून जे मागायचे ते मागायला हवे. देवा, तुम्ही तर सर्वसमर्थ आहातच. त्यामुळे मी काहीही मागितले तरी तुम्ही ते देऊ शकता. दात्याने याचकाला विन्मुख करणे किंवा मागणार्‍याने दात्याचा अवमान करणे हे दोन्हीही दाता तसेच याचक यांना दोषास्पद ठरत असते, असे धर्मनीतीचे सांगणे आहे.’ तुकोबारायांनी अशा प्रकारे देवाला एका अर्थाने पेचात पकडले आहे.
 देवाला धर्मनीतीची जाणीव नाही, असे तुकोबारायांना म्हणावयाचे नाही. परंतु, आपल्या पदरात दान पाडून घेण्यासाठी एक प्रकारे देवाला ते सांगू इच्छितात की, ‘देवा, तुम्ही मला विन्मुख करून पाठवू नये, यासाठीच मी बळेबळे हे धारिष्ट्य दाखवीत आहे. धर्माच्या रक्षणासाठी तुम्ही पुन्हा पुन्हा जन्म घेत असता. त्यामुळे काहीही झाले तरी तुम्ही धर्मनीती पाळणारच, हा माझा विश्वास आहे. तुमच्या नेमातून तुम्ही स्वतःची सुटका करून घेणार नाही, हेही मला माहित आहे. म्हणूनच मी आशा धरून आहे. मला तुमच्या वचनाची आत्यंतिक इच्छा (- वास) आहे, ती तुम्ही पुरी करावी’.
 तुकोबारायांनी अन्यत्र जसे म्हटले आहे की, ‘हाचि नेम आता न फिरे माघारी’, तोच दृढनिश्चय तुकोबाराय इथेही प्रकट करीत आहेत. ते देवाला निर्वाणीचे सांगतात की, ‘माझा नेम आता हाच आहे की, तुमचे वचन घेतल्यावाचून विन्मुख होऊन परतायचे नाही. तुम्ही आता माझा अंगिकार केला आहे असे तरी म्हणा किंवा माझा अंगिकार करणार नाही, असे तरी म्हणा.’ स्वाभाविकपणे तुकोबारायांनी आपले निवेदन करून देवाचा नामघोष सुरू केला असणार. त्यांची काकुळती, निर्भयता आणि निर्धार पाहून देवाने त्यांचा अंगिकार केला असणार आणि मग तुकोबाराय अत्यानंदाने उद्‍गारले असतील, ‘बैसलो शेजारीं गोवि़दाचे... बळियाचा अंगसंग झाला आतां । नाही भय चिंता’.
(क्रमशः) 

संपर्क : (डॉ. रामपूरकर : ०९८२०३७६१७५)