पाऊस ही हा तुझ्यासारखा,
येतो, छळतो, सुखावतो अन
अवचित जातो ... तुझ्यासारखा ...!
मेघांची ओढून ओढणी
लहरत येतो ... तुझ्यासारखा ...!
पैंजण थेंबांचे पदी बांधून
किती थिरकतो ... तुझ्यासारखा ...!
ओढ लावतो कधी जीवा, कधी
बरसून जातो ... तुझ्यासारखा ...!
मिठीत घेता मी त्याला, तो
निसटून जातो ... तुझ्यासारखा ...!
तृषार्त माझ्या ओठांसाठी
तोच एक तो ... तुझ्यासारखा ...!