सावळ्या लाटा आकाशी बेफान
सडसडते आसूड फुटती धारातून
रानटी वारा धावे पिसाटून
कानात पाशवी भेसूर घोंगावून
वृक्ष कडाडत पडले उन्मळून
हिरव्या वेलीही भरल्या कुंकवान
धुकट काळोख सर्वत्र झिरपून
चिंतेचे सावट दाटले विषण्ण
काळीज फाटे विजा चमकून
कापरे देहात मेघ गडाडून
पक्षांची घरटी मातीत पसरून
शोधती निवारा कुठे फडफडून
गोठ्यात गुरे निश्चल थबकून
भयाची सावली सर्वत्र दाटून
दार अंगण जलमय होवून
वाहते घरदार वाटते चमकून
पडवीच्या पत्र्याचे तांडव वादन
शब्द रवात गेले हरवून
कुण्या घराचा पत्राही उडून
पडे कडाडत अंगणी येवून
ठिबकू लागली कौल कुठून
भांड्यांनी घर गेले भरून
कधी सांजावले आले नाकळून
सर्वांगाचे मग होऊन कान
उरे कानोसा भये थिजून
देवा विठोबा वाचव यातून
हतबल शरण चिंतीत मन
विक्रांत प्रभाकर
दुवा क्र. १