नाटाचे अभंग ... भाग १६

१५. आतां मी न पडें सायासीं । संसारदुःखाचिये पाशीं ।
 शरण रिघेन संतांसी । ठाव पायांपाशी मागेन त्यां ॥१॥
 न कळें संचित होते काय । कोण्या पुण्यें तुझें लाधती पाय ।
 आतां मज न विसंबें वो माय । मोकलूनि धाय विनवीतसें ॥धृ॥
 बहुत जाचलों संसारें । मोहमायाजाळाच्या विखारें ।
 त्रिगुण येताती लहरें । तेणें दुःखें थोर आक्रंदलों ॥३॥
 आणिक दुःखें सांगों मी किती । सकळ संसाराची स्थिती ।
 न साहे पाषाण फुटती । भय कांप चित्तीं भरलासे ॥४॥
 आतां मज न साहावे सर्वथा । संसारगंधीची हे वार्ता ।
 झालों वेडा असोनि जाणता । पावे अनंता तुका म्हणे ॥५॥

तीव्र मुमुक्षुत्व लाभलेल्या साधकाची मनःस्थिती या अभंगातून व्यक्त केलेली दिसत आहे. पारमार्थिक साधना करताना शास्त्राधारित संतवचनांच्या श्रवण-वाचनाद्वारे प्रपंचाचे स्थायी स्वरूप आणि परमार्थाचे वर्म तुकोबारायांना कळून आले. कळते पण वळत नाही, अशी काहीशी स्थिती तुकोबारायांची झालेली आहे. तुकोबाराय आपल्या मनातील वेदनांचे निवेदन स्पष्टपणे देवापुढे करतात. यालाच भक्तीमार्गातील शेवटची असलेली ‘आत्मनिवेदन भक्ती’ म्हटल्यास वावगे होणार नाही. हे आत्मनिवेदन करताना तुकोबाराय कुठलीही गोष्ट हातची राखून न ठेवता प्रपंच आणि परमार्थात जी आत्मप्रचिती आली, त्याचा पाढा परखडपणे भगवंतापुढे वाचतात. या अवस्थेत त्यांच्या मनात असा दृढविश्वास निर्माण झालेला आहे की, प्रारब्धाधिन असलेल्या प्रपंचाचे स्वाभाविक स्वरूप (मग तो प्रपंच जीवापासून देवापर्यंतच्या कुणाचाही असो), हे दुःखरूपच आहे (अनित्यं असुखं लोकम्... भ.गी.०९.३३ तसेच दुःख बांदवडी हा संसार । सुखाचा विचार नाही कोठे ॥ तु.गा.). या प्रपंचाबाबत तक्रार करणे अथवा त्यामध्ये सुधारणा करण्याचा निष्फळ प्रयत्न करणे, ही अनाठायी केलेली उरफोड ठरेल. पूर्ण विचारांती तुकोबाराय संतांना शरण जाण्याचा निश्चय करतात. याला कारण हे की, प्रपंच असो किंवा परमार्थ, शास्त्रशुद्ध प्रकारे संतांनी स्वतः आचरून दाखविलेला आहे. त्यांनी दाखवलेल्या मार्गाने आपणास इच्छित निःसंशय प्राप्त होईल, असा त्यांचा विश्वास आहे. परंतु, संतांशी गाठभेट देवकृपेशिवाय होणार नाही, या भावनेने तुकोबाराय त्यांचे आर्त भगवंताला निवेदन करून त्याने पावावे, असे विनवितात.
अभंगाच्या सुरुवातीस आपले निर्णायक मत सांगताना तुकोबाराय स्पष्टपणे असे सांगतात की, ‘झाले तेवढे पुरे... संसाराच्या बंधनात (- पाशीं) अडकून, त्यातून मिळणार्‍या दुःखामध्ये बदल व्हावा, यासाठी कुठल्याही प्रकारचे सायास मी आता करणार नाही.’ या निर्णयाप्रत आल्यानंतर आयुष्यातील पुढील वाटचाल फलदायी होण्यासाठी ते संतांना शरण जाणार असल्याचे निवेदन देवाला करतात. यामागे तुकोबारायांचा असा भाव दिसतो की, प्रपंच आणि परमार्थ या दोन्हींची संतांनी यथार्थ अनुभूती घेतलेली आहे. शिवाय, संत आप-पर भाव न ठेवता सर्व जीवांना दयार्द्र अंतःकरणाने हिताचाच सल्ला देणारे असतात. त्यांना शरण जाऊन मनुष्यजन्माला आल्यानंतर प्रपंच व परमार्थ हे दोन्हीही युक्तीने कसे करता येतात, याचे पायाभूत ज्ञान त्यांच्याकडून घेता येईल, असा तुकोबारायांचा मानस आहे. ‘ठाव पायांपाशी मागेन’ यातून असाही अर्थ निघतो की, चरण हे आचरणाचे उपलक्षण म्हणविले जाते आणि यथार्थ आचरणाचे ज्ञान कृपाप्रसादरूपाने त्या संतांकडून घेता येईल.
 धृपदाच्या चरणामध्ये तुकोबाराय काहीसे साशंक झाले आहेत. शुद्ध पुण्यानेच भगवंताची कृपा प्राप्त होऊन संतांशी गाठ पडते, हे त्यांना माहित आहे. त्या दृष्टीने आपला विचार देवासमक्ष प्रकट करताना ते म्हणतात, ‘मी जन्माला येताना माझ्या गाठीशी असलेले पाप-पुण्य काय होते किंवा आतापर्यंतच्या माझ्या आयुष्यातील कर्मफले (माझे संचित) काय गोळा झाली आहेत, ते मला माहित नाही.’ गत आयुष्यातील कमाईबद्दल त्यांनी त्यांची शंका व्यक्त केल्यानंतर पुढील आयुष्यातील कर्माविषयी ते त्यांच्या मनातील प्रश्न देवापुढे प्रकट करतात की, ‘कोणत्या पुण्याने तुझे पाय लाभतील, तेही मला माहित नाही.’ येथे ‘कोण्या पुण्यें’ या पदाविषयी थोडा विचार करणे आवश्यक आहे. श्रीज्ञानेश्वरीच्या आधारे पुण्याचे तीन प्रकार मानता येतात - १) पुण्याधिक्य असलेले पुण्य,  २) पाप-पुण्य समान असलेले मिश्रित पुण्य व ३) शुद्ध पुण्य. यापैकी पहिल्या प्रकाराने स्वर्गप्राप्ती, मिश्रित पुण्याने मनुष्यजन्म तर शुद्ध पुण्याच्या योगाने संत व भगवंताची प्राप्ती होते. (‘जयामध्यें नारायण । शुद्ध पुण्य तें एक ॥’ असे तुकोबारायांचेच एक वचन आहे.) स्वतःचे अज्ञान आणि मनातील प्रश्न देवाला निवेदन केल्यानंतर अवसान हरपलेले (- धाय मोकलूनि) तुकोबाराय पराकोटीच्या तळमळीने , देवाला विनवतात की, ‘आता तू मला दूर लोटू नकोस.’ इथे यत्किंचितही कर्तव्य तुकोबाराय आपल्याकडे न घेता सारा भार ते देवावर टाकत आहेत. संसारपाशातून अद्याप सुटका न झाल्याने देवाचा आठव त्यांच्याकडून जर झाला नाही, तर देवाने ते क्षम्य समजावे आणि कृपा करून देवानीच त्यांचा आठव ठेवावा, असे तुकोबाराय येथे विनवीत आहेत. यामध्ये अनन्यशरणागती आहे. ज्याप्रमाणे लहान बालक तहान-भूकेसाठी आईचा आठव करणे जाणत नाही, ते केवळ धाय मोकलून रडत राहाते आणि म्हणून आईनेच आठवण ठेवून अर्भकाची तहान-भूक शमवायची असते, ती भावना तुकोबारायांच्या या निवेदनात दिसत आहे.                                                                     
देवाची आत्यंतिक करुणा भाकण्याचे कारण तुकोबाराय पुढील चरणात प्रकट करतात. आतापर्यंत निष्फळ प्रयत्नांद्वारे संसार सुखाचा करण्याचा जो त्यांनी आटोकाट प्रयत्न केला, त्याचे फलित म्हणून त्यांच्या वाट्याला केवळ क्लेषच (- बहुत जाचलो) आले. जीवावर नियंत्रण करणारी माया, जिच्या अधिन यच्चयावत् जीवमात्र आहेत, ती मोहरूपी जाळ्यात जीवाला अडकवून विषवत् आत्यंतिक क्लेष जीवास भोगावयास लावते. त्या जोडीला मायेची पोरे असलेले तीन गुण (सत्व, रज, तम) आवेगाने जीवावर आक्रमण करीत राहतात (ऱ्येताती लहरें). त्यातून क्लेष वाढतच जातात. या सर्व दुःखाच्या दावाग्नीमध्ये होरपळून निघणारा जीव केवळ आक्रंदनाशिवाय काहीही करू शकत नाही. तुकोबारायांची स्थिती अशी झाली आहे.
संसारात भोगलेल्या दुःखाचा पाढा वाचण्याचा तुकोबारायांना उबग आला आहे. किती वेळा आणि काय काय सांगावे... ते आठवणेही नको नि सांगणेही नको, असे त्यांना वाटते. कोळसा कितीही उगाळला तरी तो उजळणारा नाही, अशी या संसाराची स्थिती आहे. आपण भोगत असलेल्या दुःखाची तीव्रता वर्णन करताना तुकोबाराय म्हणतात, ‘न साहे पाषाण फुटती’. (त्रिगुणांचे द्योतक असलेल्या) ऊन-वारा-पाऊस यांवर निसर्गाचेच नियंत्रण असते आणि पाषाणही निसर्गानेच निर्माण केलेला असतो, तथापि या तिनांच्या आघाताने पाषाण फुटत असतात. तद्वत्, त्रिगुणांच्या आक्रमणाने संसाराची तशीच वाताहत होते. तुकोबाराय देवाला तळतळीने सांगतात की, ‘माझ्या अंतःकरणात या संसारातील दुःखांमुळे भीती दाटली आहे आणि चित्ताचा थरकाप होतो आहे.’
अभंगाचा समारोप करताना तुकोबाराय आपली असहायता प्रकट करताना भगवंताजवळ रडकुंडीला येऊन निवेदन करीत आहेत की, ‘आता कुणीही कितीही या संसाराबद्दल गुणगान (-संसारगंधीची वार्ता) करो, मला त्याचा दर्प (घाणेरडा वास) सहन होत नाही. जाणता असूनही मी वेडापिसा झालो आहे. यातून शीघ्र तूच सोडव.’ तुकोबारायांची देवाला ही विनवणी यासाठी आहे की, त्याने योग्य अशा संतांची गाठ घालून द्यावी, ज्यायोगे प्रपंच व परमार्थ हे दोन्हीही युक्तीने कसे साधता येईल, याचे पायाभूत ज्ञान लाभेल.
(क्रमशः) 

संपर्क : (डॉ. रामपूरकर : ०९८२०३७६१७५)