नाटाचे अभंग... भाग १७

१६. आतां तुज कळेल तें करीं । तारीसी तरी तारीं मारीं ।
 जवळी अथवा दुरी धरीं । घालीं संसारीं अथवा नको ॥१॥
 शरण आलों नेणतपणें । भाव आणि भक्ति कांहींच नेणें ।
 मतिमंद सर्व ज्ञानें । बहु रंक उणें रंकाहुनी ॥धृ॥
 मन स्थिर नाहीं माझिये हातीं । इंद्रियें धांवतां नावरती ।
 सकळ खुंटलिया युक्ति । शांति निवृत्ति जवळी नाहीं ॥३॥
 सकळ निवेदिला भाव । तुझिये पायीं ठेविला जीव ।
 आतां करीं कळे तो उपाव । तूंचि सर्व ठाव देवा माझा ॥४॥
 राहिलों धरूनि विश्वास । आधार नेटीं तुझी कास ।
 आणिक नेणें मी सायास । तुका म्हणे यास तुझें उचित ॥५॥

तीव्र मुमुक्षुत्व लाभलेल्या अवस्थेत मनातली खळबळ, अशांती, बेचैनी आपल्या उपास्याला आक्रंदून निवेदन केल्यानंतर तुकोबारायांचे मन शांत झाले. बुद्धीत पालट झाला. त्यांच्या अंतःकरणात त्यांच्या उपास्याविषयी तसेच साधनेविषयी परमोत्कट निष्ठा निर्माण झाली. त्यांच्या चित्ताला व्यग्र करणार्‍या प्रापंचिक किंवा एकंदरीत त्यांच्या आयुष्यातील आधिदैविक, आधिभौतिक तसेच आध्यात्मिक या तिहींपैकी कुठल्याही गोष्टीचे आता चिंतन वा चिंता करण्याची आवश्यकता त्यांना वाटेनाशी झाली. संतसंग, शास्त्रश्रवण व संतवाङ्मयाचे सखोल चिंतन घडल्यानंतर तुकोबारायांचे असे लक्षात आलेले आहे की, भगवंतावर सर्व भार सोपविल्यानंतर साधकाने स्वतःबद्दल, आपल्या जीवनाबाबत, आपल्या उत्कर्षाबाबत निर्णयात्मक विचार करू नये. उलट, स्वतःला सर्वार्थाने भगवंताच्या ‘हातचे बाहुले’ आहे, असे समजावे. कर्ता-करविता आता भगवंत आहे, हा दृढ विश्वास धरला पाहिजे. जीवनात घडणारे त्रिविध प्रकारचे बदल हे विधिलिखिताप्रमाणे घडत असतात. विधिलिखित बदलण्याचा अधिकार भगवंताकडे राखून ठेवलेला आहे. यालाच नियती असे म्हणता येते. या नियतीबद्दलचे एक वैशिष्ट्य असे की, तिच्यापुढे विधिलिखित वैयर्थ ठरते, कारण नियती ही भगवंत-प्रेरित असते; तसे घडावे, हा भगवंताचा मानस असतो, म्हणूनच अशा घटना अनाकलनीय असतात.
स्वतःला ‘भगवंताच्या हातचे बाहुले’ समजल्यानंतर नियतीचे कार्य सुरू होते, असे म्हणता येते. तुकोबारायांच्या मनात आता तसा तात्त्विक विवेक जागृत झाला आहे. म्हणून कुठल्याही बाबतीत अधिर न होता, उच्छृंखलपणा न दाखविता, तुकोबाराय आपल्या साधनेतील, आपल्या जीवनातील, आपल्या प्रपंचातील घडणार्‍या गोष्टींचे चिंतन अथवा चिंता आता करीत नाहीत. या अभंगातून आपल्या अंतःकरणात दृढ झालेली निष्ठा तुकोबाराय अत्यादराने, विनम्रपणे देवाला निवेदन करीत असताना त्यांच्या मनःस्थितीचे असे हे चित्र समोर उभे राहते. त्यांची अशी भावना आहे की, आपल्या अंतःकरणात जे काही चिंतन चाललेले आहे ते देवाला (न सांगता) कळणारे असूनही, आपण त्याच्यापुढे उघड केले तर, त्याला ते तोषवील.
आपल्या उपास्याचे अलौकिक व अकुंठित सामर्थ्य तसेच त्याच्या ठिकाणी असलेला अनन्यसाधारण दयाभाव याबद्दल संपूर्ण विश्वास तुकोबारायांच्या चित्तात दृढ झाला आहे. त्यांच्या मनातली खळबळ त्यांनी देवाला निवेदन करून झाली आहे. ‘आतां’ म्हणजे ‘देवा, तुला अकळ (अनाकलनीय) असे काहीच नाही. तरीही माझ्या मनातली खळबळ शांत करण्यासाठी तुला जे काही सांगावयाचे होते ते मी सांगितले आहे’ असे उच्चारून देवाला पुढे ते विनवतात की, ‘सारे तू ऐकले आहेस्... तुला त्यातून जे ग्राह्य वाटले असेल, त्यानुसार तुला जो काही निर्णय घ्यायचा असेल, तो घे... मला तारावयाचे असेल तर तार किंवा मार... मला जवळ कर किंवा दूर लोटून दे... संसारात अडकवायचे असेल तर तसे कर वा संसारापासून मला मुक्त कर.’ येथे तुकोबारायांचा भाव असा आहे की, ‘देवा, तू काय करावे, हे मी सांगणार नाही. माझे हित कशात आहे, हे तूच जाणणारा आहेच. तू जे करशील ते माझ्या हिताचेच असणार आहे आणि त्याविषयी माझा पूर्ण विश्वास आहे.’
पुढे तुकोबाराय, ते ‘नेणतपणे’ देवाला शरण गेल्याचे सांगतात. त्यांनी केलेले शास्त्रश्रवण, वाचलेली संतवचने वा स्वतःच्या मनातले चिंतन यातून त्यांना काहीच स्थायी बोध झालेला नाही. यावरचा उपाय म्हणून त्यांनी देवाला संतांचा आधार मागितला होताच. त्यांची ती मागणी देवाने मानावी का नाही याचा निर्णय त्यांनी देवावर सोडला आहे. ती त्यांची उत्कट इच्छा जरी असली तरी त्याबद्दल ते आग्रही आहेत, असे ते म्हणत नाहीत, तर स्वतःची अवस्था ते स्पष्टपणे देवाला सादर करीत आहेत. त्यांच्या कथनातून त्यांच्या अंतःकरण चतुष्टयाची स्थिती काय झाली आहे, त्याचा बोध होतो. ते सांगत आहेत की, ‘देवाविषयीचा भाव माझ्या मनात रुजत नाही... हा भाव ज्या भक्तीचा प्राण आहे, ती भक्ती मी जाणत नाही... शास्त्रांच्या ज्ञानाचा आधार घ्यावा तर मी मतिमंद असल्यामुळे मला त्यात काही गती नाही... दास्य करावे तर दास्यवृत्ती मला माहित नाही... आणि धनाचा विचार करावा तर मी गरीबातला गरीब, अकिंचन आहे.’ तुकोबारायांच्या या कथनातून त्यांचा खोटा अहंकार मृतवत् झाल्याचे दिसत आहे. पुढे इंद्रियांसहित मनाची अवस्था ते सांगत आहेत की, ‘मी आटोकाट प्रयत्न करूनही माझे मन माझ्या ताब्यात येत नाही अन् इंद्रियांची विषयांकडे निरंतर असलेली धाव मी रोखू शकत नाही. माझी बुद्धी खुंटली आहे. मी योजलेल्या सर्व युक्त्या निष्फळ ठरत आहे. या सार्‍यांचा परिणाम म्हणून माझ्या चित्ताला शांती लाभत नाही. माझे हे चित्तचतुष्टय अशा प्रकारे निरंकुश झालेले असल्याने विषयांपासून अंतःकरणाला दूर ठेवण्यासाठीचे वैराग्य (- निवृत्ती) माझ्याजवळ नाही.’ एखाद्या निर्बल राजाला त्याच्याच हाताखालील मंत्र्यांनी संगनमत करून त्याला कैदेत टाकावे, अशी अवस्था तुकोबारायांची झाली असल्याचे यातून दिसत आहे.
तुकोबाराय पुढे देवापुढे हात जोडून सांगत आहेत की, ‘माझी दयनीय झालेली अवस्था मी हातचे काहीही न राखता निवेदन केली आहे. मी माझा केवळ देहच नव्हे; माझे जीवपण तुझ्या चरणी समर्पित केले आहे... जीव हा तुझाच अंश असल्याने (आणि तो तुला अर्पण केला असल्याने) आता मला वेगळे अस्तित्व राहिलेले नाही... तूच माझा एकमेव, अनन्य आधार आहेस... तुला जो योग्य वाटेल तो उपाय तू कर’.
अभंगाचा समारोप करताना तुकोबाराय त्यांनी निश्चित केलेली त्यांची भूमिका आणि त्यांचा निष्ठावंत भाव देवाजवळ स्पष्ट करण्यासाठी म्हणतात, ‘माझ्या मनात एकच विश्वास आहे... आता तूच माझा एकमेव आधार आणि आश्रय आहेस... सर्व शक्तीनिशी (नेटाने) मी तुझी कास धरली आहे... माझ्याकडून आता अन्य काहीही करणे नाही... तुझे यास म्हणजे तू माझ्यासाठी जे काही करशील तेच उचित असेल... ते माझ्या हिताचेच असणार आहे’. 
(क्रमशः) 

संपर्क : (डॉ. रामपूरकर : ०९८२०३७६१७५)