नाटाचे अभंग... भाग १८

नाटाचे अभंग... भाग १८

१७. देवा तूं कृपाकरुणासिंधु । होसी मायबाप आमचा बंधु ।
 जीवनसिद्धि साधनसिंधु । तोडिसी भवबंधु काळपाश ॥१॥
 शरणागतां वज्रपंजर । अभयदाना तूं उदार ।
 सकळां देवा तूं अगोचर । होसी अविकार अविनाश ॥धृ॥
 भागलीं स्तुति करितां फार । तेथें मी काय तें गव्हार ।
 जाणावया तुझा विचार । नको अंतर देऊं आतां ॥३॥
 नेणें भाव परि म्हणवितों तुझा । नेणें भक्ति परि करितों पूजा ।
 आपलिया नामाचिया काजा । तुज केशीराजा लागे धांवणें ॥४॥
 तुझिया बळें पंढरीनाथा । झालों निर्भर तुटली व्यथा ।
 घातला भार तुझिया माथां । न भीं सर्वथा तुका म्हणे ॥५॥

तुकोबारायांच्या अंतःकरणात देवाविषयीचे अलौकिक, अवर्णनीय, शब्दातीत व अकथनीय माहात्म्य प्रस्थापित झालेले आहे. हे माहात्म्य जरी शब्दातीत असले तरी तुकोबाराय साधकाच्या मार्गदर्शनासाठी आणि उपास्याच्या तोषाकरिता आपल्या सामर्थ्यानुरूप शब्दांद्वारे देवाची एकप्रकारे वाक्पूजा करीत आहेत. ही वाक्पूजा समर्पित केल्यानंतर जीवासाठी देवाच्या महानतेचा कसा उपयोग होतो, याचे वर्णन तुकोबाराय या अभंगाद्वारे करतात व साधकाच्या समर्पणाचे फळ कोणत्या रूपाने प्राप्त होते तेही सांगतात. (उपासनेत बारा या संख्येला प्रमाण मानून देवाच्या बारा नावांचे स्मरण केले जाते. ‘द्वादशैतानि नामानि त्रिसंध्यः यः पठेत् नरः’ किंवा ‘द्वादशैतानि नामानि यः पठेत्श्रुणुयादपि’ वगैरे). भगवंताची नामे ही त्याचे गुण वर्णन करणारी असतात. शेवटी फलश्रुती दिलेली असते. तद्वत्, या अभंगात तुकोबारायांनी देवाच्या बारा गुणांचे वर्णन केलेले दिसून येते आणि शेवटी अलौकिक फलप्राप्तीही वर्णिली आहे. म्हणून हा अभंग प्राकृत स्तोत्र आहे, असे म्हटता येईल.)
देवाला साद घालून तुकोबाराय त्याला ‘कृपाकरुणासिंधु’ म्हणून संबोधतात. यच्चयावत् जीवमात्राला भगवंताच्या कृपेशिवाय, त्याच्या करुणामय प्रतिसादाशिवाय क्षणभरही जगता येणार नाही; किंबहुना, जगरहाटी बंद पडेल. त्यातून तुकोबारायांचा सांगण्याचा मुख्य हेतु असा की, जीवाला ज्या गोष्टींची नितांत आवश्यकता आहे ती म्हणजे समर्थाची कृपा आणि करुणा. ती देवाकडे अमर्याद स्वरूपात आहे, या अर्थाने त्याला कृपाकरुणासिंधु असे म्हटलेले आहे. येथे कृपा आणि करुणा या दोन्ही शद्बांचे थोडे चिंतन आवश्यक आहे. असे दिसून येते की, कृपाप्रसाद होण्यासाठी ‘कृपा करणारा’ आणि ज्याच्यावर कृपा करावयाची तो ‘कृपापात्र’ या दोघात कुठल्यातरी प्रकाराने संबंध प्रस्थापित झालेला असावा लागतो, हा एक भाग आणि कशासाठी कृपा हवी, ते इच्छित कार्य निवेदन करावे लागते, हा दुसरा भाग. म्हणून कृपा हा प्रसाद, प्रसन्न होऊन दिलेले दान असते. करुणा ही प्रसंगानुरुप असहाय्यतेमुळे झालेल्या व दयनीय अवस्थेत सापडलेल्या जीवाच्या सोडवणुकीसाठी स्वाभाविकरित्या करुणावंताच्या हृदयात जागी होते. तिथे याचनेची वाट पाहिली जात नाही. थोडक्यात, कृपेची अपेक्षा केली जाते व ती प्रसादरूपाने मिळते तर करुणा स्वाभाविक, उत्स्फूर्त असते. जीव आणि भगवंत यांचा अंश-अंशी सनातन संबंध आहेच (ममैवांशो जीवलोके... भ.गी.१५.७), म्हणून जीव भगवंताच्या कृपेसाठी पात्र आहे. आणि, जीवाच्या दयनीय अवस्थेत भगवंताच्या ठिकाणी करुणा जागृत होणे हा भगवंताचा स्वभावधर्म आहे. तो जीवावर जी करुणा दाखवितो, त्यामुळेच त्याला अकारण-करुणावलय म्हटले जाते. तुकोबाराय पुढे भगवंताला ‘होसी मायबाप आमचा बंधु’ असे म्हणून त्याचा गौरव करतात. माता-पिता-बंधु ही रक्ताची नाती असल्याने त्यांच्या अंतःकरणात आपल्याविषयी स्वाभाविकरित्या कृपा-करुणा वसत असते. तथापि, त्यांच्या कृपा-करुणेला व्यावहारिक स्वार्थाची किनार असते, असे म्हटल्यास वावगे होणार नाही. भगवंताची कृपा-करुणा मात्र निरपेक्ष असते. दुसरी गोष्ट अशी की, व्यावहारिक भाषेत एखादे नाते शब्दाने व्यक्त केले गेले, तरी जन्मतः प्राप्त झालेली नाती कुठेही कुणालाही लावता येत नाहीत. जिने आपल्याला जन्म दिला ती आई एकच असते. मातृस्वरूप प्रत्येक स्त्री मानता येते. दुसरी गोष्ट अशी की, माता-पिता-बंधु यांजकडून मिळणारी वागणूक कृत्रिमरित्या स्थापित केलेल्या नात्यातून पुरेपूर मिळणे अशक्य असते. तुकोबाराय देवाची महती सांगतात की,  देवाशी संबंध जोडण्यासाठी जीवाला दोघांमध्ये कुठलेही नाते प्रस्थापित करता येते (पिता अहमस्य जगतो माता धाता पितामह: ।... भ.गी. ९.१७) आणि जीवाला देवाकडून मिळणारा प्रतिसाद हा निरपेक्ष असल्याने त्याच्याशी नाते प्रस्थापित झाले की, तो जीवाचे परमकल्याण साधून देतो. भगवंत कृपा-करुणा कशाकरिता दाखवितो, ते तुकोबाराय पुढे स्पष्ट करतात की, मनुष्यासाठी ‘भगवंत’ हीच जीवनात प्राप्त करून घ्यावयाची परमोच्च सिद्धी आहे. भगवंताच्या प्राप्तीनंतर अन्य काही प्राप्त करून घ्यावयाचे काही शिल्लकच राहात नाही. तुकोबाराय देवाचे वर्णन करताना पुढे त्यास ‘साधनसिंधु’ म्हणतात. जीवनाची सिद्धी जो भगवंत, त्यानेच जीवासाठी अमर्याद अशी साधने, साधनमार्ग निर्माण करून ठेवले आहेत. मनुष्यदेह हा ईश्वरप्राप्तीचे पायाभूत साधन आहे. ईश्वर प्रत्येकाच्या हृदयात निवास करीत असल्याने, किंबहुना, विश्वातील कणाकणात ईश्वर असल्याने भगवंत हा साधनसिंधु ठरतो. पुढे तुकोबाराय भगवंत हा ‘भवबंध तसेच काळपाश तोडणारा’ असल्याचे वर्णन करतात. ‘भव’ या शब्दाने संसाराचा बोध होतो, कारण संसारात ‘भव’ म्हणजे निर्मितीची प्रक्रिया निरंतर चालू राहते. संसार ही भगवंताचीच निर्मिती असल्याने तो संसाराचा नाश करीत नाही. वासना ही कर्माला कारण होत असते आणि कर्म जीवाला बंधनात जखडून ठेवत असते. म्हणून जीव वासनेमुळे कर्मबंधात अडकून पुनःपुन्हा जन्म घेत राहतो. भगवंत जीवाची या भवबंधातून सुटका करतो व जीवाला जन्म-मृत्युच्या चक्रातून सोडवतो. जीवावर असलेला दुसरा बंध काळाचा आहे. त्याला नुसते ‘बंध’ न म्हणता तुकोबाराय ‘पाश’ म्हणून संबोधतात. काळाचा पाश कुणालाच उल्लंघिता येते नाही. जो जन्माला आला आहे त्याच्यावर काळाची अधिसत्ता असते. मात्र, विशिष्ट उदाहरणांमध्ये नियतीने ठरविलेला काळपाश भगवंताने आपल्या सामर्थ्याने दूर केलेला आहे (उदा. मार्कण्डेय ऋषी, सत्यवान, सच्चिदानंदबाबा)
आपल्या उपास्याची महानता वर्णन करताना तुकोबाराय सांगतात, ‘जे तुला शरण येतात, त्यांचे कुठल्याही परिस्थितीत रक्षण करण्यासाठी तू वज्राप्रमाणे अभेद्य असे कवच होतोस’. पुढे ते म्हणतात, ‘अभयदान देण्यासाठी तू उदार आहेस्.’ सर्व पुराणांनी विविध प्रकारच्या दानांची महती गाइलेली आहे. परंतु, ती दाने नाशवंत असल्याचे दिसते. अभयदान मात्र असे दान आहे की, ज्याच्या पदरात ते टाकले जाते, त्याच्याकडून त्या दानाचा विक्षेप कधीच होत नाही. ते दान नाशवंत नाही. जीवाने जीवाला दिलेले अभयदान हे तात्कालिक असते, कारण असे दान देणारा आणि ते दान घेणारा, हे दोघेही काळपाशाने बद्ध असतात. परंतु, तात्कालिक किंवा नाशवंत नसलेले असे अभयदान तोच देऊ शकतो, जो कालाचा स्वामी आहे, जो सर्वसमर्थ आहे आणि ज्याच्या ठायी करुणेचा सागर भरलेला आहे. येथे ‘उदार’ या शब्दाने असे दाखविले जात आहे की, जो अभयदान मागण्यासाठी अनन्यपणे शरण आलेला आहे, तो शत्रु जरी असला तरी, भगवंत त्याला तितक्याच वात्सल्याने अभयदान देतो. पुढे तुकोबाराय देवाचे वर्णन करताना म्हणत आहेत की, ‘सकळां देवा तूं अगोचर’. देव हा केवळ साधनेद्वारे कुणाच्याही इंद्रियांच्या अनुभूतीस येत नाही, तर भगवंताची ज्याच्यावर कृपा होते, त्याच्याच तो अनुभूतीस येतो. एव्हढेच नव्हे तर, स्वर्गातल्या देवांनाही तो यथार्थ रूपात दिसत नाही, असे येथे म्हटलेले आहे. वेद-शास्त्रांतून भगवंताचे वर्णन करताना तो ‘असाच नाही, इतकाच नाही, यापेक्षा तो आणखिन् काही आहे’ असे म्हणून त्याची अपरंपार व्यापकता सांगितली आहे. इंद्रियांच्या मदतीने ईश्वराला जाणावयास जावे, देवाची कृपाही व्हावी आणि त्याचा साक्षात्कार व्हावा, तर तो ज्या रूपात दर्शन देतो, ते साधकाच्या आराध्याचे रूप असते. म्हणजेच ते विकारी रूप असते. ते दर्शन त्या साधकापुरतेच मर्यादित असते. इतरांना ते दिसत नाही. साधकाला भगवंताच्या स्वरूपाचे जेव्हा यथार्थ ज्ञान होते, तेव्हा हाच भगवंत अविकारी (अस्ति, जायते, वर्धते, विपरीणमते, क्षीयते आणि नश्यते अशा सहा विकारांनी रहित), सर्वव्याप्त होतो, अविनाशी होतो. मग ज्या रूपात साधकाला साक्षात्कार झालेला असतो, त्या रूपाच्या ठायी अविनाशी रूपाने तो साधकाच्या हृदयात निवास करतो.
भगवंताचे स्तवन करण्यासाठी आपले सामर्थ्य अत्यंत तोकडे असल्याचे सांगण्यासाठी तुकोबाराय पुढील चरणात म्हणतात की, ‘भागलीं स्तुति करितां फार’. ‘भागली’ यामागील भाव असा आहे की, जीवदशेतील माणसेच काय पण अनेक प्रकारचे सामर्थ्य धारण करणारे देव-देवतादी, वेद-शास्त्रे आदी कुणीच देवाचे यथार्थ वर्णन करू शकत नाहीत. भगवंताचे वर्णन करताना शेष शिणला... त्याची जीभ फाटली, स्वसंवेद्य असणारा वेद मौनावला... महादेव सर्वेश्वर असूनही आपला थोरपणा सोडून, भगवंताचे स्तवन करण्याऐवजी, त्याच्या चरणीची गंगा मस्तकी धारण करण्यात ते कृतकृत्यता मानतात. या सर्वांच्या तुलनेत मानवी योनीत आलेले तुकोबाराय स्वतःला अडाणी, अज्ञानी (गव्हार) असल्याचे सांगून ‘देवाचे वर्णन करायला ते असमर्थ असल्याचे देवाला निवेदन करतात. पुढे ते आपला विचार प्रकट करतात की, ‘तुझे वर्णन करायला मी असमर्थ आहे खरा, पण तुझ्या रूपाबाबत जे काही सांगून ठेवले आहे, ते जाणून घेण्यासाठी मला तुझ्याच कृपेची नितांत गरज आहे’. ‘आता’ या पदाने असे दाखविले जात आहे की, यापूर्वी मला जाग नव्हती, आता मात्र मला अंतर देऊ नकोस’.
 भगवंताची स्तुती करण्यासाठी असमर्थ असल्याचे निवेदन देवापुढे करुन ‘देवाने आपल्याला अंतर देऊ नये’ अशी इच्छा प्रकट केली खरी, परंतु देवाने ‘आपल्याला जवळ ठेवावे’ यासाठी आवश्यक ती शास्त्रात सांगितेलेली कर्मेही अज्ञानामुळे ( - नेणें) आपल्याकडून घडत नाहीत हेही तुकोबारायांना सांगावयाचे आहे. अशा परिस्थितीत ‘देव भावाचा भुकेला’ या वचनानुसार देवाची जवळीक लाभावी तर, त्यासाठी हवा असलेला भाव कसा असावा, तेही माहीत नाही, असे निवेदन करून तुकोबाराय असेही सांगतात की, ‘भक्तीचे बीज असलेला भगवंताविषयीचा भावच मी जाणत नाही, तर मग भक्ती मला कशी माहित असणार... तीही मी जाणत नाही’. असे असले तरी देवाने आपली विनंती मान्य करावी, यासाठी तुकोबाराय देवाला साकडे घालतात की, ‘तुझी कीर्ती सांभाळण्यासाठी ( - नामाचिया काजा), देवा, शरणागताचे आर्त ऐकून तू धावत येत असतोस्, या वचनावर माझा ठाम विश्वास आहे. तसाच आताही माझा स्वीकार करण्यासाठी तू धावत यावेस्’.
 अभंगाचा समारोप करताना त्यांच्या अंतःकरणाला प्राप्त झालेली शांती तुकोबाराय वर्णन करतात. त्यांनी देवाची पूर्ण शरणागती पत्करून सारा भार त्याच्या माथी ठेवला. त्यामुळे प्रपंचात येणारी संकटे, आपत्ती, दुःखादी व्यथा यातून त्यांची सुटका झाली. ते साक्षीभावाने या सार्‍या घटनांकडे पाहू लागले. देवाचे बळ पाठीशी उभे राहिले आणि त्यामुळे कुठल्याही प्रकारची भीती अंतःकरणात शिल्लक राहिली नसल्याचे, ते पूर्णपणे निर्भय झाले असल्याचे, त्यांना देवाचे अभयदान प्राप्त झाल्याचे तुकोबाराय प्रकट करतात.  
(क्रमशः) 

संपर्क : (डॉ. रामपूरकर : ०९८२०३७६१७५)