नाटाचे अभंग... भाग १९

१८. कोण सुख धरोनि संसारीं । राहों सांग मज बा हरी ।
 अवघ्या नाशिवंता परी । थिता दुरी तूंही अंतरसी ॥१॥
 प्रथम केला गर्भीं वास । काय तें सांगावे सायास ।
 दुःख भोगिले नवही मास । आलों जन्मास येथवरी ॥धृ॥
 बालपण गेलें नेणतां । तारुण्यदशे विषयव्यथा ।
 वृद्धपणीं प्रवर्तली चिंता । मरे मागुता जन्म धरीं ॥३॥
 क्षण एक तोही नाहीं विसांवा । लक्ष चौर्‍यांशी घेतल्या धांवा ।
 भोवंडिती पाठीं लागल्या हांवा । लागो आगी नांवा माझ्या मीपणा ॥४॥
 आतां पुरे ऐसी भरोवरी । रंक होऊनि राहेन द्वारीं ।
 तुझा दास मी दीन कामारी । तुका म्हणे करीं कृपा आतां ॥५॥

 सर्व जीवयोनींमध्ये मनुष्यदेहाची महती वर्णावयाची आवश्यकता नाही. हा मनुष्यदेह वैशिष्ट्यपूर्ण तर आहेच, तो देवदुर्लभही आहे. असा देह प्राप्त झाल्यानंतर मनुष्याचे जे एकच आद्य आणि अंतिम कर्तव्य असल्याचे सर्व शास्त्रे, संत-महंत सांगतात, ते कर्तव्य म्हणजे नारायणाची प्राप्ती करून घेणे. यालाच शास्त्रामध्ये आत्मानात्मविवेक, सारासारविवेक किंवा आत्मज्ञानप्राप्ती म्हटले जाते. यालाच वेगळ्या भाषेत सांगताना, ‘स्व’ ला ओळखणे आणि निजरूपाची प्राप्ती करून घेणे, असेही म्हटले जाते. थोडा विचार केला तर दिसते की, मनुष्ययोनी प्राप्त झालेले असंख्य जीव आहेत, परंतु आत्मानात्मविवेक करणारे नगण्यच दिसतात. सर्वांना हा विवेक का सुचू नये, या प्रश्नावर विचार करताना लक्षात येते की, संसारातील प्रचंड अशा प्रलोभनांमुळे आणि मागे लावून घेतलेल्या किंवा मागे लागलेल्या व्यापामुळे आत्मानात्मविवेक करण्यासाठी मनुष्याला उसंत मिळत नाही व त्याची गरजही वाटत नाही. म्हणून जीवाच्या पाठी लागलेला आवागमनाचा फेरा अव्याहतपणे चालू राहतो. एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की, उत्क्रांती हा निसर्गाचा धर्म आहे. काहीच नव्हते, त्यातून विश्व निर्माण झाले. निर्मितीची ही प्रक्रिया चालूच राहते. चक्रगती हा निसर्गाचा दुसरा धर्म दिसून येतो. जे घडले ते मोडते. जे दिसते ते नासते. पुन्हा त्यातून नवे निर्माण होते. मनुष्य देह हा या निसर्गाचाच एक अंश असल्याने त्यालाही हे निसर्गधर्म लागू होतातच. सूक्ष्म जीवापासून उत्क्रांत होत आज दिसणारा वैशिष्ट्यपूर्ण मनुष्यदेह ही जीवाच्या उत्क्रांतीतील सर्वोत्तम स्थिती मानली, तर चक्रगतीने पुन्हा सूक्ष्मजीवात प्रकट होणे, हा मनुष्यदेहातील जीवाचा पतन-प्रवास अध्याहृत धरावा लागतो. म्हणून अत्युत्तम स्थितीत असताना पतन-प्रक्रियेतून सोडवून घेणे जीवासाठी हिताचे ठरणारे आहे. अशा सोडवणुकीसाठी प्रयत्न न करणे, ‘स्व’चा शोध न घेणे, ही म्हणूनच एक प्रकारे आत्महत्या ठरणारी आहे.
कोणताही जीव संसारात आल्यानंतर प्रत्ययास येणारी गोष्ट म्हणजे जीवाने सतत सुखाचा शोध घेण्यासाठी आटापिटा करणे. मनुष्ययोनीतील जीवाच्या सुखाच्या कक्षा स्वाभाविकपणे अतिशय रुंदावलेल्या असतात. असंख्य प्रलोभने असतात. त्यांना भुलून केलेल्या सायासातून जे सुख मिळते, ते कायम टिकणारे नसते. पुन्हा नव्या सुखासाठी सायास करणे सुरू होते. असे सुख कायम नसते, हा एक भाग आणि सुख हे सापेक्ष असते हा दुसरा भाग. एकाला जे सुखद वाटते, ते दुसर्‍याला सुखद वाटेलच, असे नाही. म्हणून ही सर्व सुखे भासमान् ठरतात. जीवाच्या ठायी ही जी सुखाची हाव स्वभावधर्म बनून राहाते, त्यालाच ‘मायेचा पगडा’ म्हटले जाते. खर्‍या व शाश्वत सुखाचा शोध घेण्याचा प्रयत्न म्हणजेच ‘स्व’ चा शोध किंवा आत्मानात्मविवेक. या विचाराची प्रक्रिया अंतःकरणात सुरू होणे, याला मुमुक्षुत्व लाभणे असे म्हटले जाते. या लाभासाठी पूर्वजांचे आशिर्वाद, पूर्वपुण्याई, संतसमागम आणि शास्त्रांचा सर्वांगाने (वाचन, श्रवण, चिंतन, मनन द्वारे) संग यांचा संयोग व्हावा लागतो. या स्थितीचा लाभ होणे ही मनुष्यजन्मातल्या जीवास परमोच्च स्थितीला पोहोचण्यासाठीची संधी असते. तुकोबारायांना असे मुमुक्षुत्व लाभले आणि त्यांनी स्वतःची असहाय्यता जाणून ते भगवंताला शरण गेले. तुकोबारायांनी त्यांच्या जीवनात सुखाचा अनुभव घेतला नाहीच, असे नाही. परंतु ज्या दुःखाचा सामना त्यांना करावा लागला, त्यातून पूर्वी मिळालेल्या सुखाला त्यांनी जोखले. त्यांना संसारातील फोलपणा जाणवला. त्यातून स्वतःची सोडवणूक करून घेण्यासाठी भगवंताचा आश्रय मिळावा, यासाठी आपली दयनीय अवस्था त्यांनी देवापुढे नम्रपणे प्रकट केली असल्याचे या अभंगातून दिसून येते.
अभंगाच्या प्रारंभी तुकोबाराय भगवंताला एक किंचित प्रश्न विचारतात की, ‘या संसारात रममाण होऊन राहावे, असे कोणते सुख आहे, ते देवा, सांग तरी’. संसारात कोणतेही शाश्वत सुख नाही, याची तुकोबारायांना खात्री झालेली आहे. संसारातील सर्वच सुखांचा विनियोग देहाच्या सुखासाठी आहे. हे सुख काय किंवा ते सुख भोगणारा देह काय, दोन्हीही अशाश्वत आहेत, नाशवंत आहेत, क्षणभंगुर आहेत. मग प्रश्न असा निर्माण होतो की, या संसारात काहीच सुख नाही का? तर, आहे... या संसारातही एक महत्वाचे सुख जीवाला लाभलेले आहे, परंतु त्याकडे जीवाने पाठ फिरविलेली आहे. ते सुख शाश्वत आहे, तरीही जीवाला त्याला जाणिव नाही. ही जाणिव करून देण्याचे काम संत करीत असतात. तुकोबाराय विशेषत्वाने हे दुःख प्रकट करतात की, ‘संसाराला आल्यानंतर देह, नाना विषय, तर्‍हेतर्‍हेचे भोग ( - परी) हे तर नाशवंत आहेत. म्हणूनच त्याविषयी मला काहीही आकर्षण नाही, पण जवळच स्थिर असलेला ( - थिता), तू दूर होतोस् आणि जीवाला अंतरतोस्, म्हणून फार वाईट वाटते.’ ‘थिता’ या शब्दाने असे दर्शविले जात आहे की, ईश्वर हा प्रत्येकाच्या हृदयात स्थायी भावाने निवास करीत असतो. असे असले तरी तो जीवाच्या अज्ञानामुळे झाकलेला राहतो, दूर भासतो.
पुढील तीन चरणांमध्ये तुकोबाराय संसारात येणार्‍या जीवाचा दैवदुर्विलास अथपासून इतिपर्यंत कसा भरून राहिला आहे, त्याचे निवेदन भगवंताला करतात. संसारात येणारा जीव प्रथम गर्भात प्रवेश करतो. तिथपासून त्याच्या व्यथेला सुरुवात होते. गर्भातील जीव परस्वाधीनपणे व असहाय्यतेने नाना प्रकारच्या क्लेषांना निमूटपणे सहन करीत असतो. कित्येक वेळा होणारे क्लेष पराकोटीला पोहोचून जन्माला येण्यापूर्वीच जीव मृत्यु पावतो. गर्भाला होणारे दुःख मातेच्या द्वारे व्यक्त होत राहते. गर्भस्थितीत असताना होणारे कष्ट अपरिमित असल्याचे सांगून नऊ महिने ते दुःख भोगण्याशिवाय पर्याय नसल्याचे तुकोबाराय सांगतात. ते दुःख भोगून जेव्हा गर्भातून जीव बाहेर येतो, तेव्हा कोंडून राहिलेले रडू त्याला व्यक्त करता येते. हे रडू नंतरही संपतच नाही. दुःखाची परंपरा चालूच राहते. अर्भक अवस्थेत होणारे दुःख नेणतेपणामुळे सांगता येत नाही. आई किंवा देहसंबंधी इतरेजन चुकीचे उपाय करून दुःख वाढवीत राहतात. बालपणी थोडेसे कळावयास लागले, तरी ‘हे करायचंच आणि ते करायचं नाही, तुला समजत नाही, गप्प बस’ वगैरे प्रकारे वाक्बाण सहन करीत अवहेलना होत राहते. पुढे तारुण्यावस्थेत अंगामध्ये शक्तीचा संचार जागा होतो, अहंकाराला बहर येतो आणि विषयांचे विलक्षण आकर्षण अन्य कुठल्याही गोष्टीचा विचार करू देत नाही. या अवस्थेत, करता येत असूनही, पारमार्थिक विचार करावयाचे मात्र सुचतही नाही. तारुण्यदशा संपून म्हातारपण येते, तेव्हा अंगातील सामर्थ्य हळू हळू कमी होत जाते. त्याचबरोबर मनातील आशा-आकांक्षा मात्र प्रबल होत राहतात. शारीरिक सामर्थ्यहीनतेमुळे विषयांचा भोग घेता येत नाही. निरनिराळ्या व्याधी शरीराचा ताबा घेतात. पुन्हा जीवन परावलंबी होते व पुन्हा अवहेलनेला तोंड द्यावे लागते. ‘आपले कसे होणार’ ही चिंता मन पोखरत राहते, पण जगण्याची तीव्र इच्छा उसळ्या मारीत राहते. अशा चिंतायुक्त अवस्थेत अपेक्षाभंग झालेला जीव शेवटी मृत्युला सामोरा जातो. बरे, मरणाने तरी यातून सुटका होते म्हणावे, तर देह सोडताना ज्या वासना शिल्लक राहिल्या होत्या, त्यांच्या पूर्तीसाठी ( - अंत्ये मति सा गति या न्यायाने) पुन्हा जन्म घ्यावा लागतो आणि व्यथेचे तेच रडगाणे मागे लागते.
जन्मापासून मरणापर्यंतच्या या कालक्रमणेचा इत्यर्थ सांगताना तुकोबाराय म्हणतात की, संपूर्ण आयुष्यक्रमात जीवाच्या अंतःकरणात क्षणाचीही उसंत नसते. मनाला शांती नाही. देहकेंद्रित झालेले विचार अंतःकरण व्यापून राहिलेले असतात. अखंड चिंतेमुळे आणि नाना प्रकारच्या वासनांमुळे चोर्‍याऐंशी लक्ष योनीतून जीव धावाधाव करीत राहातो. एव्हढेच नव्हे तर, प्रत्येक योनीत जीवाला सुख भासत राहतेच. त्यामुळे त्या त्या योनीच्या अनुरूप वासनांचा ( - हांवा) उद्रेक होत असतोच आणि त्यामुळे त्या त्या योनीत अनेक जन्माचे आवर्त ( - भोवंड) सुरू राहतात. आयुष्याचा अनुभव घेतलेल्या मनुष्याला एक तर पूर्ण अज्ञानामुळे पुढचे गणित काहीच कळत नाही किंवा समजले असले, तरी तीव्र चिंतेत गुरफटल्यामुळे ‘कळते पण वळत नाही’, अशी अवस्था होते. मुमुक्षुत्व लाभलेले तुकोबाराय मात्र या दुःखपूर्ण संसाराला पूर्णतः विटलेले आहेत. ते देवाला सांगतात की, ‘या मर्त्य देहाच्या नावाला, म्हणजे कीर्तीला, तसेच पोसलेल्या मीपणाला (अहंकाराला, माझे-मला करणार्‍या ममत्वाला) आग लागो.’ मनुष्य संपूर्ण आयुष्यभर अहं-ममतेच्या घाणीमध्ये घालवून अहंता आणि ममत्व याचाच पाठपुरावा करीत राहतो. मनुष्याचा हा निंद्य प्रयास संसारमालिकेत पुनःपुन्हा फेरे घ्यावयास लावीत असतो. महत्वाची बाब अशी की, भगवंताजवळ जाण्यासाठी ऐहिक विषयाबाबतची अहंता-ममत्वाचा त्याग करावाच लागतो.
अभंगाचा समारोप करताना तुकोबाराय आपल्या अंतःकरणातील तीव्र इच्छा प्रकट करतात की, केवळ व्यथाच पदरात टाकणारे हे वैयर्थ सायास ( - भरोवरी) आता बस् झाले... त्यातून सुटका हवी आहे. कुठलाच मोठेपणा नको... त्यापेक्षा देवाच्या पायाशी रंक होऊन त्याच्या दारात वास करणे हिताचे आहे. दीनत्व स्वीकारून, तो सांगेल ते काम करणारा ( - कामारी) त्याचा दास म्हणून देवाने आपला स्वीकार करण्याची कृपा करावी. इथे एक गोष्ट लक्षात येते की, जो देवाचा दास म्हणविला जातो, त्याचे हीन-दीनत्व संपलेले असते. जी भिक्षेच्या अन्नावर वाढली, तिचे लग्न धनिकाशी झाल्यावर तिला शेठाणीचे पद आपसूकच लाभलेले असते. आणि, देवाने सांगितलेले काम करणारा ‘कामारी’ जो झाला, त्याला निष्काम कर्मयोगाची प्राप्ती आपसूकच झालेली असते. तो जे काही करणार असतो, ती देवाची इच्छा म्हणूनच करणार असतो. तो जे काही उपभोग घेईल, ते उपभोग स्वतःच्या देहतृप्तीसाठी नसतील तर देवाच्या संतोषासाठीच ते असतील. म्हणूनच दुःख, व्यथा, क्लेष लवमात्रही शिल्लक राहत नाहीत, जन्म-मृत्युचे आवर्त संपतात व मनुष्याला त्याचे आद्य आणि अंतिम लक्ष्य साध्य होते.
(क्रमशः) 

संपर्क : (डॉ. रामपूरकर : ०९८२०३७६१७५)