नाटाचे अभंग... भाग २१

२०. न पवे सन्निध वाटते चिंता । वरि या बहुतांची सत्ता ।
 नुगवे पडत जातो गुंता । कर्मा बळिवंता सांपडलों ॥१॥
 बहु भार पडियेला शिरीं । मी हें माझें मजवरी ।
 उघड्या नागविलों चोरीं । घरिंच्याघरीं जाणतजाणतां ॥धृ॥
 तुज मागणें इतुलें आतां । मज या निरवावें संतां ।
 झाला कंठस्फोट आळवितां । उदास आतां न करावें ॥३॥
 अति हा निकट समय । मग म्यां करावें तें काय ।
 दिवस गेलिया ठाकईल छाय । उरईल हाय रातिकाळीं ॥४॥
 होईल संचिताची सत्ता । अंगा येईल पराधीनता ।
 ठाव तो न दिसे लपतां । बहु चिंता प्रवर्तली ॥५॥
 ऐसिया संकटाचे संधी । धांव घालावी कृपानिधी ।
 तुका म्हणे माझी बळबुद्धी । सकळ सिद्धी पाय तुझे ॥६॥

अनंत योनींमध्ये जीवाचे भ्रमण होत, अनेक जन्मांतरे घेतल्यानंतर, परमभाग्याने विवेकधारणेचे सामर्थ्य असलेली मानवयोनी प्राप्त होते. तथापि, विवेकजागृतीसाठी संतसंग, शास्त्रादींचा सत्संग, तसेच, पूर्वसुकृत गाठीशी असणे आणि ईश्वरकृपा या घटकांची नितांत आवश्यकता असते. विवेकबुद्धी जागृत होते, तेव्हा आपण एकाच ईश्वराचे अंश असूनही आपल्याला स्वस्वरूपाची ओळखदेखील राहिलेली नाही, आत्मकल्याण, पर्यायाने ईश्वराची प्राप्ती, करून घेण्याच्या आद्यकर्तव्याचे आपल्याला विस्मरण झाल्याचे जाणवते. ही कर्तव्यपूर्ती केवळ आणि केवळ मृत्युलोकात नरदेहप्राप्तीच्या योगेच करता येते, अन्यथा नाही, हे समजते. मन साधनाकडे वळते. साधन करीत असताना तीव्र मुमुक्षा उत्पन्न झाली असता जीवाच्या ठिकाणी भगवत्प्राप्तीसाठी आत्यंतिक उत्कंठा निर्माण होते. तरीसुद्धा केवळ उत्कंठा निर्माण होऊन (प्रपंचातदेखील) कार्यसिद्धी होत नसते. त्यासाठी सशास्त्र सायास, योग्य दिशेने केलेले प्रयत्न ही पहिली पायरी असते. हे लक्षात घ्यावे लागते की, केवळ मानवी प्रयत्नातून कार्यसिद्धी होत नाही, तर त्यासाठी विनम्र प्रार्थना आणि उपास्याची कृपा यांचीही तितकीच आवश्यकता असते. संत याविषयी मार्गदर्शन करतात. आपल्याकडे आलेल्या आर्ताला यथायोग्य आणि निरपेक्ष मार्गदर्शन संतच करू शकतात आणि अशा संतांशी गाठ होण्यासाठी प्रभुकृपा लागते. ‘घ्या देवाचे नाव आणि व्हा मरणाला तयार’ या संकेतातील ‘मरणाला तयार होणे’ याचा अर्थ प्रथम देवाचे सहाय्य याचून पराकोटीचे श्रम करण्यास तयार होणे, असा होतो. श्रम करणे आणि प्रार्थना या दोन गोष्टी माणसाच्या हातात असल्या तरी ईश्वरी कृपा कधी होईल, हे सांगता येत नाही. अर्थातच संतांशी गाठ होण्यासाठी प्रतीक्षा करणे प्राप्त होते. मन अधिर होऊन जाते. अशा क्षणी उपास्याशी कळकळीचा संवाद घडून येतो. या अभंगात अशाच प्रकारे तुकोबारायांचा देवाशी संवाद आपल्याला पाहावयास मिळतो. कार्यसिद्धीसाठी, कृतार्थता लाभण्यासाठी मनुष्याची  केवळ बळ आणि बुद्धी पुरेशी नसून भगवंताची कृपा असणे, हा सर्वात महत्वाचा भाग असल्याचे तुकोबारायांचे सांगणे आहे.
तुकोबाराय त्यांच्या मनातील तळमळ देवाजवळ व्यक्त करतात. ते प्रापंचिक समस्यांनी त्रस्त झाले होते. देव दूर नाही, हे समजूनही त्याच्या जवळ जाता येत नाही, याची रुखरुख त्यांना लागून राहिली होती. देवाजवळ जाण्यातील (कार्यसिद्धीतील) कोणत्या अडकाठ्यांना सामोरे जावे लागत आहे, त्याचा उल्लेख तुकोबाराय करतात. कार्यसिद्धीसाठी धीर न सोडता प्रतीक्षा करावी लागते. तथापि, ‘प्रतिक्षा’ हा शेवटचा भाग माणसाची परीक्षा पाहणारा असतो. या स्थितीत नैराश्य, अगतिकता, तीव्र चिंता मन व्यापून टाकते. सत्संग आदीतून ईश्वराची सन्निधता उमगते खरी, पण अनेक प्रापंचिक कारणांमुळे पदरी आलेली व्यग्रता, झडझडून साधन करण्यासाठी उसंत किंवा निवांतपणा लाभू देत नाही. संसारात आल्यानंतर जोडले जाणारे देहसंबंधी, विविध विषय, प्रलोभने, मोह, ममता वगैरेंची सत्ता माणसावर प्रस्थापित झालेली असते. त्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करताना मनुष्याने आपली सारी शक्ती आणि बुद्धी पणाला लावलेली असते. परंतु, जितका यत्न करावा, तितका गुंता वाढतच जातो. या गुंतागुंतीत अडकण्याचे एकमेव कारण म्हणजे अनेकांच्या सत्तेमुळे आलेली पराधीनता आणि त्यातून आचरावी लागणारी नाना प्रकारची कर्मे. ‘कर्मा बळिवंता सापडलो’ यातून असाही अर्थ दाखविला जात आहे की, संसारातील हा गुंता केवळ ‘अवश्यमेव भोक्तव्यं’ असलेल्या अनिवार्य ( - बळिवंत) प्रारब्धाचा ( - उग्र कर्मांचा) परिपाक असतो. तिथे मनुष्याचे बळ-बुद्धी तोकडी पडते. त्यामुळे सारे जीवन निरुत्साही होते, निरुपाय झाल्यासारखे वाटते. अभंगाच्या पहिल्या चरणात तुकोबारायांनी ही स्थिती स्पष्ट केली आहे.
बाह्य परिस्थितीने केलेली गांजवणूक निवेदन केल्यानंतर पुढील चरणात तुकोबाराय मनाची असमर्थता व चित्तातील हानीकारक धारणा, तसेच त्यातून वाट्यास येणारे नुकसान सांगतात. प्रारब्धवशात् वाट्यास आलेल्या क्लेषांच्या जोडीला चुकीच्या विचारांतून मनावरील भार वाढतच राहतो (बहु भार पडियेला शिरीं). इथे हे लक्षात घ्यावे लागते की, मनाने सारा देह व्यापलेला असतो. देहाच्या नखशिखांत अंतर्बाह्य भागातील संवेदनांचे वहन करणे, हे मनाचे काम असते. या संवेदनांचे ग्रहण मस्तकात होत असते. त्यातून बुद्धिद्वारे विचार स्फुरत असतात. म्हणून मस्तक ( - शिर) हे विचारांचे स्थान आहे. बुद्धी निर्णयात्मक कार्य करते. त्यातून धारणा तयार होतात् व त्या चित्तात साठविल्या जातात. चित्तातील चुकीच्या धारणा नंतरचे विचार मलिन करतात. ‘मी (अहंता), हे माझे, माझ्यावर (ममता)’ वगैरे धारणा ऐहिक पातळीवरच्या आणि स्वार्थकेंद्रित असल्याने त्या माणसाला गर्व, हेवा, तिरस्कार, ईर्षा, लोभ-मोहादी विकारात अडकवित जातात. यातून भाग्यवशात् स्थावर-जंगम संपत्तीचा संचय होईलही, पण उपभोगाची लालसा वाढत राहते. दुसरी गोष्ट ही की, हा संचय स्वार्थाकरिता जेव्हा मनुष्य वापरत राहतो, तेव्हा सत्कर्माला तीलांजली दिली जाते. स्वार्थी वृत्तीमुळे कुणी पाठीशी उभा राहणारा नसतो. पुन्हा या संचयाला नाशाची, चोरीची अखंड भीती असतेच. त्याप्रसंगी होणारे दुःख असीम असते. उपभोगांचे साधन असलेला हा संचय म्हणूनच अंतःकरणावर विचारांचे ओझे वाढवत राहतो. चित्त निर्मळ राहत नाही. असले ओझे हा परमार्थ साधनेतील सर्वात मोठा अडथळा ठरतो. प्रारब्धवशात् जे वाट्यास आले, त्यात न गुंतता, खर्‍या स्वार्थाचा, म्हणजेच परमार्थाचा, स्थिर विचार अंतःकरण शांत ठेवणारा असतो. परंतु, सामान्यतः मनुष्य, जाणून किंवा बुजून, स्वार्थाला बळी पडतो, ज्यामुळे तो असहाय्य होतो व परमार्थाला पारखा होतो. ‘दैव देतं नि कर्म नेतं’ या उक्तीप्रमाणे भाग्यवशात् नरदेहाच्या प्राप्तीद्वारे ईश्वराच्या सान्निध्यातून मिळणारा आनंदाचा ठेवा, लोभ-मोहादी चोर हिसकावून नेतात. त्यांनी केलेल्या या दारुण चोरीचे वर्णन करताना मुमुक्षुत्व प्राप्त झालेले तुकोबाराय म्हणतात की, ‘माझ्या असहाय्यतेचा फायदा घेऊन, कोणतेही निर्वाहाचे साधन मागे न ठेवता सारे काही ( - घरच्या घर,) दिवसाढवळ्या ( - उघड्या) माझ्या डोळ्यांदेखत (जाणतजाणता) चोरीला गेले असल्याने मी खंक झालो आहे, नागविला गेलो आहे’. 
किंकर्तव्यमूढ, निरुपाय झालेल्या तुकोबारायांना संतच आपल्याला या स्थितीतून सोडवू शकतात, या विश्वास आहे. या अवस्थेत जीवाला एकच मार्ग राहतो, तो प्रार्थनेचा. कठिण अवस्थेत केलेल्या प्रार्थनेत आर्तता ठासून भरलेली असते, आणि म्हणूनच त्या प्रार्थनेच्या शब्दाशब्दात असामान्य शक्ती भरलेली असते. तुकोबाराय त्याच अगतिकतेने देवाला ‘इतुले’, म्हणजे फार मोठे नसलेले, त्यांचे ते मागणे पूर्ण करणे देवाला अडचणीत टाकणारे नसलेले असे, मागणे मागतात. ‘या मज’ या शब्दातून त्यांनी त्यांची दयनीय अवस्था, जी अगोदर वर्णिली आहे, तिचा संदर्भ दिला आहे. तर, ‘आता’ या शब्दाने आपली चूक कळून आल्याचा, निरुपाय झाल्याचा, त्याबद्दल पश्चात्तापदग्ध झाल्याचा, तसेच देवाच्या सहाय्याची अत्यंत आवश्यकता असल्याचा भाव व्यक्त होत आहे. असे असले तरी काहीही करून देवाने आपल्यावर आलेल्या दयनीय अवस्थेतून तत्काल बाहेर काढावे, अशी तुकोबाराय मागणी करीत नाही. ते इतकीच विनंती करतात की, देवाने त्यांची संतांशी भेट घडवून देण्याची व्यवस्था करावी, त्यांना संतांच्या स्वाधीन करावे. यासाठी देवच एकमेव विश्वासू मार्गदर्शक असल्याचे तुकोबाराय मानत आहेत. ते देवाला ही गळ का घालत आहेत, याचे कारण ते सांगतात, ‘झाला कंठस्फोट आळवितां’. ते देवाला आळवित आहेत, मग इथे साहजिकच प्रश्न पडतो की, त्यांनी जी व्यर्थ घसाफोड करून घेतली, ती कुणासाठी? विचार करताना लक्षात येते की, आपत्तीतून सुटका होण्यासाठी स्वाभाविकपणे त्यांनी अनेकांपुढे आपले दुःख मांडून सुटकेसाठी गळ घातलेली असणार. इतर लोक जे जे प्रयत्न करतात, त्यात नवस करणे, निरनिराळ्या क्षुद्र दैवतांना साकडे घालणे, मंत्र-तंत्र, उतारे वगैरे रूढ असलेले मार्ग त्यांनी अवलंबिलेले असतील, कुणी जे जे सुचवावे, ते ते त्यांनी केले असेल. सामान्य जन जे प्रकार करतात, ते तुकोबारायांनीही केले असतील. अंती त्यांनी हे जाणले असणार की, दैवाला फिरवणे किंवा प्रारब्ध बदलणे, हे कुठल्याही क्षुद्र दैवताला, ग्रहमान जाणणार्‍या ज्योतिषाला, मंत्र-तंत्र सांगणार्‍या बुवा-भगत यांना शक्य नाही. हे उपाय म्हणजे वांझेला पुत्र होण्याची अपेक्षा करीत बसावे, तसे ठरणारे आहे व निष्फळ प्रयत्नांचाच तो एक भाग आहे. कृतकर्म टाळणे कुणालाही शक्य होणारे नाही. उर्वरित आयुष्य सुसह्य होण्यासाठी तुकोबारायांना आशेचा एकमात्र किरण दिसत आहे आणि तो म्हणजे संतांचे मार्गदर्शन. त्याची मागणी तुकोबाराय देवाकडे करतात. तथापि, तुकोबारायांच्या मनात अशी एक शंका आहे की, आपल्याकडून झालेल्या चुका, आपण आंधळेपणाने अवलंबिलेले उपाय, आपले अज्ञान यांमुळे देव कदाचित आपल्या मागणीकडे लक्ष देणार नाही. त्यासाठी ते देवाला विनवतात की, ‘उदास आतां न करावें’. देवाने त्याची उदारता दाखवावी, आपली मागणी पुरविण्यासाठी केवळ उदासीनभाव धरू नये, त्याने साक्षीभावाने पाहू नये, तर आपले सारे अपराध पोटात घेऊन दया दाखवावी व आपली मागणी देवाने पूर्ण करावी, असा भाव येथे व्यक्त होत आहे.
आपला आयुष्यकाल किती आहे, हे कोणताही जीव जाणत नाही. केवळ वर्तमान क्षण हाच खरा. सर्व शास्त्रांनी देहाला क्षणभंगुर म्हटलेले आहे. म्हणूनच अत्यल्प आयुष्य हाताशी असण्याची शक्यता गृहित धरावी लागते. मनुष्याचे कर्तव्य आहे की, परमार्थ साधताना मिळालेला प्रत्येक क्षण हाच कदाचित् शेवटचा क्षण आहे, असे समजून साधनाची तीव्रता वाढवायची. थोडक्यात, देह आणि त्याला लाभलेले आयुष्य हे परमार्थासाठी अतिशय महत्वाचे आहे. तथापि, या दोन्हीही गोष्टी आपल्या हाती नाहीत, जीव त्याबाबत परावलंबी आहे. शारीरिक आणि मानसिक क्लेषांनी तुकोबारायांचा देह पिचल्यागत अवस्था झाली आहे. आयुष्याचा अंत जवळ आल्याची भावना त्यांच्या मनात डोकावत आहे. किंकर्तव्यमूढ अवस्था झाली आहे... काय करावे, ते सुचत नाही. अशा अवस्थेत त्यांच्या अंतःकरणातील भीती ते देवासमोर व्यक्त करतात की, आयुष्याचा सूर्य मावळला की मग अंधार पसरणार आहे ( - छाय). पुढील जन्माविषयीचे पूर्ण अज्ञान आहे. या नरदेहाचा शेवट झाल्यानंतर परत पुन्हा नरजन्म येण्यासाठी  महारात्रीचा अंधःकार (अज्ञानाने व्याप्त असलेल्या योनींतील जीवन) भोगण्याचे दुःख अनिवार्य होणार आहे ( - उरईल हाय).
मनुष्याच्या सरत्या आयुष्यकालातील दुसरी चिंता पुढे तुकोबाराय प्रकट करतात. खरे म्हणजे, प्राप्त झालेल्या आयुष्यात मनुष्याने लौकरात लौकर आत्मकल्याण साधून घेणे, हेच त्याच्या हिताचे असते. स्वहिताबद्दल जो उदासीन राहतो, त्याच्या आयुष्याच्या अखेरीस देवाचे नाव, त्याच्या विषयीचा कृतार्थ भाव, नरदेहाला येऊन कृतकृत्य झाल्याचे समाधान त्याला लाभत नाही. अशा परिस्थितीत कृतकर्माचा भाग जीवावर सत्ता गाजवितो. संचिताच्या सत्तेपुढे जीवाचा कोणताही उपाय चालत नाही आणि केवळ प्रारब्धात जे वाढून ठेवले आहे, तेच भोगणे प्राप्त होते. त्याबाबत जीवाची संपूर्ण पराधीनता असते. या पराधीनतेपासून तसेच त्या पराधीनतेतून पदरात पडणा‍र्‍या हालअपेष्टांपासून बचाव करण्यासाठी ( - लपतां) कोणतीही जागा ( - ठाव) दिसत नाही. प्रारब्ध-कर्मकचाट्यातून सुटणे जीवाला संपूर्णतः अशक्य असल्यामुळे त्याला पाठमोरे होता येत नाही, सामोरे जावेच लागते. कर्मकचाट्यात जो सापडतो, त्याला आत्मकल्याण साधून घेणे कर्मकठीण होऊन बसते. तुकोबारायांच्या अंतःकरणाला ग्रासणारी ही दुसरी मोठी चिंता ते देवापुढे व्यक्त करतात.
नानाविध जीवयोनींमध्ये स्वस्वरूपाची प्राप्ती करून घेण्यासाठी नरदेहाची प्राप्ती ही एकमेव संधी भगवत्कृपेने प्राप्त झालेली असते. ही संधी साधून न घेतल्यास अनेक संकटपरंपरांना अनंत काळ पर्यंत सामोरे जावे लागते. संसाराचे यथार्थ स्वरूप न जाणल्याने प्रवाहप्रतित जिणे जगताना जीव मेटाकुटीला येतो. संचिताचा फेरा आणि भविष्याविषयीचे अज्ञान यांच्या कात्रीत सापडल्यानंतर माणसाला भगवंताशिवाय अन्य कुणी शरण्य असू शकत नाही. तुकोबाराय अभंगाचा शेवट करताना ते भगवंताचा धावा करतात की, ‘ तू कृपेचा सागर आहेस... माझी योग्यायोग्यता न पाहता नि क्षणाचाही विलंब न करता धावत ये आणि माझी मागणी पुरव... मला संतांच्या स्वाधीन कर.’ तुकोबाराय देवाला त्याच्या सामर्थ्याचा अप्रत्यक्षरित्या हवाला देताना कबूल करतात की, आयुष्यात कार्यसिद्धीसाठी मी माझ्या बळ-बुद्धीवर व्यर्थ विश्वास ठेवला. आता जे काही आयुष्य हाती राहिलेले आहे, त्याचा यथार्थ उपयोग मला करावयाचा आहे. तुझे पाय लाभणे, तुझे सान्निध्य लाभणे, हीच एकमेव सिद्धी आहे, तीच कृतकृत्यता आहे, हे एकच मी जाणतो. त्यासाठी मला तुझ्या कृपायुक्त सहाय्याची नितांत आवश्यकता आहे.
(क्रमशः) 

संपर्क : (डॉ. रामपूरकर : ०९८२०३७६१७५)