नाटाचे अभंग... भाग २०

१९. सुख या संतसमागमें । नित्य दुणावे तुझिया नामें ।
 दहन होती सकळ कर्में । सर्वकाळ प्रेमें डुल्लतसों ॥१॥
 म्हणोनि नाहीं कांहीं चिंता । तूंचि आमुचा मातापिता ।
 बहिणी बंधु आणि चुलता । आणिकां गोतां सर्वांठायीं ॥धृ॥
 ऐसा हा कळला निर्धार । माझा तुज न पडे विसर ।
 अससी देऊनियां धीर । बाह्य अभ्यंतर मजजवळी ॥३॥
 दुःख तें कैसें नये स्वप्नासी । भुक्तिमुक्ति झाल्या कामारी दासी ।
 त्यांचे वर्म तूं आम्हांपाशीं । सुखें राहीलासी प्रेमाचिया ॥४॥
 जेथें तुझ्या कीर्तनाचा घोष । जळती पापें पळती दोष ।
 काय तें उणें आम्हां आनंदास । सेवूं ब्रह्मरस तुका म्हणे ॥५॥

तुकोबारायांना उच्च कोटीची आत्मानुभूती आली. तिचे वर्णन शब्दाने करता येण्यासारखे नसले तरी आनंदाचा असा स्वभाव आहे की, तो प्राप्त झाल्यानंतर उचंबळून आल्याशिवाय राहत नाही. कृष्णमेघ पाहून मोराला भरते यावे, त्याने नृत्य सुरू करावे, तसे अंतःकरणातील तीव्र तरंग कितीही आवरण्याचा प्रयत्न केला तरी ते बाहेर येतातच. आनंदाच्या ऊर्मींचे तसेच आहे (अंतरींचें धांवें स्वभाव बाहेरी । धरितांही परि आवरेना ॥). तुकोबारायांना जी अनुभूती आली, ती मग त्यांना शब्दांनी वर्णन करणे अनावर झाले. तुकोबारायांना आलेला आत्मानुभूतीचा आनंद हा विलक्षण  आहे, कारण परिस्थितीने त्यांचा अनन्वित छळ करून त्यांना अपरिमित दुःख भोगावयास लावल्यानंतरचा हा आनंद आहे. म्हणूनच त्या आनंदाने त्यांना आलेले भरते अनावर व्हावे, यात नवल नाही. संसार हा केवळ दुःखमय असल्याची त्यांची भावना या आनंदाने मावळली. केवळ सुखस्वरूप असलेल्या परमात्म्याने निर्माण केलेला हा प्रपंच केवळ दुःखमय नसून परमोच्च कोटीचा आनंद या प्रपंचात राहूनही मिळू शकतो, हे आता त्यांनी अनुभवले आहे. अनेक जन्मांचे सुकृत उदयाला येऊन त्यावर प्रभुकृपेचे सिंचन झाल्यामुळे तुकोबारायांची संतांशी भेट घडून आली. त्यातून त्यांना जो अलभ्य लाभ झाला, त्यामुळे त्यांना संतांची महती कळली. मग संतांचा समागम नित्य घडावा, असे त्यांना वाटू लागले. संतसमागमुळेच एखादा चमत्कार व्हावा, तद्वत् त्यांना आत्मसुखाचे दर्शन झाले. एव्हढेच नव्हे तर ते दर्शन पुनःपुन्हा व्हावे, ते निरंतर लाभावे अशी स्वाभाविक इच्छा त्यांच्या अंतःकरणात निर्माण झाली. त्यातून आपल्याला लाभलेले समाधान देवासमोर व्यक्त करणारे निवेदन तुकोबारायांच्या मुखातून प्रकट झाले.
तुकोबाराय अभंगाच्या प्रारंभीच संतांचे उपकार व्यक्त करतात. केवळ संतांची भेट झाल्याने सुख लाभत नाही. त्यांच्या समागमात ते सुख आहे. समागम झाल्याशिवाय व्यक्तीची ओळख होत नाही. केवळ चेहरा पाहून, नजरेतून आकर्षण निर्माण होईल, परंतु समागमाशिवाय अंतःकरणाची, त्या व्यक्तीच्या ज्ञानाची ओळख होत असते. दुसरी गोष्ट अशी की, लागलेली तहान, जिज्ञासा तृप्त होणे आवश्यक असते. तेव्हाच संग प्रस्थापित होत असतो. संगातून समागम संभवतो. पहा, समागम या शब्दात आगम हा शब्द जोडला गेला आहे. आगम म्हणजे ज्ञान-विद्या. ज्या संगातून ज्ञानाचा, विद्येचा लाभ होतो, तेव्हा समागम होत असतो. अन्यथा ते केवळ सख्य या सदरात मोडेल (समानशीले सख्यम्). म्हणून तुकोबाराय येथे स्पष्ट करीत आहेत की, संतांशी होणार्‍या समागमात सुख आहे. पुढे ते सांगतात की, हे सुख संसारातील इतर सुखांसारखे क्षणिक नाही, वीट आणणारे नाही. सकाळ-सायंकाळ भरपेट आईस्क्रीम खायला मिळाले, तर दुसर्‍या दिवशी ते नकोसे वाटू लागते. प्रपंचात मिळणार्‍या एकाच प्रकारच्या भोगाचा अल्प काळात तिटकारा निर्माण होत असतो. संत समागमातील सुखाचा विशेष गुण तुकोबाराय येथे सांगत आहेत की, ते नित्य वर्धमान होणारे आहे. या सुखाची गोडी अविट आहे. संताच्या सहवासात त्यांनी सांगितलेल्या हिताच्या गोष्टी ऐकून तहान शमविली जाते. अडचणींतून किंवा संकटातून बाहेर पडण्याचा साधा सोपा मार्ग (नामसाधन) ते सांगतात. त्यामुळे मनाचा भार कमी करून मनाची शांती ते प्रदान करतात. त्याचबरोबर संत ज्या भावाने, ज्या प्रेमाने, ज्या कळवळ्याने ईश्वराचे नामस्मरण करतात व करावयास सांगतात, त्यामुळे समागमातून मिळणारे सुख दुणावत राहते. अशा या संतसमागमाने सर्व कर्मांचे दहन होते, असे तुकोबाराय सांगतात. केलेल्या चांगल्या वा वाईट कर्मांच्या परिणामस्वरूपाने येणारे भोग भोगावेच लागतात, त्यातून सुटका नसते, असे खरे तर शास्त्रवचन आहे (अवश्यमेव भोक्तव्यं कृतकर्म शुभाशुभम्). इथे जर कर्मे घडून गेलेली असतात, तर मग त्यांचे दहन कसे संभवते, हा प्रश्न उभा राहतो. जोपर्यंत केलेल्या कर्मांचे फळ भोगलेले नाही, तोपर्यंत त्या कर्मांचे अस्तित्व संपत नसते. परंतु, संतसान्निध्याने व ईश्वरनामाच्या प्रभावाने त्या कर्मांचे परिणाम संपतात किंवा ते परिणाम दुःखदायक राहत नाहीत. कित्येक गुन्हेगार सत्प्रवृत्त होऊन स्वतःहून कायदेशीर कारवाईला सामोरा जातो. अग्निचा स्पर्श हा पावन करणारा, शुद्धत्व देणारा असतो, म्हणून अग्निला पावक म्हणतात. ईश्वराचे नाम असेच पावक आहे. ते नामधारकाला उपरती, शुद्धत्व देणारे आहे. अग्नीच्या संपर्कात येताच गवताच्या राशींची राख होते, त्याचप्रमाणे ‘हरि उच्चारणी अनंत पापराशी । जातील लयासी क्षणमात्रें’ असे श्रीज्ञानेश्वरमाउलीही त्यांच्या हरिपाठात सांगतात. तुकोबारायांच्या येथील कथनामागील भाव असाच आहे. दुणावलेले सुख आणि कर्मभोगांपासून निर्भय झालेले तुकोबारायांचे मन संताविषयीच्या तसेच भगवन्नामाच्या प्रेमाने उचंबळून आलेले आहे. त्यात ते समरस झाल्याने उत्स्फूर्तपणे डोलत आहेत. त्यांच्या मनाचे उचंबळणे आणि त्या नामनादात डोलणे सर्वकाळ चालत असल्याचे तुकोबाराय सांगत आहेत. 
संतसमागमातून लाभलेल्या अनुपम सुखामुळे मनात चिंतेचा लवलेश उरलेला नाही, असे तुकोबाराय पुढे निवेदन करतात. त्यांच्या चिंतेचे समूळ उच्चाटन झाले. ‘म्हणोनि’ या प्रथम योजलेल्या पदाद्वारे ते त्यांच्या चिंतानाशाचे मुख्य कारण सांगतात की, जे चिंतेचे निवारण करणारे तसेच चिंतेचे कारण असलेले असे जवळचे नातलग, मातापिता, बहिणी, भाऊ, चुलते आदी आहेत, त्या लौकिक नातेबंधातून ते आता मुक्त झाले असून केवळ विठ्ठलातच सारी नाती एकवटलेली आहेत. एवढेच नव्हे तर ( - आणिकां) इतर देहसंबंधी ( - गोतां) जे कुणी आहेत, ती सारी नाती-गोती विठ्ठलाशी जोडली गेली आहेत. तुकोबारायांच्या या सांगण्याचा असाही भाव आहे की, ही सारी नातीगोती अशी आहेत की,  अडचणीच्या प्रसंगानुरूप जमेल तितकीच मदत करणारी ती असतात. संपूर्णतः आपल्याला चिंतामुक्त करण्यास या नात्यागोत्यातील कुणीही समर्थ नसतो. त्यासाठी केवळ आणि केवळ विठ्ठल हाच समर्थस्वामी आहे. इथे असेही दर्शविले जात आहे की, आतापर्यंत आपण वातापितादींना केवळ आपल्याशी असलेल्या लौकिक नात्यानेच स्मरत होतो, पण या सर्वांठायी हा विठ्ठलच प्रत्ययास येऊ लागला आहे. त्यामुळे ती आता तुकोबारायांच्या  चिंतेचे कारण राहिलेली नाहीत.
पुढे तुकोबाराय सांगतात की, संतसमागमामध्ये त्यांना एक तत्त्व निश्चितपणे कळले आहे की, एकदा ईश्वराने अंगिकार केला की तो जीवाचा परित्याग करीत नाही आणि हा त्या ईश्वराचा निर्धार असतो. मनाच्या व्यग्रतेमुळे म्हणा किंवा कुठल्या बाह्य कारणाने म्हणा, आपल्याला जरी भगवंताचा विसर पडला तरी आपला अंगिकार केल्यानंतर विठ्ठलाला कधीच आपला विसर पडत नाही. प्रापंचिक असो वा पारमार्थिक असो, कुठल्याही प्रसंगी प्रत्येक क्षणी धीर देत हा विठ्ठल आता तुकोबारायांच्या अंतःकरणात प्रकट रूपाने राहिला आहे.
तुकोबाराय त्यांची इष्टानुभूती अशा प्रकारे निवेदन करतात की, त्यातून त्यांच्या उपास्याला समाधान वाटेल आणि बरोबरीच्या साधक- सवंगड्यांनाही यातील वर्म अवगत होईल. जेव्हा अंतःकरणात देवाविषयीचा ठाम प्रेमभाव निर्माण होतो, तेव्हा देवाला सुख वाटू लागते आणि तो निरंतर आपल्या हृदयात सुखाने निवास करू लागतो. तो आता साक्षी राहात नाही, तर भक्ताची काळजी वाहणारा निकट-आप्त बनतो. एकदा देवाचा निकट सहवास लाभला की, कुठलेही दुःख स्वप्नातही अंतःकरणाला स्पर्शू शकत नाही. तुकोबाराय असेही सांगत आहेत की, देवाचा सहवास लाभणे, हे भुक्ती-मुक्ती आपल्या दासी होण्यामागचे वर्म आहे. भोगायतन असलेला देह ज्या ज्या भोगांची इच्छा करतो, ते ते भोग न भोगताही इंद्रिये तृप्त होतात ( - भुक्ती) आणि ईश्वराच्या सहवासामुळे दुःख हेच सुखरूप झाल्याने दुःखाची निवृत्ती ( - मुक्ती) आपसूकच होते.
ईश्वराच्या आंतरिक सहवासातून होणारे लाभ वर्णिल्यानंतर तुकोबाराय बाह्यरंगाने ईश्वरनामाच्या सहवासाचा महिमा स्पष्ट करतात. त्यांचे सांगणे आहे की, जेथे भगवंताचे कीर्तन-नामघोष होत असतो, तिथे ( त्यात सहभागी होणार्‍यांची) पापे भस्मसात् होतात, तसेच सर्व दोष दूर पळून जातात. पाप हे मनुष्याने जाणता-अजाणता केलेल्या दुष्कर्मांमुळे उभे राहिलेले असते, तर, खालच्या जातीत जन्माला येणे, ग्रहदशा, वास्तुदोष, अन्नदोष, व्याधी, दुस्संग, व्यसन वगैरे दोष परिस्थितीवश आलेले असतात. असे दोष निंदेला, हेयतेला कारण होणारे असतात. भगवन्नामाचा अंगिकार केल्याने पापकर्मातून मुक्त केले जाते आणि  सत्संगाचा परिणाम होऊन दोषांचे निराकारण झाल्याने साधक आदराला पात्र होतो. यातून मनाला अपार शांतीचा लाभ होतो. म्हणूनच तुकोबारायांचे अप्रत्यक्ष असे सांगणे आहे की, एकटे असा वा कुठेही असा, सर्वत्र भगवत्संकीर्तन आणि भगवन्नामघोष केला जावा. आपल्याला निखळ आनंद मिळण्यासाठी बाकी काही नको. जिथे संतसमागम लाभतो आणि कीर्तनाचा घोष असतो, तिथे साधकाला निःसंदिग्ध, निखळ, निरंतर वृद्धिंगत होणारा, शुद्ध असा जो आनंद प्राप्त होतो, त्या आनंदाला तुकोबाराय ब्रह्मरस संबोधतात. त्या ब्रह्मरसाचे नित्य सेवन आम्ही करू, अशी जणू काही प्रतिज्ञा तुकोबाराय अभंगाच्या समारोपात करतात.
(क्रमशः) 

संपर्क : (डॉ. रामपूरकर : ०९८२०३७६१७५)