नाटाचे अभंग... भाग २२

२१. देवा तूं आमचा कृपाळ । भक्तप्रतिपाळ दीनवत्सल ।
 माय तूं माउली स्नेहाळ । भार सकळ चालविसी ॥१॥
 तुज लागली सकळ चिंता । राखणें लागे वांकडें जातां ।
 पुढतीं निरविसी संतां । नव्हे विसंबतां धीर तुज ॥।धृ॥
 आम्हां भय चिंता नाहीं धाक । जन्ममरण कांहीं एक ।
 झाला इहलोकीं परलोक । आलें सकळिक वैकुंठ ॥३॥
 न कळे दिवस कीं राती । अखंड लागलीसे ज्योती ।
 आनंदलहरीची गती । वर्णूं मी किती तया सुखा ॥४॥
 तुझिया नामाचीं भूषणें । तोयें मज लेवविलीं लेणें ।
 तुका म्हणे तुझिया गुणें । काय तें उणें एक आम्हां ॥५॥

तुकोबारायांनी त्यांच्या अंतःकरणातील अनेकविध भाव, त्यांची करुणास्पद अंतर्बाह्य परिस्थिती, त्यांना होणारे क्लेष विविध प्रकारे देवासमोर प्रकट केले. प्राप्त परिस्थितीतून सहिसलामत त्वरेने बाहेर काढण्यासाठी त्यांनी देवाला आळविले. अत्यंत परखडपणे स्वतःचे दोष देवापुढे व्यक्त करून त्यांना झालेला पश्चात्ताप त्यांनी प्रकट केला. त्यांच्या हाकेला ओ देण्यासाठी देवाने केलेल्या उशीराबाबत त्यांनी देवाला कोणतेही दूषण न देता त्याच्या कृपेची आतुरतेने वाट पाहिली. त्यांनी देवाच्या प्रसन्नतेसाठी जे जे गुण गाईले, त्या त्या गुणांचा प्रत्यय त्यांना अखेरीस आला. देवाने त्याचे देवत्व सिद्ध केले आणि मग तुकोबारायांच्या आनंदाला पारावार राहिला नाही. त्यांना देवाच्या कृपाप्रसादाने मिळालेल्या अद्वितीय आनंदाचे जमेल तसे वर्णन करून तुकोबारायांनी या अभंगात देवाजवळ आपली कृतज्ञता व्यक्त केल्याचे दिसत आहे. सर्व शास्त्रे प्रतिपादन करतात की, एक ईश्वरच पूर्ण आहे. त्याला पूर्णज्ञानी, स्वतंत्र, व्यापक, मायाधीश अशा अनेक बिरुदावलींनी वर्णिले गेले आहे. या उलट जीव अपूर्ण, अल्पज्ञानी, अशक्त, मायाधीन, परतंत्र म्हणविला जातो. परंतु शास्त्र आणि संतवाङ्गमयाद्वारे असेही प्रतिपादन केले जाते की, अंश असणार्‍या जीवाला अंशीमध्ये सामावून घेणे म्हणजेच शिवत्व प्राप्त करून घेणे, ते कष्टसाध्य असले तरी, शक्य होणारे आहे. तुकोबारायांना या अवस्थेची अनुभूती आली. यामागील कर्तृत्व निःसंशयपणे देवाचेच असल्याचे तुकोबाराय मान्य करतात, जेणे करून त्यांच्या निवेदनाला अहंकाराचा वारा लागत नाही आणि वासही येत नाही. प्राप्त झालेली आपली अवस्था देवापुढे प्रकट करण्यामध्ये तुकोबारायांची अशी भावना आहे की, देव हा सर्वज्ञ असून त्याच्यापासून कुठलीही गोष्ट लपून राहात नाही. आपल्या मनातील भावभावना तो जाणत आहेच. तरीही आपण व्यक्त केलेल्या कृतज्ञतेमुळे देवाला निश्चितपणे समाधान लाभेल; निदान कौतुक म्हणून तरी देव त्याकडे पाहील, असा तुकोबारायांचा भाव आहे. आपल्यावर कुणी केलेल्या उपकाराबद्दल कृतज्ञता व्यक्त केल्यास उपकार करणार्‍याला कदाचित् संकोच वाटेल, परंतु आपल्या अंतःकरणास मात्र समाधान मिळत असते, हा आपला सामान्य अनुभव आहे. या अभंगात तोच उतराईचा भाव व्यक्त होत आहे.
अभंगाच्या प्रथम चरणात तुकोबाराय देवाचे गुण, ज्यांचा त्यांना प्रत्यक्ष अनुभव मिळाला, त्यांचे वर्णन करताना ‘आमचा कृपाळ’ म्हणतात. येथे ‘आमचा’ हे पद अर्थातच स्वतःबद्दलचा आदर व्यक्त करणारे नसून ते समूहवाचक आहे. त्या पदाची व्याप्ती भक्तजन, दीन आणि अज्ञ-दुर्बळ अशा भाविकांचा समूह दाखविते. देव ‘कृपाळ’, म्हणजे कृपा करणे हा ज्याचा सहज स्वभाव आहे, असा आहे. साधन करून, काहीसे शास्त्रज्ञान प्राप्त करून घेऊन जे देवाला शरण गेले आहेत, ज्यांनी देवाशी त्याप्रकारे संबंध प्रस्थापित करून घेतला आहे, त्यांच्यावर सहजपणे कृपा करणारा हा देव आहे. हा देव ‘भक्तप्रतिपाळ’ आहे. जे विभक्त नाहीत, ते भक्त. देवाविषयीचा अनन्य भाव ज्यांच्या मनात रुजलेला आहे, त्यांचा प्रतिपाळ करणारा देव आहे. जे दीन आहेत, परिस्थितीने गांजून असहाय्य झालेले आहेत, ज्यांना कुणीही वाली राहिलेला नाही आणि जे देवाकडे शेवटचा एकमेव आधार म्हणून पाहत आहेत, त्या दीनांबद्दल अपार वत्सलता देवापाशी आहे. वास्तविक पाहता, सारेच जीव ईश्वराची लेकरे आहेत. त्यांच्याबद्दल अपत्यभाव देवाच्या हृदयात स्वाभाविकपणे आहेच. तथापि, दंभ-अभिमान पूर्णतः त्या जीवांच्या मनातून नष्ट झालेला नसेल, तर देव  अपत्यभाव प्रकट करीत नाही. म्हणून देवाची वत्सलता अनुभवायची असेल तर निरभिमानी होऊन, अहंकाराचा त्याग करूनच ती अनुभूती घेता येणे शक्य होते. पुढे तुकोबाराय देवाचे वर्णन ‘माय तूं माउली स्नेहाळ’ असे करीत आहेत. जी जन्म देते ती माय आणि जी निरपेक्ष माया करते, अशी कोणीही स्त्री ती माउली. जन्मदात्री (माय) आपल्या अपत्यावर जे प्रेम करते, ते निर्व्याज, निरपेक्ष असते. ‘कुपुत्रो जायेत् क्वचिदपि कुमाता न भवति’ असे आद्यशंकराचार्यांनी वर्णन केलेले आहे. मुलगा एकवेळ कृतघ्न होईल, पण आईला कुमाता होताच येत नाही. दुसरा भाग माउलीच्या स्वभावाचा. स्त्रीला निसर्गतःच वात्सल्याचे त्याचबरोबर स्नेहाचे वरदान मिळालेले आहे. तळतळून रडणारे कुणीही बालक पहिले की जिचा वात्सल्ययुक्त स्नेह जागृत होणार नाही, अशी स्त्री दुर्मिळ. इथे एक गोष्ट लक्षात येते की, आईच्या प्रेमाला काळ व अवस्थेची सापेक्षता असते. बालक जसजसे मोठे होईल, तसतसे आईच्या मायेचे स्वरूप अव्यक्त होत जाते. देवाच्या बाबतीत असे घडत नाही. भक्त-दीन-अज्ञानी-दुबळ्यांसाठी देव सापेक्षता दाखवित नाही. अंश-अंशी संबंधामुळे देव प्रत्येक अजाण जीवाची माय आहेच आणि असहाय्य शरणागतासाठी देव माउलीही आहे. अशा प्रकारे तुकोबाराय देवाच्या ठिकाणी जीवाच्या विषयी असलेल्या कृपा, प्रतिपालन, वत्सलता, स्नेह या गुणांचे वर्णन करतात. असा हा गुणवंत देव सार्‍यांचाच ‘भार चालवतो’, असे तुकोबाराय पुढे सांगतात. ते ‘भार वाहतो’ असे म्हणत नाही. त्यामुळे ‘भार’ या शब्दाने इथे ‘ओझे’ असा अर्थ न घेता, जे देवाला शरण गेले, त्यांचा ‘समुदाय’ हा एक अर्थ व अशा सार्‍या जणांचा, प्रापंचिक असो वा पारमार्थिक, ‘चरितार्थ’ असा अर्थ एकत्रितपणे ‘भार’ या शब्दातून दाखविला जात आहे. सार्‍या ( - सकळ) भक्त, दीन, अजाण, दुर्बल शरणागतांचा चरितार्थ देव चालवितो, असे तुकोबाराय सांगत आहेत. श्रीमद् ‍भगवद्‍गीतेच्या नवव्या अध्यायात राजगुह्य सांगताना भगवंतानीही ‘अनन्याश्चिन्तयन्तो माम् ये जनाः पर्युपासते । तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम् ॥ (जे अनन्यनिष्ठ लोक माझे चिंतन करून मला भजतात, त्या नित्य माझ्याशी जोडल्या गेलेल्या जनांचा योगक्षेम मी वाहतो) असे वचन दिलेले आहे.
भक्तादींचा चरितार्थ देव कसा चालवितो, याचे स्पष्टीकरण तुकोबाराय पुढे देतात. जे भगवंताशी भजन-कीर्तन-चिंतनाच्या योगे नित्य जोडले गेले आहेत, त्या सार्‍यांची चिंता देवाला लागून राहिलेली असते. बालकाची तहानभूक, स्वास्थ्य, रक्षण याकडे त्याची आई डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवते. तिला त्यात स्वतःकडे पाहण्याची फुरसद नसते, किंबहुना तिला स्वतःचे भान नसते. भक्तादींची माय-माउली असलेल्या देवाची तीच गत असल्याचे तुकोबाराय सांगतात. वास्तविकपणे तो त्रैलोक्यधिपती, लक्ष्मीकांत, स्वतंत्र व सर्वसामर्थ्यसंपन्न असल्यामुळे त्याला चिंता करण्याचे काहीच प्रयोजन नाही. तरीही आपल्या भक्तांना कोणत्याही चिंतेची आच लागू नये, म्हणून तो आपण स्वतःच त्यांची चिंता वाहत असतो (भक्तां राखी पाठीकडे । आपण कळीकाळासी भिडे ॥). देव केवळ चिंता वाहत नाही तर उपासना करताना अथवा साधन आचरताना भक्तांना विधिनिषेधाचे पालन यथार्थपणे करता आले नाही, तर त्याला सन्मार्गावर स्थिर ठेवण्याचे काम देवच करीत असतो. कबीर महाराज म्हणतात, ‘राम हमारा जप करें । हम बैठें आराम ॥. श्रुती-स्मृती आणि विधिनिषेध हे दोन नेत्र असतात, पण ते जाणत्यांच्या उपयोगाचे आहेत. जे नेणते आहेत, त्यांचे योग्य मार्गावरून स्खलन वा पतन होऊ नये, याची चिंता देव वाहतो. तुकोबाराय सांगतात, ‘नव्हे विसंबता धीर तुज’. भक्तांनी एकदा अनन्यशरणागती स्वीकारली, त्यांनी अनन्यपणे देवाचा आधार घेतला ( - विसंबता), की मग देव त्या भक्तांचा प्रतिपाळ करण्यासाठी अधिर होतो. तो त्यांची सारी व्यवस्था तत्परतेने करतो. ‘विसंबणे’ या शब्दाचा अर्थ ‘विसरणे’ असाही होतो. भक्त एकवेळ देवाला विसरेल, पण देव त्या भक्ताचे विस्मरण होऊ देत नाही. आपल्या उपासकाला अथवा भक्ताला विना-आश्रय देव कधीच राहू देत नाही, देव हे कसे साधतो, हे स्पष्ट करताना तुकोबाराय सांगतात की, देव भक्तांना संतांच्या स्वाधीन करतो. शंख-चक्र-गदा-पद्म घेतलेले देवाचे दिव्य रूप अंतःचक्षूंचा विषय असतो. प्रत्यक्ष व्यवहारासाठी मात्र तो नाना रूपातून प्रकट होतो व पाठीराखा बनतो. संत हे त्याचे असेच एक रूप असते. भक्ताला संतांकडे सोपविले की हा देव भक्तांविषयी निश्चिंत होतो. भक्तांना मिळणार्‍या आनंदात तोही निमग्न होऊन जातो.
मनुष्यदेह प्राप्त झाल्यानंतर अटळ अशा काही प्रसंगांना अथवा परिस्थितीला सामान्यपणे सामोरे जावेच लागते. त्यावाचून जीवनात काही पर्याय नसतो. तथापि, देवाने एकदा भक्ताला संतांच्या हवाली केले की, भक्ताला होणारा अलौकिक लाभ तुकोबाराय सांगतात. त्यांनी ‘भय, चिंता आणि धाक’ आम्हाला नसल्याचे म्हटले आहे. ‘भय’ भूतकाळाचे असते. जी कर्मे केली, त्यांच्या परिणामाने भोगाव्या लागणार्‍या संकटांचे भय माणसाला त्रस्त करीत असते. चिंता वर्तमानकाळातील घटनांमुळे मन पोखरत असते. धाक भविष्यकालाचा असतो. आपल्या हातून काही चुकीचे घडले तर नको ती परिस्थिती उद्‍भवेल, म्हणून मनात धाक बाळगून मनुष जीवन जगायचा प्रयत्न करीत असतो. सर्वात मोठे भय मृत्यूचे असते. तुकोबाराय म्हणतात, पुन्हा पुन्हा योनीऱ्योनीतील जन्मांतरे भोगत जन्ममृत्यूच्या चक्रात सापडणे आता संपलेले आहे. आम्हाला आता जन्मही नाही आणि मरणही नाही. त्यांचे हे म्हणणे सकृतदर्शनी बरोबर वाटत नाही, कारण जो जन्माला आला, त्याचे संपणे अटळ असते. तो निसर्गनियमच आहे. अगदी देवाच्या बाबतीतही ‘येथें नाहीं उरों आले अवतार’ असे तुकोबारायांचेच वचन आहे. ‘आम्हां जन्ममरण नाही’ असे जे म्हटले आहे त्याचा विचार करताना हे लक्षात घ्यावे लागते की, बोलताना आपण म्हणतो की ‘जीव गेला’. म्हणजेच जीव मरत नाही. जो जातो, त्याचे परतणे शक्य असते. मरतो तो देह. पतन देहाचे होते, जीवाचे नाही. ज्यांना ईश्वराचा साक्षात्कार झाला, त्यांची देहबुद्धी संपलेली असते. जीव शिवरूप झालेला असल्याने तो अविनाशित्वास पावलेला असतो. ‘बीज भाजून केली लाही’; मग ते बीज पुन्हा रुजत नाही.
भगवंताची संन्निधता लाभल्यामुळे देहाची होणारी गती सांगितल्यानंतर तुकोबाराय अंतःकरणात होत असलेला आमूलाग्र बदल वर्णन करतात. सामान्यतः माणसाला उपासनेतून स्वर्गलोक वा अपवर्गादी लोक (ब्रह्मलोक, सूर्यलोक वगैरे) प्राप्त होण्याची व तेथील सुखे उपभोगण्याची वांछा किंवा अभिलाषा असते. तुकोबाराय सांगतात, देवाचे सान्निध्य लाभल्यावर ती सारे सुखे इहलोकीच प्राप्त होतात. त्यासाठी दशदिशातून फिरण्याचे सायास करण्याची गरजच नाही. किंबहुना त्या सुखांपेक्षाही अनुपम सुख इथेच लाभत असते. जिथे सारी लौकिक सुखे खुंटीत होतात, ते वैकुण्ठ इथेच गवसते. इथेच वैकुण्ठ येते. ही सारी संतांची महती असते. तुकोबाराय अन्यत्र सांगतात, ‘प्रेम सुखाचिया राशी । पाप नाही ओखदासी ॥ तुका म्हणे त्यांनीं । केली वैकुण्ठ मेदिनी ॥’ वैकुण्ठ अवस्था लाभल्यामुळे तुकोबाराय सांगतात की काळाचे भान संपते. दिवस आहे का रात्र, हे समजत नाही. सूर्याच्या उगवण्या-मावळण्याचा तो परिणाम असतो. परंतु भगवंताशी तल्लीन झाल्याने अंतःकरणातील सूर्याचा उदय होतो. अंतःचक्षूंना मग केवळ दिव्य प्रकाश दिसू लागतो.  मग बाहेरचा प्रकाश असला काय नि नसला काय, काहीही फरक पडत नाही. हा प्रकाश एकदा दिसू लागला की, मनाचे धावणे संपते. सारे विचार कुंठित होतात. त्यांची जागा अनुपम आनंदाने घेतलेली असते. सागराच्या लाटा जशा एकामागून एक अविरत उसळत राहतात, त्याप्रमाणे आनंदलहरींची गती अंतःकरण सुखावून टाकत राहते. ते सुख शब्दातीत असल्याचे तुकोबाराय सांगतात.
प्रपंचात वावरत असताना अनुभलेली सुखाची क्षणिकता, भासमानता नि अनिश्चितता, एकामागून एक येणार्‍या प्रसंगातून अनुभवलेले दुःखाचे चटके, त्यातून प्राप्त होणारी असहायता, नैराश्य यांमुळे सर्वत्र अंधकार दिसत होता. आता सर्वत्र, अंतर्बाह्य दिव्य प्रकाश पसरलेला दिसत आहे, आनंदाच्या अविरत ऊर्मी सुखाचा वर्षाव करीत आहेत. अभंगाचा समारोप करताना या अलौकिक लाभाबद्दल आपली कृतज्ञता तुकोबाराय व्यक्त करतात. देवाची कीर्ती वर्णन करताना संतांनी निर्गुण निराकाराला सगुणात आणले. त्याला नाम-रूप दिले. जी जी नावे संतांनी देवाला दिली, ती ती सार्थ असल्याचा प्रत्यय तुकोबारायांना आलेला आहे. संतांनी कृपा केली आणि ती भूषणास्पद नामे मुखीं वसवली. ती नामरूपी लेणी लेवविली. त्यामुळे नरदेहाला आलेल्या तुकोबारायांचे जीवन अंतर्बाह्य शोभिवंत झाले. त्यांना वैकुण्ठावस्था त्यांना लाभली. देवाची सहस्त्रावधी नामेही त्याची कीर्ती यथार्थपणे वर्णावयास तोकडी पडतात. संतांनी देवभक्तांना लेवविलेले नामरूपी अलंकार व त्यामुळे भक्तांचे खुललेले स्वरूप पाहून देवाला समाधान वाटले नाही, तरच नवल. तुकोबाराय म्हणतात, तुझ्या भक्तप्रतिपाळ, दीनवत्सल, स्नेहाळ आदी नामाप्रमाणेच तुझे कर्तृत्व असल्याचा प्रत्यय आला आहे. तू आम्हाला निर्भय आणि परिपूर्ण केले आहेस. तुझ्या नामाच्या योगे तुझ्याशी जोडला गेल्यामुळे जीवांच्या ठिकाणी शाश्वत सुखाची जी उणीव भरून राहिलेली असते, तिचा यत्किंचितही स्पर्श आम्हास आता होत नाही.
(क्रमशः) 

संपर्क : (डॉ. रामपूरकर : ०९८२०३७६१७५)