तळे ... (४)

बऱ्याच दिवसांनी मला परत एकदा बदकीण आणि तिच्या पिलांची फौज दिसली.
मध्यंतरी बराच काळ बदकीणींची संख्या रोडावली होती. एक काळ तर असा होता की
जिकडे पाहावे तिकडे बदकचे बदके आणि त्यांची पिले. रस्त्यावरून वाहने
जाताना त्यांचा अडथळा होत होता. ही बदके आणि बदकीणी रस्ता चालणाऱ्यांचा
हक्क पहिला या नियमांचे अगदी बरोबर पालन करतात. त्यांना उडता येत असते तरी
पण रस्ता क्रॉस करताना मात्र ही दिमाखात डुलत डुलत जातात. वाहने थांबतात.
हॉर्न वाजवतात, तरी पण हे पठ्ठे लोक जागचे हालायला तयार होत नाहीत. तसे मी
पण बदकांना ब्रेड घालणे थांबवले आहे. बदकांना ब्रेड घालू नका असा फतवा
अपार्टमेंटच्या मॅनेजर बाईंनी काढलेला आहे. तरी पण अधूनमधून माझी तळ्यावर
चक्कर असतेच असते. बदकांची खबरबात घ्यायला जाते तेव्हा मला काही ना काही
वेगळे चित्र दिसतेच.

 

परवाच तळ्यावर गेले असताना मला लांबूनच
एक बदकीण व तिच्या पिलांची फौज दिसली.ही जी बदकीण होती तिलाही मी लहान
पिलू असताना पाहिलेले आहे. तळ्याकाठच्या गवतावरून चालत होती. त्यांच्या
अंघोळी होऊन थोडी विश्रांती घेण्याचा विचार असावा. हळूहळू करत ती पिले
बदकीणीच्या पंखाखाली सरकली. हे दृश्य खूपच सुंदर दिसले. ते मी माझ्या
कॅमेरातही टिपले. जेव्हा मला बदकीणी आणि त्यांची पिले दिसतात तेव्हा मी
रोजच्या रोज तळ्यावर चक्कर मारते. कारण की पिले लहान असतानाच खूप गोड
दिसतात. परवा तर इतका छान मुहूर्त जुळून आला की  पिलांच्या जवळ त्यांची आई
नव्हती. कुठेतरी गेली असेल फिरायला. पिले थोडी बावरलेली दिसत होती आणि
एकमेकांना बिलगून बसली होती. त्यांचा चिवचिवाट चालला होता. पिले खूपच गोड
दिसत होती.

अशीच एकदा पूर्वी तळ्यावर गेले असताना
बदकीण आणि तिची पिले तळ्याच्या काठावर बसून अंघोळी करत होती. तळ्यात
डुबक्या मारायच्या आणि चोचीने पंख साफ करायचे. त्यात एक पिलू असेच चोचीने
पंख साफ करत होते. ते साफ करताना त्याचा तोल जात होता. निरागस दिसत होते. आणि एक पिलू तर खडकावर बसून इकडे तिकडे पाहत मधूनच चोच पाण्यात बुडवत होते. त्याच्या पंखावर पाण्याचे थेंब छान दिसत होते. नंतर एकेक  करत पिले पाण्याने ओली होऊन पंख वाळवायला व चोचीने साफ क्ररायला बाहेर येत होती.

 

मला
जी आवडणारी बदके आहेत त्यांना पिले झालेली मी सहसा पाहिलेली नाहीत. असाच
एक योग जुळून आला आणि त्यांची पिले मला दिसली. तळ्यावरच्या एका खडकावर
बदकीण ऐटीत बसली होती आणि तिची पिले बाजूला पाण्यात डुबक्या मारून आनंद
घेत होती.

मला आवडणारी बदके यांच्या तळ्यात डुबक्या
मारतानाचा योगही एकदा असाच जुळून आला होता. दुपारची वेळ होती. आणि तळे तसे
शांत होते. इतर बदके दिसत नव्हती. मला जी आवडणारी बदके आहेत तीच होती आणि
ती पाण्यात छान पैकी डुबक्या मारत होती. ही बदके पाण्यात डोकी खूपसतात आणि
परत वर काढतात. ही बदके त्यांचे पंख फडफडवत नाहीत. याउलट दुसऱ्या प्रकारची
बदके आहेत ती चोची बुडवून वर काढतात आणि शिवाय त्यांचे पंख पाण्यात
फडफडवतात. सीगल्स पाण्यामध्ये डुंबताना पाहिले आहेत पण एक सीगल इतरांपेक्षा
खूप वेगळा होता आणि तो पाण्यामध्ये पंख बुडवून आणि चोची बुडवून मनमुराद
आनंद लूटत होता. कितीतरी वेळ!

या लेखात वर्णन केलेले सर्व ध्वनिचित्रफितींचे दुवे खालीलप्रमाणे.

क्रमशः ...

दुवा क्र. ८

दुवा क्र. १

दुवा क्र. २

दुवा क्र. ४

दुवा क्र. ५

दुवा क्र. ६

दुवा क्र. ७

दुवा क्र. १

दुवा क्र. २