नाटाचे अभंग... भाग २३

२२. आतां धर्माधर्मीं कांहीं उचित । माझें विचारावें हित ।
 तुज मी ठाउका पतित । शरणागत परि झालों ॥१॥
 येथें राया रंक एकी सरी । नाहीं भिन्नाभिन्न तुमच्या घरीं ।
 पावलों पाय भलत्या परी । मग बाहेरी न घालावें ॥धृ॥
 ऐसें हें चालत आलें मागें । नाहीं मी बोलत वाउगें ।
 आपुलिया पडिल्या प्रसंगें । कीर्ति हे जगें वाखाणिजेती ॥३॥
 घालोनियां माथां बैसलों भार । सांडिला लौकिक वेव्हार ।
 आधीं हें विचारीली थार । अविनाशपर पद ऐसें ॥४॥
 येथें एक वर्म पाहिजे धीर । परि म्यां लेखिलें असार ।
 देह हा नाशिवंत जाणार । धरिलें सार नाम तुझें ॥५॥
 केलीं आराणुक सकळां हातीं । धरावें तें धरिलें चित्तीं ।
 तुका म्हणे सांगितलें संतीं । देईं अंतीं ठाव मज देवा ॥६॥

प्रपंच करीत असताना एखादी गोष्ट हवी असेल तेव्हा माणूस अनेक खटपटी लटपटी करून जे हवे ते प्राप्त करून घेण्याचा आटोकाट प्रयत्न करतो खरा, परंतु त्याचे प्रयत्न नेहमीच सफल होतात असे नव्हे. किंबहुना बर्‍याच वेळा अपयश, निराशाच त्याच्या पदरी पडते. अनेक वेळा असे घडूनही माणूस प्रापंचिक हव्यास सोडत नाही. तुकोबाराय याला अपवाद नव्हते. सार्‍याच बाजूंनी आलेल्या अपयशाने निराश झाल्यावर त्यांना उपरती झाली. ते परमार्थाच्या मार्गी लागले. या मार्गातल्या अनुभवी व्यक्तींच्या संपर्कात ते प्रयत्नपूर्वक राहिले. कीर्तने ऐकली. त्यात गोडी निर्माण झाली. संतवचने त्यांनी कंठस्थ केली. कीर्तन चालू असताना मागे उभे राहून कीर्तनकारांची साथ दिली. ऐकलेल्या संतवचनांचे सतत चिंतन घडू लागले. प्रापंचिक विषय गौण वाटू लागले. त्यांच्या चित्ताला अपूर्व शांतता लाभू लागली. पूर्व सुकृताची अनुकूलता आणि ईश्वराची अकारण करुणा न कळत सहाय्यभूत झाल्याने त्यांच्या धारणा बदलल्या. अनेक संतांना जी पारमार्थिक प्राप्ती झाली, त्या मार्गाने जाता आपल्यालाही तशी प्राप्ती होईल, हा दृढ विश्वास त्यांच्या चित्तात रुजला. त्यांची ती तहान गतीने वृध्दिंगत होत गेली. विठ्ठलाच्या चरणांशी बसून आपल्या चित्तातली तळमळ वेळोवेळी त्यांनी काकुळतीला येऊन व्यक्त केली. त्यांचे असेच एक भावपूर्ण निवेदन या अभंगातून आपल्याला वाचावयास मिळते.
जीव हा सदासर्वदा अल्पज्ञ असल्याने धर्म किंवा अधर्म या बाबतचे विवेचन समजल्यानंतरही त्यामधील औचित्य अथवा अनुकरणीय सार जीव निश्चित करू शकत नाही. श्रीमद्‍ भगवद्गीतेच्या चौथ्या अध्यायात भगवंतांनी म्हटले आहे, ‘किं कर्म किमकर्मेति कवयोऽप्यत्र मोहिता:।’ कर्म, अकर्म, विकर्म याबाबत निस्संशयपणे निर्णय घेताना महाज्ञानीसुद्धा भ्रमित होत असतात. कर्म काय किंवा कर्माधिन असलेला धर्म काय, त्याविषयीच्या उलट्या-सुलट्या मतांच्या गलबल्यात आपल्यासाठी उचित ते काय, हे जीवाला म्हणूनच निश्चित ठरविता येते नाही. अगदी यमधर्माचे अवतार असलेल्या युधिष्ठिरालाही श्रेष्ठ धर्म कोणता याबद्दल संभ्रम निर्माण झाला होता. तेव्हा तो भगवंताच्या सांगण्यावरून शरपंजरी पडलेल्या भीष्म पितामहांना शरण गेला. त्या मोठ्यांच्या गोष्टी झाल्या. पण सामान्य माणसाने रोजचे कष्टमय जीवन कंठताना धर्माधर्माबद्दल जाणत्याला विचारावे तर विचारणार्‍याची अवस्था (जात-पातादी), त्याचे कर्म, काल आदी विचारात घेऊन मग त्याच्यासाठी उचित धर्माचा विचार सांगितला जातो. प्रपंचात असताना गृहस्थाने आपापल्या जबाबदार्‍या सांभाळाव्यात, असा प्रापंचिकाचा धर्म सांगितला जातो, तर प्रपंच असार असल्याचे सांगून वैराग्य धारण करावे, असे कुणी छातीठोकपणे सांगत असतो. प्रपंचातील समस्यांनी अत्यंत गांजलेल्या तुकोबारायांना धर्माधर्मांच्या गुंत्याने संभ्रमात टाकले. हित-अहित त्यांना कळेना. देव एकच सर्वज्ञ असून तो धर्माची मूर्ती असल्याचे तुकोबारायांना ज्ञात झाले नि  त्यांनी शेवटी विठोबाचे चरण धरले. आपली अवस्था वर्णन करताना ते त्याला विनवून सांगत आहेत की, ‘मी पतित आहे, हे तर तुला ठाऊक आहे... माझे हित विचारात घेऊन धर्माधर्मातील माझ्यासाठी जे काही उचित आहे, ते आता तूच करावेस्’. पतित अवस्था पाहून समाजात त्यांना अव्हेरले जात होते. त्यामुळे ‘ना घर का ना घाट का’ अशी त्यांची गत झाली होती. देवाने तसे करू नये, यासाठी ते देवाला सांगतात की, ‘मी पतित खरा, पण आता तुला शरण आलेलो आहे... तुझा शरणागत झालो आहे... आता मात्र तू माझा अव्हेर करू नयेस्’.
तुकोबाराय देवाला शरण गेले. आपला हेतु त्यांनी निवेदन केला. आपण त्याचाच आश्रय का घेतला, याची अशी तीन सयुक्तिक कारणे पुढील दोन चरणातून ते निवेदन करतात, जी अप्रत्यक्षपणे देवावर बंधनकारक ठरणारी आहेत. ही कारणे देवाची नीती, लोकरीती आणि प्रत्यक्ष प्रसंग यावर आधारलेली आहेत. तुकोबाराय प्रथम देवाच्या बिरुदावलींचा उल्लेख करतात, ज्यांच्या आधारे त्यांच्या मनाला विश्वास वाटत आहे की, देवाच्या पायाशी मांडलेले आपले मागणे देव अमान्य करणार नाही. पहिले कारण आहे, ते देव अवलंबन करीत असलेल्या नीतीचे. तुकोबाराय म्हणतात, ‘देवा, तुझ्या ठायी राजा-रंक सारखेच आहेत... कुठल्याही प्रकारचा भेदभाव तू करीत नाहीस्.’ कोणीही असो, देवाजवळ आपपर भाव नसतो, असे तुकोबारायांचे सांगणे आहे. शरणागताचा केवळ भाव देव जाणतो. पुढे तुकोबारायांचे देवाला सांगणे आहे की, अनेक निष्फळ सायास करून नि दमणूक करून घेतल्यानंतर त्यांना हा (देवाचे पाय) आसरा गवसला आहे ( - पावलों पाय भलत्या परी). देवाने आता त्यांच्या मागणीची योग्यायोग्यता, त्यांची पात्रापात्रता न पाहता किंवा देवाकडे मागणी मांडताना अतिक्रम झाला असेल, तरी त्याचे वैषम्य वाटून न घेता त्यांना हाकलून देऊ नये ( - मग बाहेरी न घालावें).
देवापुढे मागणी मांडण्याचे दुसरे कारण देवाला निवेदन करताना तुकोबारायांचा भाव असा आहे की, याचकाने सश्रद्ध, सविनय, प्रांजलपणे शरण यावे आणि दात्याने उदारपणे कृपादृष्टीने याचकाच्या मागणीचा विचार करावा, ही लोकरूढी आहे, ती पूर्वीपासून चालत आलेली परंपरा आहे. देव सर्वसामर्थ्यवान आहे आणि तुकोबाराय याचक आहेत, त्यामुळे त्यांनी देवाकडे जी मागणी मांडली आहे, ती व्यर्थ नाही... त्यांचे बोलणे चुकीचे ठरणारे नाही ( - नाहीं मी बोलत वाउगें) .
तुकोबारायांनी निवेदन केलेले तिसरे कारण हे प्रत्यक्ष प्रसंगांचा दाखला देणारे आहे. देवाला ते स्मरण देतात की, जेव्हा जेव्हा त्याच्यावर असे प्रसंग उद्‍भवले होते, त्या त्या प्रसंगी देवाने कुठलाही पक्षपात न करता त्याचा समभाव दाखविलेला आहे आणि त्या त्या प्रसंगातून झालेली त्याची कीर्ती जगात वाखाणली जात आहे... सर्वतोमुखी झालेली आहे. तुकोबारायांना देवापुढे सविनय निवेदन करावयाचे आहे की, देवाला शरण येऊन त्यांनी मागणी मागणे, हा प्रसंगही देवाने त्याच समभावाच्या न्यायाने विचारात घ्यावा आणि आपले ब्रीद पाळावे.
शरणार्थ्याशी असलेली देवाची बांधिलकी अशा प्रकारे सविनय निवेदन केल्यानंतर पुढे तुकोबाराय आपली अगतिकता व्यक्त करतात. त्यांचे दुःख, त्यांची होणारी होरपळ, त्यातून तत्काल सुटका करून घेण्यासाठी अवलंबिलेले मार्ग, केलेल्या सायासातून पदरी आलेली निराशा, आलेली किंकर्तव्यमूढता आणि मनातली तगमग त्यांनी अनेक संतांपुढे प्रकट केली होती आणि या सार्‍यातून सुटकेचा मार्ग विचारला होता. येथे ‘विचारली’ या पदाने ‘शास्त्र तसेच संतवचनांचा घेतलेला धांडोळा’ दाखविला जात आहे. सार्‍या जीवांना विनाशापासून वाचविणारा ( - अविनाशपर) एक ‘अविनाश’च असल्याचे एकमुखी सांगणे असल्याचे तुकोबारायांना उमगले आणि त्यांनी सारा भार देवावर सोपवला. सारे लौकिक व्यवहार सोडून दिले. आता केवळ भगवंत हाच त्यांची सर्वतोपरी सोडवणूक करणारा ( - थार) असल्याचा अविचल विश्वास आपल्या मनात दृढ झाला असल्याचे तुकोबारायांना देवापुढे निवेदन करावयाचे आहे. त्यांचा विश्वास खरा व प्रामाणिक असल्याचे देवाने मान्य करावे आणि त्यांचे मागणे पूर्ण करावे, असा तुकोबारायांचा भाव आहे..
आपल्या मनातील उत्कंठा, तातडी देवाने गैर मानू नये, यासाठी तुकोबाराय त्यांच्याकडून एका शास्त्र-संत वचनाचे अतिक्रमण झाले असल्याचे मान्य करतात. देवाने त्यामागचे कारण विचारात घ्यावे, या उद्देशाने ते सांगतात की, भगवंताच्या प्राप्तीचे ‘धीर’ हे वर्म सांगितलेले असले, तरी आता त्यांना धीर धरवत नाही. त्यांनी हा उपदेश असार मानले असल्याचे ते देवाजवळ मान्य करतात. असे मानण्याचे कारण ते हेच सांगतात की, सार असलेले अविनाश पद प्राप्त करण्यासाठीचे साधन असलेला हा देह क्षणभंगुर आहे ( - देह हा नाशिवंत जाणार). आयुष्याचा काहीच भरवसा देता येत नाही. त्यामुळे इच्छित प्राप्तीसाठी ‘जे उद्या करायचे ते आजच करावयास हवे आणि जे आजच करावयास हवे ते आत्ताच केले पाहिजे’ या विचाराने ते तातडी दाखवित असल्याबाबत त्यांनी देवाला दिलेले हे स्पष्टीकरण आहे.  तुकोबारायांनी जे असार मानले ते त्यांनी सकारण सांगितले व ते निर्मळ मनाने मान्य केले आणि नंतर सार काय मानले, तेही प्रकट केले आहे. देवाचे नाम हेच सार असल्याचे आणि निर्धारपूर्वक त्यांनी ते धारण केले असल्याचे ते सांगतात. देवाचे स्वरूप निर्गुण निराकार असल्याने त्याची प्राप्ती कष्टसाध्य असल्याचे सार्‍यांचे प्रतिपादन आहे. परंतु भगवंताचे नाम त्याची रूप-गुण-कीर्ती वर्णन करणारे असल्याने ते सगुण जसे आहे, तसेच ते भगवंताचे, जो स्वभावतः निर्गुण-निराकार आहे, त्याचे वाचक असल्याने निर्गुणही आहे, असे सारे संत प्रतिपादन करतात. या नामाच्याच द्वारे देवाची प्राप्ती संतांना-भक्तांना झाली असल्याचे प्रत्यक्ष प्रमाण आहे. म्हणूनच नाम हे सार आहे, असे सांगून सार्‍याच संतांनी माझी जिज्ञासा शांत केली आहे ( - केली आराणुक सकळां हातीं), असे तुकोबाराय सांगतात. अविनाशी पद प्राप्तीसाठी नामच मुखीं धरावे आणि तेच चित्ती असावे, असे जे मला सांगितले आहे तेच साधन मी आचरित आहे. अशा प्रकारे सार्‍या अंगांनी देवाला सविनय निवेदन करून शेवटी, ‘माझा भाव लक्षात घेऊन, तुमचे ब्रीद सार्थ व्हावे म्हणून, लोक-रीत म्हणून, प्रत्यक्षपणे तू मागील प्रसंगी असेच वागला आहेस म्हणून, शास्त्र-संत वचनांची सत्यता दाखविण्यासाठी आणि सर्वात महत्वाचे म्हणजे ज्या संतांनी माझी आराणूक केली आहे, त्या संतांचा मान राखण्यासाठी माझा स्वीकार करावास्’ अशी गळ देवाला तुकोबाराय घालतात.
(क्रमशः) 

संपर्क : (डॉ. रामपूरकर : ०९८२०३७६१७५)