आनंदडोह... २

अंगाची लाही लाही करणारा वैशाख वणवा. त्याची सांगता करण्यासाठी जेव्हा आकाशात घनकृष्ण मेघ गोळा होतात... दाटीनं घुसळण सुरू करतात... टपोर्‍या थेंबांचा वर्षाव सुरू होतो... तेव्हा माणसाचा काय अवघ्या सृष्टीचाच मनमोर नाचू लागतो. पहिल्या पावसाचे ते थेंब आकाशाकडे पाहत यथेच्छ अंगावर घेताना निखळ हंसू डोळ्यातून धबधबतं...
मोराचा आनंद तर प्रेक्षणीय असतो... दूरवर पडलेल्या पावसानं मृद् गंध दरवळलेला पहिल्यांदा त्याला समजतो... आता तो पाऊसराजा इथेही येणार असा अंदाज येताच त्याच्या स्वागतासाठी जमिनीवर लोंबणार्‍या त्याच्या शतनेत्रांच्या पिसार्‍यात क्षणात चैतन्य सळसळतं... रंगात येऊन लगबगीनं मग झरकन् तो पिसारा उभा करतो... फर्र फर्र आवाज करीत पिसार्‍याचा पंखा थरथरवत, अधिर झालेल्या मयूराला पर्जन्य राजाच्या स्वागताची घाई होते... एका पायावरचं त्याचं नृत्य ज्यानं पाहिलं, त्याच्या डोळ्याचं पारणं फिटतं... त्याला झालेला आनंद त्याच्या डोळ्यातून झिरपणार्‍या थेंबातून शतरंगी होऊन ओघळू लागतो... त्या आनंदाच्या ऊर्मी त्याला आवरता येत नाहीत... एका पायानं जमिनीवर आघात करीत... ताल धरीत त्याचं केकावणं सुरू होतं, तेव्हा आपल्या डोळे आणि कान दोहींनाही त्या देखणेपणाची...सुश्रवणाची मेजवानी मिळते. 
पाऊस आणि बेडूक यांचं नातं कोणतं? पाऊस आभाळात राहणारा तर बेडूक कुठे तरी खडकाखाली किंवा बिळात कोंडून घेत राहणारा... नऊ महिने गर्भात राहणार्‍या बालकासारखा हा पाऊस आणि बेडूकही... दोघंही नऊ महिने अदृश्य असतात... जेव्हा दृश्य स्वरूपात आपल्यासमोर येतात, तेव्हा तेही नवजात बालकासारखं केकाटतात... बेडूक जेव्हा ‘डरांव् डरांव्’ करू लागतो, तेव्हा वाटतं, तो पावसाला सांगत असावा की, या मेल्या माणसांना ‘घाबरव् घाबरव्’... मग डोळे मिचकावत ढग गडगडाट करू लागतात... ते पाहून बेडकांना अधिकच चेव येतो.
ऋग्वेदात सातव्या मंडलात या बेडकांनाच देवता मानून वसिष्ठ मैत्रावरुणि ऋषींनी रचलेल्या मंत्रांचा समावेश केला गेला आहे. याला पर्जन्यसूक्त म्हटलेले आहे. ज्यांच्या गावात तलाव आहेत, त्यांची या बेडकांशी चांगली ओळख असते. या सूक्तातून आपण पाहिलेल्या दृश्यांचे वर्णन वाचावयास मिळते... वर्षभर बिळात राहून हे मंडूक जणु काही तप करीत असतात... त्यांच्या तपाने पर्जन्य प्रसन्न होतो... पर्जन्याचा साक्षात्कार झाला की, त्यांना त्यांच्या तप:पूर्तीचे समाधान लाभते आणि ते आनंदोत्सव सुरू करतात... आपला वत्स नजरेआड झालेल्या सवत्स धेनूच्या हंबरड्याप्रमाणे या मंडूकांचा कलकलाट सुरू होतो... तपाधिन राहिल्यामुळे तहानेने व्याकूळ झालेल्या मंडूकांवर पर्जन्य जेव्हा वर्षाव करू लागतो, तेव्हा एखादे बालक ज्याप्रमाणे बोबडे बोलत त्याच्या बापाकडे जाते, तद्वत् एक मंडूक शब्द करीत दुसर्‍या मंडूकाकडे उड्या मारीत जातो... जलवर्षावाने सुखी झालेले मंडूक हर्षभरित होऊन एक दुसर्‍याला भेटत असतात... पावसात न्हालेला चित्रविचित्र रंगाचा एक बेडूक जेव्हा दुसर्‍या हिरवट रंगाच्या मंडूकाशी आपला आवाज भिडवतो, तेव्हा ते जणू त्यांचे तप सार्थकी लागल्याबद्दल एक दुसर्‍याचे अभिनंदनच करीत असतात.
 ऋषींचं मंडूक वर्णन पुढे सुरू राहते... शिष्य आपल्या गुरूंनी शिकवलेल्या मंत्रांचा हिंडत हिंडत सराव करीत असतो, त्याप्रमाणे हे मंडूक पाण्यात इकडून तिकडे पोहत जात बोलत असतात आणि तेव्हा त्यांचे विकलांग झालेले शरीर पुष्ट होत जाते... कुणी मंडूक गाईच्या हंबरण्यासारखा आवाज काढतो तर एखादा बेडूक शेळीच्या आवाजासारखा नाजूक स्वर लावतो... एक बेडूक चित्रविचित्र रंगाचा तर दुसरा बेडूक हिरव्या रंगाचा तर तिसरा बेडूक पिवळ्या रंगाचा... पण सारे मंडूक एकच नाव धारण करतात... आपल्या गुरूने शिकविलेले सूक्त अनेक शिष्यांनी एकसुरात उच्चरवाने म्हणावे, तसे सारे मिळून घोष करू लागतात... यज्ञ करणारे ऋत्विज् यज्ञकर्म आचरताना मंत्रघोषादी करून घामाने डबडबल्यावर ज्याप्रमाणे मोकळ्या हवेत येतात, तद्वत् हे मंडूक ही पाण्यातून बाहेर येऊन बसतात... हे मंडूक संवत्सराचे यम-नियम कसोशीने पाळत असतात...
अशा या मंडूकांना देवत्व बहाल करून मैत्रावरुणी ऋषी प्रार्थना करतात, ‘या नियमित तपाचरणी मंडूकांनी आम्हास संपत्ती, दीर्घ आयुष्य द्यावी आणि असंख्य गाई प्रदान कराव्यात!’
लहान मुले पावसाच्या धारा हातात घेऊन मुठीत धरू पाहतात... पर्जन्याचा राजा इंद्र.. त्याला ऋषी विनंती करतात की, ‘हे इंद्रदेवा, जो मनुष्य खोटेनाटे बोलून नसता दोष दुसर्‍या निष्पाप माणसाला लावीत असतात, ते दुष्ट, मुठीत धरलेल्या पाण्याप्रमाणे नाहिसे होवोत्! 
या मैत्रावरुण ऋषींना उमगलेले एक गुपित असे आहे की, हा पर्जन्य झाडे-झुडुपे, गाई-घोडे व स्त्रियांमध्ये गर्भाची उत्पत्ती करीत असतो. हा गर्भ कुठून येतो? त्याबद्दल ऋषी सांगतात, पर्जन्यदेवाने गडगडाट करीत त्याच्याबरोबर असलेल्या वैद्युत अग्निला चमकावयास लावून (हा अग्नी पृथ्वीवर धाडून) त्यालाच गर्भ बनविलेला असतो. पहा, जीवाला नवचैतन्य या पर्जन्यामुळे लाभते आणि म्हणूनच या पृथ्वीवरील सारे भूतमात्र  कामोत्सुक होऊन सृजनाचा यज्ञ सुरू करीत असतात... हर्षभरित होऊन पावसाचा आनंद लुटत असतात!