मला मकर संक्रांत हा सण आवडत नाही.

आता हे वाचून तुम्हाला वाटलं असेल, आला... आणखी एक पर्यावरणवादी आला. आता हा पतंग, मांजा, त्या पतंगांसाठी होणारी वृक्षतोड आणि पतंगांचा कचरा यावर छान लांबलचक भाषण देणार आणि महा बोर करणार.... नाही!!! काळजी करू नका. माझा तसला कसलाही उद्देश नाही. माझा विरोध त्या पतंगांना किंवा त्या वृक्षतोडीला किंवा खरं सांगायचं तर मकर संक्रांतीच्या निमित्ताने होणाऱ्या अपेयपानाच्या (दारू पिणे याला सभ्य मराठी भाषेत 'अपेयपान' म्हणतात) पार्ट्यांनाही माझा विरोध नाही. माझा विरोध आहे तो मकर संक्रांतीच्या निमित्ताने आपले पाककला नैपुण्य दाखवणाऱ्या स्त्रियांना... (या वर्गात शाळेत शिकणाऱ्या चिमुरड्यांपासून कवळी वापरणाऱ्या शि. सा. न. आज्जींपर्यंत सगळा महिलावर्ग मोडतो). अजून मुद्दा लक्षात आला नाही वाटतं... थांबा. माझ्यावर ओढवलेला एक (बाका) प्रसंग सांगतो. (इथे अति-प्रसंग असं म्हणायची माझी फार इच्छा होती.. अहो तो प्रसंगच होता तसा... पण असो. )

दिवसः मकर संक्रांत

वर्षः तितकंसं महत्त्वाचं नाहीये ते.

वेळः सणासुदीचं काहीतरी छान छान खायच्या इच्छेने पोटात कावळे कोकलतात ती.

स्थळः (कृपया या शब्दाचा अर्थ 'ठिकाण' असा घ्यावा. लग्नाळू व्यक्तींनी अर्थाचा अनर्थ करू नये) पुण्यातील असेच एक (बहुदा सदाशिव पेठी ) जोशी - कुलकर्णी घर.

माझं त्या घरातल्या काकांकडे काम होतं आणि ते मात्र नेहमीप्रमाणे "अरे फक्त दहा मिनिटांत आलो" असं म्हणून साधारण एक तासभर त्यांच्या सोसायटीच्या मीटिंग मध्ये भांडत बसले होते. त्यांची वाट बघत बघत मी आपला टीव्हीवर चाललेला " क्या मंगलवासी अभिषेक-ऐश्वर्या की बेटी का अपहरण करणं चाहते है" हा अतिशय अभ्यासपूर्ण कार्यक्रम बघत होतो. मंगळावरचे लोक प्रचंड निरुद्योगी असावेत असं काहीतरी त्या कार्यक्रमामधून वाटत होतं. राखी सावंत या गोष्टीवर आपलं बहुमोल मत मांडायला टीव्हीवर आली आणि नेमकी तेव्हाच स्वयंपाकघरातून हाक आली, "अरे हे येतीलच हं इतक्यात.. मीटिंग जरा लांबलेली दिसतेय. एकटाच बाहेर बसून कंटाळला असशील ना... आत ये की. माझ्याशी जरा गप्पा मारल्यास तर चालेल की... " मनापासून सांगतो... मला त्या राखी सावंत आणि मंगळवाले लोक यांना सोडून जायचं जीवावर आलेलं, पण काकूंशी गप्पा मारताना काहीतरी खायला मिळण्याची शक्यता होती, त्यामुळे आमची स्वारी थेट स्वयंपाकघरात...

या काकूंची 'पियू' (शारीरिक वय अंदाजे १७ वर्षे आणि बौद्धिक वय अंदाजे ५ वर्षे.. अर्थात हे आमचं वैयक्तिक मत. शाळेत दरवर्षी पहिला नंबर येत असल्यामुळे या बाईसाहेब लौकिकार्थाने हुशार आहेत पण तशा डोक्याने ‘मठ्ठंच’ आहेत)... तर या बाईसाहेब स्वयंपाकघरातच ग्यासवर काहीतरी करत होत्या. माझी धडकी भरली. ‘खायला नको पण या पियूच्या स्वयंपाकाला आवर’ अशी तिची पंचक्रोशीत ख्याती होती. कोल्हापुरी मिसळीपासून नागपूरच्या वडाभातापर्यंत सगळे पदार्थ या बाईसाहेबांनी करून समस्त घरच्या आणि फुकटचं खायला म्हणून आलेल्या पाहुणे मंडळींची पोटं पार बिघडवली होती. पियू तयार करत असलेली ती स्पेशल 'डीश' तयार व्हायच्या आत काका यावेत अशी मी मनोमन प्रार्थना चालू केली. काका येईपर्यंत खिंड लढवणे आणि काहीही झालं तरी पियूच्या स्वयंपाकाचा विषय टाळणे हा एकमेव मार्ग मला दिसत होता. तेवढ्यात काकूंनी गुगली टाकला, "काय रे वधूसंशोधन कसं चाललंय? अरे त्या भाव्यांच्या चुलतबहिणीच्या मावसनणंदेच्या चुलत सासऱ्यांच्या नातीचं स्थळ आलेलं ना तुला सांगून... काय झालं रे त्या स्थळाचं? " अतिशय अवघड प्रश्न. आता ही भावेंची नातेवाईक मुलगी माझा 'अतिसुंदर' फोटो बघून मला थंड नकार देऊन गेली. आता मला त्या पोरीने रिजेक्ट केलं, हे मला सांगायचं नव्हतं; काही झालं तरी माझ्या इमेजचा प्रश्न होता. आता अजूनही मी हातात लग्नाची पत्रिका किंवा साखरपुड्याचं आमंत्रण घेऊन उभा नाहीये ह्याचा अर्थ काहीतरी बोंबलेल आहे असा होत नाही का; मग असे अवघड प्रश्न कशाला विचारतात देव जाणे... असो.

"बापरे... अहो काकू मुंबईमध्ये जाळपोळ झाली म्हणे कुठेतरी... " मी माझ्या मोबाइलची स्क्रीन बघत एक एसएमएस वाचायचं नाटक केलं. आता ह्याला अफवा पसरवणे म्हणत नाहीत. फक्त आपल्या आयुष्यातील एका खाजगी विषयावर होऊ घातलेली जाहीर चर्चा टाळण्याचा हा एक प्रामाणिक उपाय होता... आता मुंबईमध्ये रोज कुठे ना कुठे मोर्चा, मारामाऱ्या, जाळपोळ हे प्रकार होताच असतात त्यामुळे काकूंना ते खरं वाटलं असावं कारण त्यांनी पण लगेच "आजकाल काही खरं नाही हो या लोकांचं... उठतात आणि मारामाऱ्या करत सुटतात.. बघ ई टीव्ही वर बातम्या लागल्या असतील. त्यात सांगतील" असं म्हणत 'आजकालची बिघडलेली तरुण पिढी' हा महाबोर असा 'प्रवीण दवणे फेव्हरेट' विषय चालू केला. मी शांतपणे टीव्हीवर परत एकदा राखी सावंतची मुलाखत चालू केली. नको तो विषय संपवल्याचा आनंद माझ्या चेहऱ्यावरून ओसंडून वाहायला लागलाच होता.... पण खरं सांगतो नियतीला आमच्या आयुष्यात सुख बघवत नाही हो..

पियू शांतपणे गजगामिनीसारखी पदन्यास करत (म्हणजे आपला ८० किलोचा अवाढव्य देह सांभाळत हत्तिणीसारखी झुलत झुलत) माझ्या समोर उभी राहिली. तिच्या हातात एक ताटली आणि त्यात ४-५ काळेकुट्ट छोटे गोळे होते. "दादा, अरे मी ना आज संक्रांत म्हणून तीळगुळाचे लाडू केलेत. चव घेऊन बघ की कसे झालेत ते. " आली का पंचाईत!!! मी अविवाहित असल्यामुळे 'फुकट ते पौष्टिक' हा माझा ध्येयवाद होता पण फुकट असलं तरी पियूच्या हातचं काहीही खायचं नाही हा आमच्या गल्लीतल्या मंडळींनी (अर्थात गुपचूप) पास केलेला ठराव मोडण्याचं धाडस मला काही होईना. आमचा देव पण ना असा नको तिथे परीक्षा पाहण्यात एक नंबर! फाशी जाणाऱ्या कैद्याने आपली शेवटच्या जेवणाची थाळी हातात घ्यावी त्या उत्साहाने मी ती ताटली हातात घेतली आणि समोर राखीच्या मुलाखतीत लक्ष केंद्रित केलं. पियू आतल्या खोलीत गेली की ते लाडू गुपचूप खिशात घालायचे आणि बाहेर पडल्यावर त्याची योग्य ती वासलात लावायची असा माझा बेत होता. पण ठरवलेलं होईल तर ते आमचं नशीब कसलं... पियू समोरच उभी राहिली. "अरे दादा खा ना. चव कशी आहे ते सांग म्हणजे जर काही बिघडलं असेल तर मला दुरुस्त्या करायला बरं!!! "

"गधडे, कार्टे मी काय प्रयोगशाळेतला उंदीर आहे माझ्यावर हे असे प्रयोग करायला? " असा म्हणायची खर्रच खूप इच्छा झाली होती हो... पण काय 'दादा-धर्माला' जागणं आलं आणि मी शांतपणे एक काळा गोळा तोंडात घातला. तो चक्क कडू होता. ‘संक्रांतीला गोड गोड तिळगुळ घ्या आणि गोड बोला असा संदेश देताना हा कडूजार तिळगुळ या बयेने मला का द्यावा? मी कडू बोलावं अशी हिची अपेक्षा आहे का? ’, असा विचार मी करत होतो आणि पियू म्हणाली, "अरे दादा, बाबांना डायबिटीस आहे ना म्हणून लाडवांमध्ये गुळापेक्षा जास्त मेथी घातलीये म्हणजे त्यांनापण खाता येतील. " "अगं मंद झंपे... डायबिटीस तुझ्या बापाला आहे मला नाही.. हे जिभेपर्यंत आलेले शब्द मी शांतपणे गिळून टाकले. " पण तोवर त्या कडू चवीमुळे माझ्या डोक्यात तिचा 'बाप' काढण्याइतपत राग निर्माण झालेला होता.

मग मी तो लाडू चावायचा निष्फळ प्रयत्न केला. माझ्या रूट केनला केलेल्या एक-एक दातातून अतिशय जीवघेणी कळ गेली, १-२ दात त्या गोळ्याला आपटले ( कदाचित आपटून फुटले पण असतील ) पण तो गोळा काही तुटेना. "थोडेसे कडक झालेत लाडू. तेवढाच दातांना जरा व्यायाम", असं म्हणून ती मूर्खीण हसली. "थांब तुझ्यासाठी पाणी आणते", असं म्हणून आत गेली. "पाणी नको. हे गोळे खायच्या ऐवजी विष आण" असं म्हणायचं माझ्या अगदी जिभेवर आलं होतं... पण शेवटी १-१०० आकडे मोजले आणि थांबलो. ती आत जाऊन येईपर्यंत शांतपणे तोंडातला गोळा बाहेर काढला आणि खिडकीतून बाहेर भिरकावून दिला. मग मी ताटलीतले बाकीचे ४ गोळे पण असेच बाहेर भिरकावून दिले आणि रिकाम्या तोंडाने काहीतरी चघळत असल्याची अक्टिंग करत बसलो.

"काकू, छानच झालेत हं लाडू... काही म्हणा पण पियूच्या हाताला (वाईट्ट कडू) चव आहे बुवा. या वयात एवढं एक्सपरटाईज म्हणजे कमाल झाली हो", मी तोंडातली ती घाणेरडी कडू चव विसरत आपलं कसं बसं बोललो. "छे रे दादा, तुझा आपलं काहीतरीच!!! ", "हो. खरंच. माझा आपलं काहीतरीच", हे अर्थात मी मनाशी! पियू आत लाजली असावी कारण बाहेर येताना ती आणखी एक छोटा डबा घेऊन आली आणि म्हणाली, "तुला एवढे आवडतील असं वाटलं नव्हतं रे. हे घे. डब्यात आणखी दिलेत. तालिबानी अतिरेक्यांना बॉंब हातात देताना जसं वाटेल ना तसं काहीतरी मला वाटलं. तेवढ्यात "हरामखोर लेकाचे. अक्कल नाही इथे कुणाला. सुशिक्षित म्हणवतात स्वतःला पण एकही लेकाचा सुसंस्कारित नाही. घरातून दगड धोंडे फेकले माझ्यावर.. अर्रे बघून घेईन एकेकाला... ", असं म्हणत काकांनी एंट्री घेतली.

"काय झालं काका? असे चिडलात का हो एकदम? ", मी विचारलं.

"अरे मी आत्ता खालून येत होतो आणि कोणीतरी माझ्यावर दगड फेकले रे... अर्रे मर्द मराठ्याची औलाद असेल तर समोर ये म्हणावं... लपून छपून कसले वार करता... हे बघ चांगले ४ दगड मारले रे... " काकांनी आपली मूठ उघडून मला ते ४ दगड कम लाडू दाखवले. "एकाचा नेम चुकला... " मी मनाशी हिशोब लावत स्वगत म्हटलं...

"आलात का... अहो किती वेळ. हा बिचारा तुमची वाट बघून बघून कंटाळला अगदी. अरे.. हे काय अहो ते लाडू याच्यासाठी दिले होते पियूनं... तुम्ही काय उचललेत सगळेच्या सगळे... अधाशीच बाई मुलखाचे तुम्ही. हादडा आता. तू थांब रे. तुझ्यासाठी आतून आणून देते लाडू. " काकूंनी जवळपास हिरोशिमा नागासाकीवाला बॉंबच टाकला.

काका अजूनही टीव्हीवरच्या संस्कृत बातम्या बघताना होतो तसा चेहरा करून एकदा माझ्याकडे, एकदा काकूंकडे आणि एकदा त्या हातातल्या ४ लाडू कम दगडांकडे बघत होते. त्यांचं ते प्रश्नचिन्ह आणखी गडद होण्याआधी मी तिथून चक्क पळून गेलो. आजतागायत त्या घराचे दरवाजे माझ्यासाठी बंद आहेत. पियू मला बघितलं की नाक फेंदारून निघून जाते आणि काकू त्यांच्या ओळखीतल्या कोणालाही माझं स्थळ सुचवत नाहीत. सुदैवाने काका मला अजून दिसलेले नाहीत. आता मला सांगा या पूर्ण प्रकरणात माझी काहीतरी चूक होती का? पण भोगतोय कोण? असो.

असो. तर त्या दिवसापासून मला मकर संक्रांत आवडत नाही...

जाता जाता सहज सुचलं म्हणून विचारतो... या पियू सारख्या लोकांचा निषेध करायला म्हणून संक्रांतीला काळे कपडे घालतात का हो?

-निरू