मना तुझ्या मनातले

मना तुझ्या मनातले
कसे मला कळायचे
मनात सांग मौन का
उगीच बाळगायचे?

मला न कोण सोबती
उन्हात वाट चालतो
विचारतात पावले
कुठे अता वळायचे?

अजून वाट दाखवी
स्थलांतरातल्या खुणा
किती योजने अजून
चहूदिशी पळायचे?

व्यथा पुन्हा तुझ्या जुन्या
उरात आत शोधतो
नव्या व्रणात गुंतुनी
पुन्हा हुळहुळायचे!

वृत्त : प्रमाणिका - लगालगा लगालगा - एका चरणात ८ अक्षरे (एका कडव्यात ३२ अक्षरे)