नाटाचे अभंग... २४

२३. बरवें झालें आलों या जन्मासी । जोड जोडिली मनुष्यदेहाऐसी ।
 महालाभाची उत्तम रासी । जेणें सर्वसुखासी पात्र होइजे ॥१॥
 दिलें इंद्रियें हात पाय कान । डोळे मुख बोलावया वचन ।
 जेणें तूं जोडसी नारायण । नासे जीवपण भवरोग ॥धृ॥
 तिळें तिळें पुण्य सांचा पडे । तरि हें बहुतां जन्मीं जोडे ।
 नाम तुझें वाचेसी आतुडे । समागम घडे संतांचा ॥३॥
 ऐसिये पावविलों ठायीं । आतां मी काय होऊं उतराई ।
 येवढा जीव ठेवीन पायीं । तूं वो माझे आई पांडुरंगे ॥४॥
 फेडिला डोळियांचा कवळ । धुतला गुणदोषांचा मळ ।
 लावूनि स्तनीं केलों शीतळ । निजविलों बाळ निजस्थानीं ॥५॥
 नाहीं या आनंदासी जोडा । सांगतां गोष्टी लागती गोडा ।
 आलासी आकारा आमुच्या चाडा । तुका म्हणे भिडा भक्तिचिया ॥६॥
 
तुकोबारायांचे अंतःकरण अतिशय संवेदनशील आहे. आयुष्यातले उतारचढ आणि प्राप्त प्रसंगातून अनुभवास येणारे क्लेषऱ्हर्ष, तसे पाहता सार्‍याच माणसांच्या आयुष्याचा अविभाज्य भाग असतो. पण मनुष्यजीवनाकडे डोळस वृत्तीने ते पाहतात. मनात उठलेल्या भावभावनांचे तरंग विधायक विचाराने घेऊन उत्कटपणे आणि निर्भीडतेने तुकोबाराय बोलून दाखवितात. त्यांना आलेल्या आत्मप्रचितीमुळे त्यांच्या बोलांना प्रासादिकता लाभलेली आहे. त्यांच्या भावभावनांच्या विविध छटांचे त्यांनी केलेले टिपण म्हणजे त्यांचे अभंग. हे अभंग मेघवृष्टी न्यायाने सर्वच मनुष्यजातीला मार्गदर्शक झाले आहेत. तुकोबारायांच्या परखडपणाचे एक अंग म्हणजे जे काही चांगले मिळाले, त्याबद्दल उतराई व्यक्त करणे. वेळोवेळी त्यांनी देवाशी संवाद केला. हा देव प्रत्यक्षतः त्यांच्या समोर अवतरत होता का, हा विचार बाजूला ठेवला, तरी समोरच्या मूर्तीत विठोबा सभान उपस्थित आहे, असे समजून व त्याला आपल्या सुहृदाप्रमाणे मानून त्यांचा देवाशी संवाद होत होता. त्यांनी जेव्हा देवाचा आश्रय घेतला आणि त्यांना जे निरतिशय समाधान प्राप्त झाले, त्याबद्दल ते आपल्या आराध्य देवाजवळ कृतज्ञता सहजतेने प्रकट करतात. या अभंगात, आपल्याला नरदेहाची प्राप्ती करून दिल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी तुकोबारायांनी देवाशी केलेला हृद्य संवाद वाचावयास मिळतो.
अभंगाची सुरुवात करताना तुकोबाराय ‘बरवें झालें आलों या जन्मासी’ असे उद्गार काढतात. इथे ‘बरवें’ या शब्दाने आपण सामान्यतः ‘बरंऽय्’ किंवा ‘ठीकंऽय्’ म्हणतो तसा अर्थ दाखविला जात नसून ‘हे बाकी छान झालं, बरं का’ असे म्हणून जसा आनंद व्यक्त करतो, तसा भाव आहे. ‘आलों या जन्मासी’ या पदातून स्वकर्तृत्वाचा अभाव दाखविलेला आहे. जन्माला येणे या विषयाच्या संदर्भात हे लक्षात घ्यायचे की, प्रत्येक जीव अनिच्छेने वा परेच्छेने जन्मास येत असतो. जीवाला जन्मास येण्याकरिता कर्मशेष, अतृप्त वासना ही दोन महत्वाची कारणे आहेत. शिवाय जे शास्त्रीय पद्धतीने सिद्ध करता येत नाही, असेही एक कारण असते, ते म्हणजे, ईश्वरेच्छा. याबाबत फार तर ‘एकोऽहं बहुस्यामहः’ हे एक प्रमाण देता येईल. ‘या’ शब्दाने मृत्युलोकात येणे दाखविले आहे. जीवाला मृत्युलोकात जन्म लाभला आणि त्याला मनुष्यदेहाची जोड मिळाली, अशी विशेषता तुकोबाराय सांगतात. मृत्युलोकातील जन्म लाभणे, ही कृतकृत्यता किंवा वैशिष्ट्य नसून जो जन्म प्राप्त झाला आहे, तो मनुष्ययोनीतील आहे, हे विशेष वैशिष्ट्य आहे, कारण संत तसेच शास्त्रे एकमताने सांगतात की, आत्मस्वरूपाची (देवाची) प्राप्ती करून घेण्यासाठी जी पात्रता हवी, ती एकमेव अद्वितीय मनुष्यदेहाच्या योगेच (मग तो नरदेह असो वा नारीदेह असो) संभवते. आणि, तसा तो आपल्याला लाभला असल्याबद्दल तुकोबाराय प्रथम समाधान व्यक्त करतात.
जो मनुष्यदेह लाभला, त्याची महती तुकोबाराय चढत्या क्रमाने विषद करताना म्हणतात की, हा मनुष्यदेह ‘महालाभाची उत्तम रासी’ आहे. मनुष्यदेहाची प्राप्ती हा महालाभ असल्याचे प्रथम सांगतात. या मागचा भाव असा आहे की, या लाभापेक्षा  अन्य कोणताही लाभ मोठा असू शकत नाही. लाभ म्हटले की, फलनिष्पत्तीचा विचार येतो. एखाद्या कार्याचा सांग विचार करताना त्यामागचा कार्य-कारण भाव विचारात घ्यावा लागतो. मनुष्यदेहाच्या प्राप्तीने अलौकिक महालाभ झाला, असे म्हणण्यामागे असलेल्या कारणांचा विचार करता लक्षात येते की, मनुष्यदेहात विकसित झालेली पाच ज्ञानेंद्रिये, पाच कर्मेंद्रिये आणि चित्तचतुष्टय (मन, बुद्धी, चित्त व अहंकार) जोडलेली आहेत. या चौदा करणांना ‘रासी’ (राशी किंवा संग्रह) असे म्हटलेले आहे. ही राशी ‘उत्तम’ (उत्+तम) आहे, म्हणजेच तर-तम भावाने पूर्ण विकसित आहे. या चौदा करणांद्वारेच, ऐहिक वा पारमार्थिक, सर्वसुखाची प्राप्ती करून घेण्यासाठीची पात्रता मनुष्यास मिळविता येते. तसे पाहू गेल्यास मानवेतर योनींमध्येही इंद्रियांची राशी निसर्गतःच आहे. फरक असा आहे की, त्या योनीत एखादेच इंद्रिय बलवत्तर झालेले असते, उदा. श्वानाचे घ्राणेंद्रिय, गरुडाची दृष्टी, कीटकांची नाद -ग्रहणता, लाजाळू वनस्पतीत स्पर्शाचा दिसणारा परिणाम वगैरे. परंतु मानवेतर योनीतील जीवात त्या त्या इंद्रियांव्यतिरिक्त इतर इंद्रियांना नाममात्र सामर्थ्य असते. मानवेतर योनींत आढळणारी दुसरी एक उणीव ही आहे की, त्यांच्यात सारासारविवेक नगण्य असतो. मानवदेहामध्ये सर्वेंद्रियांद्वारे कार्य संपन्न केले जात असताना कर्मेंद्रियांना अंतःकरण चतुष्टय सारासारविवेकाने सावरून धरते. ही सावरण्याची क्रियाशक्ती मानवेतर योनींमध्ये प्रगत झालेली दिसत नाही. प्रपंच वा परमार्थामध्ये ‘सारासारविवेकासह असलेले इंद्रियजन्य ज्ञान’ मनुष्यमात्राच्या योग्यायोग्यतेचे लक्षण असल्याचे म्हणता येते. सारासार विवेकासाठी सहा प्रकारची प्रमाणे असल्याचे शास्त्रात सांगितले जाते (प्रत्यक्ष प्रमाण, अनुमान, उपमान, शाब्दिक वा ऐहिक (संहितादी), अर्थापत्ती आणि अनुपलब्धी). या प्रमाणांच्या योगे कार्याचा निर्णय केला जातो. मानवेतर योनीतील जीवांना ही प्रमाणे वापरणे अजिबात शक्य होत नाही. आता, लाभ म्हटले की. त्याचे भोक्तृत्व आलेच. जीव त्या लाभाच्या भोगाने लिप्त होऊ इच्छितो. जे मिळाले त्यापासून सुख मिळत असेल तरच तो लाभ म्हणविला जातो. लाभापासून मिळणार्‍या सुखाची अनुभूती घेतल्याशिवाय जीव स्वस्थ बसू शकत नाही. तुकोबाराय म्हणतात की, ‘जेणें सर्वसुखासी पात्र होइजे’. येथे ‘सर्व’ या उपपदाने प्रापंचिक सुखाचाही अंतर्भाव जरी होत असला, तरी पारमार्थिक दृष्ट्या ते गौण असल्याने तुकोबाराय ज्याला ‘सर्वसुख’ म्हणत आहेत, ते म्हणजे, स्वस्वरुपाचे अपरोक्ष ज्ञान झाल्यावर जीवाला मिळणारी विश्रांती व समाधान. ही अवस्था प्राप्त करून घेण्याची पात्रता कुणाही साधकाला या महालाभाच्या योगे ( - जेणें) शक्य होते.
तुकोबारायांनी अभंगाच्या प्रथम चरणात ‘महालाभाची राशी’ असे जे म्हटले, त्याचे स्पष्टीकरण ते देतात. ‘इंद्रिये’ या शब्दाने पाच ज्ञानेंद्रियांना अध्याहृत धरून पुढे हात, पाय, कान, डोळे व मुख (वाक् इंद्रिय) या कर्मेंद्रियांना ते नमूद करतात. ज्या सर्वसुखाच्या प्राप्तीचा अगोदर त्यांनी उल्लेख केला आहे, त्याचे स्पष्टीकरण देताना ते म्हणतात, ‘जेणें तूं जोडसी नारायण’. प्रथम जीवाला मनुष्यदेहाची जोड जोडली गेली. त्या देहाला इंद्रियांची जोड मिळाली आणि या इंद्रियांच्या योगे नारायणाची जोड शक्य होते. जीव अज्ञानापोटी देवापासून पराङ्गमुख होतो. त्याच्या सार्‍या क्रिया देहकेंद्रित होऊन जातात. प्रपंचात राहताना ‘हवे-नको’पण जोपासत तो भ्रामक सुख-दुःखाच्या लाटांवर हिंदकळत राहतो. जे हवे ते मिळत नाही आणि जे नको ते दूर लोटता येत नाही. असहाय्य अवस्थेत जीव देवाला आठवू लागतो. ‘नारायण’ हे निर्गुण-निराकार अनंताचे मूलभूत तात्त्विक रूप आहे. या नारायणाची अभिव्यक्ती म्हणजे विश्व. कुठलेही दैवत असो, ते या मूलरूपाचीच अभिव्यक्ती असते. केवळ त्या त्या रूप-गुणांमुळे त्या त्या रूपाला वेगवेगळी नावे दिली गेली आहेत, एवढेच. आपल्या आराध्याच्या योगे ईश्वराची प्राप्ती करून घेणे म्हणजेच नारायण जोडणे आणि ती मनुष्यजन्माची इतिकर्तव्यता असते. हे केवळ इंद्रियांच्या योगेच साध्य करणे शक्य होते. म्हणून इंद्रियांचा उल्लेख करून तुकोबाराय त्यांचा सर्वात महत्वाचा उपयोग सांगतात, ‘जेणें तूं जोडसी नारायण’. नारायणाची जोड मिळाली की, होणारा परिणाम पुढे सांगितला आहे... ‘नासे जीवपण भवरोग’. जीवपण आणि भवरोग हे परस्परावलंबी असतात. जीवपण जोपर्यंत देहकेंद्रित आहे, तोवरच भवरोगाचे अस्तित्व राहत असते. ‘नासे’ म्हणजे ‘न असे’ म्हणजे शिल्लक राहत नाही. परमलाभ झाल्यानंतर जीवाचे ‘हवे-नको’पण, ज्याला भवरोग म्हटले जाते, तो रोग संपुष्टात येतो. देहभाव संपतो आणि जीव शिवमय होऊन जातो. नंतर जे हवे-नकोपण असते, ते वंदनीय असते, कारण त्यात ईश्वराचा संग हवा असतो आणि त्यात येणारा कुठलाही व्यत्यय नको असतो.
पुढील चरणात तुकोबाराय सांगतात, ‘तरि हें बहुतां जन्मीं जोडे’. ‘हें’ म्हणजे मनुष्यदेह, त्यातील सक्षम इंद्रियांची राशी आणि त्या राशीच्या योगे नारायणाची जोड. हे सारे जोड जोडले जाण्यासाठी आवश्यक असलेली दुसरी साखळी पुढे तुकोबाराय विशद करून सांगतात. एकाच मनुष्यजन्मात हे घडत नाही. अनेक मनुष्यजन्म लाभणे आणि प्रत्येक जन्मात थोडे थोडे पुण्य गोळा होणे आवश्यक असते. तीळ-तीळ प्रमाणाने हा पुण्यसंचय होत राहतो. पुन्हा, संचित होणारे पुण्य हे शुद्ध पुण्य हवे. ईश्वरार्पण बुद्धीने केलेले कर्म (सा कर्म यत् हरि तोषयेत् ) किंवा, केवळ नारायण जोडण्यासाठी केलेले कर्म (मग जेणें मातें जोडिजे । ते शुद्ध पुण्य ॥), असे जे कर्म, तेच शुद्ध पुण्याचे फल देत असते. वासनायुक्त शुभकर्मे आचरल्याने जे पुण्य लाभते, ते पापात्मक पुण्य असल्याचे श्रीज्ञानेश्वर माउलींचे सांगणे आहे. त्यातून फार तर स्वर्गसुखाचा लाभ होईल. त्या पुण्याचा भोग संपला की, पुन्हा जन्म घेणे आलेच. शुद्ध कर्माचे साधन कोणते, ते पुढे स्पष्ट करताना तुकोबाराय सांगतात की, वाचेला ईश्वराचे नाम स्थायीरूपाने जोडले जाते ( - आतुडे) आणि संतांचा समागम घडतो. नामसाधनाने कर्मशुद्धी साधली जाते आणि, प्रत्यक्षतः किंवा शास्त्र-संत वचनांचे श्रवण-वाचन-मनन द्वारे, संतसमागम घडल्याने अज्ञानाचे पटल दूर होते.
 तुकोबारायांच्या जीवनात या दोन्ही साखळ्या जोडल्या गेल्या. त्यातून त्यांना जो परमलाभ झाला, त्याचे सारे श्रेय ते देवाला देतात. ‘असे सारे लाभ देऊन ( - ऐसिये) मला परमसुखस्थानी तू पोहोचविलेस् ( - पावविलो ठायीं)’ असे कृतज्ञतेचे निवेदन ते देवाजवळ करतात. या चरणाचा शेवटचा खंड ‘तूं वो माझे आई पांडुरंगे’ हा देवाच्या ठिकाणचा वात्सल्यभाव दाखविणारा असून, त्या वात्सल्यभावापोटीच देव जीवासाठी सारे काही करीत असतो, अशी भावना व्यक्त करणारा आहे. आई आपल्या अपत्याची ज्या प्रकारे निरपेक्ष काळजी वाहते, त्याच प्रकारे देवाने आई होऊन आपली काळजी वाहिली आणि त्यातून हा परमलाभ करून दिलेला, असे तुकोबाराय म्हणतात. देवाच्या या उपकारातून त्यांना उतराई व्हायचे आहे. तथापि, त्यासाठी त्यांच्याकडे कुठलीही देय वस्तू नाही. त्यांची ही स्थिती तुकोबारायांनी दुसर्‍या एका अभंगात खुलासेवार व्यक्त केली आहे. ते म्हणतात, ‘काय तुझे उपकार पांडुरंगा । सांगों मी या जगामाजीं आतां ॥धृ॥ जतन हें माझें करूनि संचित । दिलें अवचित् जाणूनियां ॥२॥ घडल्या दोषांचे न घलींच भरी । आली यास थोरी कृपा देवा ॥३॥ नव्हतें ठाऊकें आइकिलें नाहीं । न मागतां पाही दान दिलें ॥४॥ तुका म्हणे याच्या उपकारासाठीं । नाहीं माझें गांठीं कांहीं एक ॥५॥’ बाह्यांगाने पाहू गेल्यास स्वतःचा नसलेला जो देह, त्याच्याबद्दल ममत्व दाखविले जाते आणि असा ‘माझा’ म्हणविला जाणारा हा देह कुश्चळ, मर्त्य व नाशवंत असा आहे. लौकिकातील सारे पदार्थ, जे सारे नाशवंतच आहेत, तेही या देहाकरिताच साठविले जातात. असे नाशवंत पदार्थ देवाला अर्पण करणे योग्य नाही, असा तुकोबारायांचा विचार आहे. ते शेवटी ‘येवढा जीव ठेवीन पायीं’ म्हणतात. आपला जीव तेव्हढाच देवाला अर्पण करण्यासारखा असल्याचे तुकोबारायांना वाटते. जीव हा देवाचाच अंश असल्याने खरे म्हणजे तो देवाकडूनच दान स्वरूपात मिळालेला असतो आणि म्हणूनच तो नाशवंत नसतो. ‘यज्ञेन यज्ञमयजन्त देवाः’ (यज्ञानेच यज्ञाचे हवन करायचे) या सूत्राला अनुसरून, देवाचा अंश असलेला हा जीवच देवाला अर्पण करायचा. तुकोबारायांचा तोच मानस आहे.
तुकोबारायांनी देवाला आईपण दिले. आपला जीवभाव त्यांनी देवाच्या पायी वाहिल्यानंतर त्यांची स्वतःची अवस्था तान्ह्या बालकाप्रमाणे झाली असल्याचे ते म्हणतात. बालकाच्या ठिकाणी जीवपण आहे, पण ते सारे त्याच्या मातेच्या ठायीच केंद्रित झालेले असते. त्या बालकाचा देहभाव विकसित झालेला नसतो. कारण काहीही असो, बालकाला आई नजरेसमोर लागते. आईची अवस्थाही वेगळी नसते. आईला आपले बालक सतत नजरेसमोर हवे असते. बालकाचे रंगरूप तिच्या वात्सल्यात न्यूनता आणित नाही, त्याचप्रमाणे आईचे रंगरूप बालकाचे मातृप्रेम उणे करीत नाही. आई-अपत्य हे नाते शब्दातीत आहे. तुकोबाराय बालकाच्या अवस्थेत जाऊन मातृस्वरूप देवाशी उद्‍गार काढतात की, ‘तुझ्या दर्शनाची माझ्या डोळ्यांना भूक होती, ती तू दर्शन देऊन निवविली आहेस.’ बालकाची दुसरी अवस्था तुकोबाराय पुढे मांडतात. बालक मलत्याग जागीच करीत असल्याने ते मलीन होत असते. पण आई त्या मलिन बालकाचा तिरस्कार करीत नाही. ती त्या बालकाला न्हाऊ-माखू घालून स्वच्छ करते. तसे देवाने आपले गुणदोष धुतले असल्याचे तुकोबाराय सांगतात. ‘गुणदोष’ या शब्दाने ‘गुण आणि दोष’ असा अर्थ दाखविला जातो, त्याचप्रमाणे ‘गुण’ म्हणजे ‘दोरी, बंध’ या अर्थाने ‘दोषांचे बंध’ जीवाला मलिन करीत असतात. अपत्याच्या अंगचे हे मलदोषांचे बंध धुतल्याशिवाय, स्वच्छ केल्याशिवाय आई अपत्याला जवळ घेत नाही. प्राण्यातसुद्धा ही प्रवृत्ती दिसून येते. गाय आपल्या वासराला चाटून स्वच्छ करते. न्हाऊ-माखू घालून श्रमलेल्या बालकाला आई आपले स्तन्य पाजून शांत करते. दूध पिता पिता ते बालक झोपी जाते. त्याला मग आई त्याच्या निजस्थानी, पाळण्यात झोपविते. पारमार्थिक दृष्ट्या विचार करता असे दिसते की, साधक अवस्थेपूर्वी मनुष्याला सर्वत्र दोष दिसत असतात. पण हे दोष सृष्टीत नसून पाहणार्‍याच्या दृष्टीत असतात. ‘कवळ’ या शब्दाचा अर्थ माउलींनी काविळीचा दोष असा करून ‘एर्‍हवीं वेधली दिठी कवळें । ते चांदणियातें म्हणे पिवळें’ असा दाखला दिला आहे. दृष्टी स्वच्छ झाली की ती दोषरहित होते. मग साधकाची अवस्था ‘चित्त चैतन्यीं पडतां मिठी । दिसे हरिरूप अवघी सृष्टी ।’ अशी होते. संत तुलसीदासही म्हणतात, ‘सियाराम मै सब जग जानी । कर हूं प्रणाम जोडी जुग पाणी ।’ देवाच्या रूपाशिवाय मग कुठे काहीही दिसत नाही. पुढे, ‘धुतला गुणदोषांचा मळ’ असे तुकोबाराय म्हणतात, दोष हे दोषरूप असतातच, परंतु ईश्वराप्रत जाताना गुणदेखील दोषास्पद ठरतात, कारण गुणांमुळे अहंकार पाठीस लागत असतो. म्हणून ईश्वरप्राप्तीसाठी गुण तसेच दोष दोन्हीही तितकेच बाधक ठरतात. तुकोबाराय म्हणतात, ‘माझ्या विठाईने माझे गुणरूप असलेले दोष धुवून मला निर्मळ केले आहे’. ‘लावूनि स्तनीं केलों शीतळ’ या पदावलीतील स्तनपानाविषयी असे म्हणता येते की, योगमार्गात ‘सतरावीचे स्तन्य’ असे जे म्हटले जाते, त्याचा अर्थ ब्रह्मरंध्रातून अमृतरस जिव्हेवर सातत्याने स्त्रवत राहतो आणि साधकाचे अंतर्बाह्य तर्पण करून त्याला शीतल करतो. या रसाचे सेवन झाले की, साधकाला समाधि अवस्थेचा लाभ होतो आणि तेच त्याचे निजस्थानी झोपणे असते. भक्तीमार्गात भगवंताच्या भजन-कीर्तनातून असेच ब्रह्मरसपान करावयास मिळते, असे संतांचे सांगणे आहे.
 अभंगाचा समारोप करीत तुकोबाराय भारावलेल्या अंतःकरणाने देवाला सांगतात की, ‘तू जवळ केलेस्, याचा आनंद अनिर्वचनीय आहे...  अजोड आहे’. यातील अलौकिक गोष्ट अशी की, साधन साधताना, कर्ता-करविता ईश्वरच असल्याने, उभयतांच्या इच्छेस्तव निराकार असणारा परमात्मा भक्ताला भावणारे रूप घेऊन आकाराला येतो. प्रसंगी भक्ताची इच्छा पूर्ण करण्यासाठी अकल्पनीय रूपही तो धारण करतो (प्रल्हादासाठी नरसिंहाचे रूप भगवंताने धारण केले आहे.) यात दिसणारे भगवंताचे एक वैशिष्ट्य तुकोबाराय शेवटी उद्धृत करतात की, तो भक्तीचा भिडस्त आहे. भक्तीने तो वश होणारा आहे.
 देवाचे मोठेपण, देवाचे कर्तृत्व, भक्तीचा महिमा आदी गोष्टींची अनुभूती घेण्यासाठी एकमेव अवस्था ज्या योनीत लाभते, ती मनुष्ययोनी आणि मनुष्यदेह देवाने अत्यंत कृपाळूपणे आणि आईच्या मायेने दिला हे बरवे झाले आणि या विठाईने मला महालाभ करून दिला, त्याची उतराई व्यक्त कशी करावी, या विचाराने तुकोबारायांनी हा भावपूर्ण अभंग रचला आहे, असे सारांशाने म्हणता येईल.
(क्रमशः) 

संपर्क : (डॉ. रामपूरकर : ०९८२०३७६१७५)